एक राष्ट्रीयत्वाच्या आग्रहाचा खटाटोप कशासाठी ?
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, चारही वर्णांतील लोक असलेल्या समाजाचे महत्त्व, गोव्यातील हिंदूंचा धार्मिक छळ करणार्या सेंट झेवियरने ब्राह्मणांवर केलेली टीका, हिंदुस्थान आणि राजसत्ता, भारतातील हिंदु आणि मुसलमान ही २ राष्ट्रे नसल्याचे (अ)ज्ञान, हिंदु-मुस्लिम ऐक्य हे गांधींच्या जीवनाचे साध्य होते’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(लेखांक २०)
या पूर्वीचा लेख आपण येथे वाचू शकता : https://sanatanprabhat.org/marathi/811458.html
प्रकरण ४
७. मुसलमानांच्या आग्रहास्तव फाळणीला विरोध न करणे
म. गांधी यांनी लियाकत अली खान यांच्या पत्राला उत्तर देतांना जे विचार मांडले आहेत, ते येथे देत आहे. ते म्हणतात, ‘‘अहिंसेचा पुरस्कर्ता म्हणून मी भारतातील मुसलमानांचा खरोखरच आग्रह असेल, तर प्रस्तावित फाळणीला बळजोरीने विरोध करणार नाही; परंतु अशा फाळणीचा मी स्वेच्छापूर्वक भागीदार होणार नाही. फाळणी थांबवण्यासाठी मी सर्व अहिंसक मार्गांचा अवलंब करीन; कारण ही फाळणी, म्हणजे गेली शेकडो वर्षे हिंदु-मुसलमानांनी एक राष्ट्र म्हणून रहाण्यासाठी केलेल्या परिश्रमांना शून्यवत करण्यासारखे आहे. फाळणी म्हणजे एक उघड उघड असत्य आहे.
हिंदु आणि इस्लाम हे २ धर्म परस्परविरुद्ध संस्कृती अन् सिद्धांत यांचे प्रतिनिधित्व करतात. या कल्पनेविरुद्ध माझे मन बंड करून उठत आहे. अशा विचारप्रणालीपर्यंत पोचणे, म्हणजे माझ्या दृष्टीने ईश्वरालाच नाकारणे आहे; कारण मी अंतःकरणपूर्वक असे मानतो की, कुराणाचा देव हाच भगवद्गीतेचा देव आहे आणि त्या देवांना जरी वेगवेगळ्या नावांनी आपण ओळखले, तरी आपण सर्वजण त्याच देवाची लेकरे आहोत. जे मुसलमान आपण वेगळे राष्ट्र आहोत, असेच समजत असतील त्यांच्या गळी बळजोरीने हे विचार मी उतरवू शकणार नाही. तथापि ८ कोटी मुसलमान हे ‘त्यांच्यासह हिंदु आणि इतर बांधव यांच्यात काहीच समान नाही’, असे घोषित करतील, तर यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. या सिद्धांताचा सुस्पष्ट प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला, तरच त्यांचे मन समजू शकेल.’’
८. गांधीच्या विचारांचे सार !
अ. देशाची फाळणी होणे, हे गांधींना कोणत्याही परिस्थितीत मान्य नव्हते.
आ. त्यांना अशी फाळणी, म्हणजे ‘ईश्वराला नाकारणे होय’, असे वाटत होते.
इ. मुसलमानांना ‘खरोखरच देशाची फाळणी हवी असेल’, असे त्यांना वाटत नव्हते.
ई. मुसलमान हे मूळचे हिंदु असल्याने त्यांचे राष्ट्रीयत्व पालटणे योग्य नाही.
उ. हिंदु आणि मुसलमान अगदी सारखे आहेत. त्यांच्यात काही भेद नाही.
ऊ. ज्यांना देवाने एक बनवले आहे, त्यांना मनुष्य तोडू शकणार नाही.
ए. भारतीय मुसलमानांना एकराष्ट्रीयत्वाची समज देणे, हे त्यांना कर्तव्य वाटत होते.
ऐ. तथापि आपले विचार मुसलमानांच्या गळी बळजोरीने उतरवणे त्यांना मान्य नव्हते.
ओ. या मध्यस्थीला अर्थ नव्हता आणि ‘८ कोटी मुसलमानांनी स्वतःच िनर्णय घ्यावा’, अशी त्यांची भूमिका होती.
९. बॅ. जीना यांच्या विचारांचे सार
अ. हिंदु आणि मुसलमान ही २ स्वतंत्र राष्ट्रे आहेत.
आ. हे दोन्ही केवळ धर्म नसून परस्परविरुद्ध विचारांचे जनसमुदाय आहेत.
इ. हिंदु-मुसलमान एकाच राष्ट्रीयत्वात बांधून ठेवणे, हा स्वप्नाळू आशावाद आहे.
ई. एकराष्ट्रीयत्वाची कल्पना कालबाह्य असून ती स्वीकारणे सर्वनाशास कारण ठरेल.
उ. हिंदु -मुसलमानांचे धर्म वेगळे, संस्कृती वेगळी, रितीरिवाज वेगळे आणि वाङ्मय वेगळे आहे.
ऊ. हिंदु-मुसलमानांत रोटी-बेटी व्यवहार होत नाहीत. इतिहासातील आदर्श परस्परविरुद्ध आहेत.
ए. या अगदी भिन्न समाजांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न करणे सर्वविनाश ओढवून घेण्यासारखे आहे.
म. गांधींच्या विचारांवरून त्यांना हिंदु-मुसलमान ऐक्याची तळमळ (?) स्पष्ट दिसते. आपल्या प्रमेयाच्या सिद्धतेसाठी त्यांनी दोन्ही गट कसे समान आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. याउलट बॅ. जीनांना ऐक्य मान्यच नव्हते. ‘हे दोन्ही समुदाय सर्वस्वी भिन्न आणि शत्रुत्व धारण करणारी राष्ट्रे आहेत’, हे त्यांनी आग्रहपूर्वक मांडले आहे. जे जीनांना दिसत होते, ते म. गांधींना कळत नव्हते का ? मग त्यांनी एकराष्ट्रीयत्वाचा आग्रह का धरावा ? तो यशस्वी झाला का ?
(क्रमशः)
– भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे , चेंबूर, मुंबई
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
पुढील लेख वाचण्या करिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/813038.html