खडकवासला (पुणे) प्रकल्पात ६ दिवसांत वाढले २ टी.एम्.सी. पाणी !
पुणे – पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चारही धरणांतील पाणीसाठा अल्प होऊन ३.५० टी.एम्.सी. झाला होता; मात्र त्यानंतर खडकवासला धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू झाल्यानंतर २ जुलैला खडकवासला धरण प्रकल्पात ४.५५ टी.एम्.सी. पाणीसाठा होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असल्याने खडकवासला धरण प्रकल्पात ६.५० टी.एम्.सी. पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे गेल्या ६ दिवसांमध्ये २ टी.एम्.सी. पाणी वाढले आहे.
या प्रकल्पात २२.२९ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी ७ जुलै या दिवशी या प्रकल्पात ६.४० टी.एम्.सी. पाणीसाठा होता. यंदा प्रथमच गेल्या वर्षीपेक्षा धरणातील पाणीसाठा वाढला आहे. यामुळे पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे.