हिंदु राष्ट्रासाठी शारीरिक, वैचारिक आणि आध्यात्मिक बळ वाढवण्याचा संकल्प !
१. भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची महोत्सवात एकमुखी मागणी
सध्याची ‘सेक्युलर’ (निधर्मी) व्यवस्था निरपराध हिंदूंच्या होणार्या हत्या रोखण्यात, हिंदु धर्माचे रक्षण करण्यात, हिंदु धर्मियांना धर्मशिक्षित करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळेच ज्या प्रकारे देशविरोधी आणि हिंदुविरोधी हे भारताचा कणा असलेल्या सनातन हिंदु धर्माला लक्ष्य करत आहेत, त्याप्रमाणे हिंदूंनीही सर्व समस्यांचे मूळ असलेले राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ आणि ‘सोशलिस्ट (समाजवादी)’ हे शब्द हटवून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची एकमुखी मागणी केली पाहिजे.
२. अधिवेशनात ठरवण्यात आलेली काही महत्त्वपूर्ण सूत्रे
या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय.’शी संबंध असलेला खलिस्तानी नेता अमृतपाल सिंह आणि काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करणारा ‘रशीद इंजिनीयर’ यांच्यासारखे देशविरोधी, तसेच फुटिरतावादी तुरुंगातून निवडणूक लढवून निवडून आले. ‘एम्.आय.एम्.’चे भाग्यनगरचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत ‘लोकसभा सदस्यत्वा’ची शपथ घेतांना ‘जय भीम, जय मीम’, ‘अल्लाहू अकबर’ या घोषणासमवेत ‘जय फिलिस्तिन (पॅलेस्टाईन)’ अशीही घोषणा दिली. १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात भाषण करतांना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंना ‘हिंसक’ असे संबोधले. ही सगळी हिंदुविरोधी आणि देशविरोधी वक्तव्ये हिंदूंच्या भविष्यातील अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणारी आहेत. त्यामुळेच हिंदूंच्या रक्षणासाठी, तसेच देशाच्या अखंडतेसाठी हिंदूंचे संघटन करण्याचा दृढसंकल्प या अधिवेशनात करण्यात आला.
आज काश्मीर, बंगाल आदी प्रांतांतील हिंदूंवरील अत्याचार देशभरात चालू झाले आहेत. त्यामुळे शासनाला हिंदूंच्या प्रश्नांची नोंद घ्यायला लावणारा ‘दबावगट’ कार्यरत करण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी देशविदेशांतून येणार्या, तसेच ‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेशी जोडलेल्या सर्व हिंदु संघटनांनी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून वर्षभर कार्यरत रहाण्याचा निर्णय या अधिवेशनात घेण्यात आला. यातून हिंदु ‘इकोसिस्टीम’ (यंत्रणा) निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आगामी भीषण काळ पहाता हिंदूंनी स्वसंरक्षणार्थ सिद्ध होण्याची आवश्यकताही मान्यवरांकडून प्रतिपादित केली गेली.
३. हिंदु मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी देशव्यापी अभियान !
गेल्या २ वर्षांत या अधिवेशनाद्वारे ‘मंदिर संस्कृती रक्षा अभियान’ राबवण्यात आले. त्यातून ७१० मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता (पारंपरिक पोषाख) लागू करण्यात आली असून ती ४०० हून अधिक मंदिरांमध्ये लागू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मंदिर महासंघाच्या वतीने देशभरात १४ सहस्र मंदिरांचे संघटन झाले आहे. यातून मंदिरांची सुरक्षा, संवर्धन करण्यासह मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. ‘सेक्युलर’ सरकारने देशभरात हिंदूंच्या साडेचार लाखांहून अधिक मंदिरांचे सरकारीकरण केले आहे. ही मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी देशव्यापी अभियान राबवण्यात राबवण्यात येणार आहे.
४. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष साकार होण्यासाठी सर्वाेच्च योगदान देणे आवश्यक !
लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशविरोधी शक्ती आक्रमक झाल्या आहेत. काश्मीरमधील आतंकवादी कारवाया आता जम्मूमध्ये जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत. पंजाब, बंगाल, मणीपूरच नव्हे, तर देशभरात अनेक ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे वाढत आहेत. त्यामुळे येणारा काळ कठीण आहे. द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे, ‘साधनेने हे वातावरण पालटता येईल. जसे अर्जुनाकडे मोठे सैन्य नव्हते; पण साक्षात् भगवान श्रीकृष्ण होता, तसे आपल्याकडे धर्मबळ, ईश्वरीबळ आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक हिंदूने साधना करणे आवश्यक आहे.’ आता रामराज्यरूपी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष साकार होण्यासाठी स्वक्षमतेनुसार तन-मन-धन आणि प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करण्याची, म्हणजेच सर्वाेच्च योगदान देण्याची आवश्यकता आहे, हा संदेश या अधिवेशनातून हिंदूंना देण्यात आला आहे. (३.७.२०२४)
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.
महोत्सवाची यशस्वी सांगता !
द्वादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची’ म्हणजेच ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ची तपपूर्ती (१२ वर्षे) झाली आहे. या अधिवेशनांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या धर्मनिष्ठ आणि देशभक्त यांच्या संघटनामुळे आज धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र निर्मितीच्या संकल्पशक्तीची स्पंदने वैश्विक स्तरावरही जाणवत आहेत. हिंदु राष्ट्र ईश्वराच्या इच्छेनुसार योग्य वेळी स्थापन होणार आहे. खरेतर अयोध्येत श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन सूक्ष्मातून रामराज्याला, म्हणजे हिंदु राष्ट्राला प्रारंभ झालेलाच आहे. त्याला पूर्ण रूपाने साकार करण्यासाठी कृतीची दिशा या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ठरवण्यात आली. सनातन हिंदु धर्म हा भारताचा आत्मा आहे.
भारत देश जिवंत रहायचा असेल, तर हा आत्मा सुरक्षित रहाणे आवश्यक आहे; मात्र देशविरोधी शक्तींकडून त्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुणी सनातन धर्माचे उच्चाटन करण्याच्या वल्गना करत आहेत, तर कुणी भारताचे (इंडियाचे नव्हे) तुकडे करण्याच्या घोषणा देत आहेत; कुणी या देशाचा मूळ स्वभाव असलेले हिंदु धर्मीय हे हिंसक असल्याचे वक्तव्य करत आहेत. हे केवळ बोलणे नसून भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी महोत्सवापर्यंत म्हणजे वर्ष २०४७ पर्यंत भारताचे इस्लामीस्तान करण्याच्या षड्यंत्राचे हे ‘टूलकीट’ (विरोधकांची प्रणाली) आहे. त्याचा सामना करायचा असेल, तर आगामी काळात हिंदु राष्ट्राच्या मागणीला एक व्यापक जनआंदोलन बनवणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदु जागृती आणि संघटन करण्याच्या जोडीला हिंदु राष्ट्रासाठी शारीरिक, वैचारिक अन् आध्यात्मिक बळ वाढवण्याचा निर्धार ‘द्वादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त म्हणजेच ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त करण्यात आला. फोंडा (गोवा) येथील श्री रामनाथ देवस्थानात २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडलेल्या या महोत्सवात अमेरिका, सिंगापूर, इंडोनेशिया, घाना (दक्षिण अफ्रिका), नेपाळ या देशांसह भारतातील २६ राज्यांतील विविध संघटनांचे १००० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. महोत्सवात पहिले ३ दिवस ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले, २७ जून या दिवशी ‘हिंदु विचारमंथन महोत्सव’, २८ जून या दिवशी ‘मंदिर संस्कृती परिषद’, तर शेवटचे २ दिवस ‘अधिवक्ता संमेलन’ पार पडले.
अधिवेशनातील पारित ठराव !
अ. भारत आणि नेपाळ यांना हिंदु राष्ट्र घोषित करणे
आ. राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील ‘सेक्युलर’ आणि ‘सोशलिस्ट’ हे शब्द काढणे
इ. काशी-मथुरा आदी हिंदूंची मंदिरे अतिक्रमणमुक्त करून हिंदूंना देणे आणि ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ (प्रार्थनास्थळ कायदा) अन् ‘वक्फ’ कायदे रहित करणे
ई. धर्मांतर आणि गोवंश हत्या विरोधी कठोर कायदा करणे
उ. हलाल प्रमाणपत्रावर बंदी आणणे
ऊ. हिंदु मंदिरांचे सरकारीकरण रहित करणे
ए. लोकसंख्या नियंत्रण कायदा करणे
ऐ. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करणे
ओ. श्रीराम सेनेचे श्री. प्रमोद मुतालिक यांच्यावरील गोवा बंदी उठवणे
औ. रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणे
अं. ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ला कायद्याच्या कक्षेत आणणे
क. ‘ऑनलाईन रमी’सारख्या जुगारांवर बंदी आणणे
वरील विविध विषयांवरील ठराव ‘हर हर महादेव’च्या जयघोषात एकमताने संमत करण्यात आले, तसेच या अधिवेशनात हिंदु राष्ट्राच्या चळवळीला व्यापक रूप देण्यासाठी कृती आराखडा िनश्चित करण्यात आला. गोवा सरकारने धार्मिक स्थळे आणि शाळा यांच्या १०० मीटरच्या परिसरात नवीन दारू दुकानांना अनुमती देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला अधिवेशनात विरोधात करण्यात आला, तसेच धार्मिक भावना दुखावणारा हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने त्वरित हा निर्णय मागे घेतला.
‘लोकसभेच्या निवडणुकीत विद्यमान सरकारला अपेक्षित जागा न मिळाल्यामुळे हिंदुत्वनिष्ठांमध्ये एक प्रकाराची निराशा होती; मात्र या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवामुळे हिंदुत्वनिष्ठांमध्ये एक नवीन ऊर्जा फुंकण्याचे कार्य झाले,’असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर यांनी सांगितले.
– श्री. रमेश शिंदे