मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच आषाढी यात्रेत वाखरी ते पंढरपूर पायी चालणार !
पंढरपूर (सोलापूर) – शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच आषाढी पालखी सोहळ्यामध्ये वाखरी ते पंढरपूर असे ५ किलोमीटर अंतर चालणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आषाढी यात्रा कालावधीमध्ये वारकर्यांना ४ दिवस विनामूल्य अन्नदान करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मंगेश चिवटे यांनी पंढरपूर येथे दिली. पंढरपूरला आषाढी यात्रेच्या निमित्ताने येणार्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घातले आहे.
त्यांच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर आणि पालखी परिसराची पहाणी करून अधिकार्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. लवकरच मुख्यमंत्री आषाढी यात्रेच्या पूर्वी पंढरपूरचा पहाणी दौरा करणार आहेत. आषाढी यात्रेपूर्वी ठाणे जिल्ह्यातील एक विशेष पथक आषाढी यात्रेमध्ये काम करणार आहे. लवकरच हे पथक पंढरपूरमध्ये येणार असून आषाढी यात्रेनंतरसुद्धा हे पथक काम करणार आहे, असेही चिवटे यांनी सांगितले.