भोलेबाबा यांच्यासह २० बाबांना ‘बनावट’ संबोधून काळ्या सूचीत टाकणार ! – आखाडा परिषद

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – हाथरस घटनेमुळे प्रसिद्धीझोतात आलेले नारायण साकार हरि उपाख्य भोलेबाबा यांच्यासह २० बाबांना ‘बनावट’ संबोधून त्यांना काळ्या सूचीत टाकण्यात येणार आहे. सर्व १३ आखाड्यांचे यावर एकमत झाले आहे. १८ जुलै या दिवशी कुंभमेळा प्रशासनाच्या होणार्‍या बैठकीत आखाडा परिषदेकडून हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या बाबांना कुंभमेळ्यात स्थायिक होण्यासाठी जागा आणि सुविधा देण्यात येऊ नयेत, असे प्रशासकीय अधिकार्‍यांना सांगण्यात येईल.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांच्या म्हणण्यानुसार आखाडा परिषदेने निरपराध जनतेची दिशाभूल करणार्‍या भोंदू बाबांची यादी सिद्ध केली आहे. अशा भोंदूंना महाकुंभात दुकाने सजवू दिली जाणार नाहीत. अशा बनावट बाबांना महाकुंभात स्थायिक होण्यासाठी जागा आणि तंबू उभारण्याची सुविधा देऊ नये, ही मागणी   प्रशासनासमोर ठेवण्यात येणार आह. हाथरसच्या घटनेनंतर धर्माच्या नावाखाली भोंदूगिरी करणार्‍या बाबांच्या विरोधात आखाडा परिषदही सक्रीय झाली आहे.