सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ५ वर्षे) यांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या संदर्भात सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे

‘२४ ते ३०.६.२०२४ या कालावधीत झालेला ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ५ वर्षे) यांनी प्रतिदिन ‘ऑनलाईन’ पाहिला. दिवसभरातील काही वेळ ते खेळत खेळत महोत्सवातील सूत्रे ऐकत असत, तर काही वेळा ते शांतपणे बसून महोत्सव बघत असत. तेव्हा त्यांनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पू. वामन राजंदेकर

१. पहिला दिवस (२४.६.२०२४)

अ. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र्र महोत्सवा’त दीपप्रज्वलन झाले. त्या वेळी पू. वामन यांनी सांगितले, ‘‘मला शांतीची अनुभूती आली. ‘प्रत्यक्ष नारायण (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तिथे उपस्थित आहेत’, असे मला जाणवले.’’

आ. सद्गुरु चारुदत्त पिंगळेकाका बोलत असतांना पू. वामन म्हणाले, ‘‘माझे मन निर्विचार झाले. मला शांतीची अनुभूती येत होती. ‘नारायण स्वतः अधिवेशनस्थळी बसून सद्गुरु पिंगळेकाकांचे बोलणे ऐकत आहेत’, असे मला जाणवत होते.’’

इ. अमेरिकेतील ‘इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स सायन्सेस’चे डॉ. नीलेश ओक बोलत असतांना पू. वामन म्हणाले, ‘‘हे ‘श्रद्धा आणि शंका’, यांविषयी किती महत्त्वाचे सांगत आहेत ! नारायणसुद्धा आपल्याला हेच सांगत असतात ना !’’

ई. ‘आज दिवसभर अधिवेशनस्थळी आकाशी रंग पसरलेला आहे’, असे पू. वामन यांनी सांगितले.

२. दुसरा दिवस (२५.६.२०२४)

अ. आज सकाळी महोत्सवाला प्रारंभ झाला. तेव्हापासून पू. वामन यांनी त्यांच्या खेळण्यातील २ वाघ आणि २ सिंह खेळायला घेतले. थोड्या वेळाने महोत्सव बघता बघता त्यांनी त्या वाघ आणि सिंह यांचे युद्ध चालू केले. मी त्यांना त्याचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘वाघ आणि सिंह ही देवीची वाहने आहेत. आता चालू असलेल्या सूक्ष्मातील युद्धाची आवश्यकता आहे.’’

आ. काही वेळाने महोत्सवात व्यासपिठावर मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन चालू झाले. त्यामध्ये महंत यति मां चेतनानंद सरस्वती यांचा विषय चालू असतांना पू. वामन यांनी वाघ आणि सिंह यांच्यातील युद्धाची तीव्रता वाढवली. याबद्दल मी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘त्यांना देवीच्या शक्तीची आवश्यकता आहे; म्हणून हे युद्ध चालू आहे.’’

इ. साधारण दुपारी १२.३० वाजल्यानंतर पू. वामन यांनी युद्धाचा खेळ बंद केला आणि खेळण्यातील वस्तू घेऊन चित्रीकरणाचा खेळ चालू केला. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘वाईट शक्ती चित्रीकरणात अडथळे आणणार आहेत. चित्रीकरणातील साहित्याचे हे युद्ध त्यासाठीच चालू आहे.’’

ई. या वर्षी प्रत्यक्ष महोत्सवस्थळी जाण्याच्या  संदर्भात पू. वामन म्हणाले, ‘‘या वेळी मला प्रत्यक्ष जायचे नाही. मला इथे राहूनच नारायणांनी दिलेली सेवा करायची आहे. नारायणच  सर्व  मान्यवर वक्ते, साधक आणि संत यांच्या माध्यमातून बोलतात. तेच  सर्व बोलवून घेणार आहेत.’’

उ. ‘आज दिवसभर महोत्सवस्थळी  सूर्या सारखा पिवळा तेजस्वी रंग दिसत असून सूक्ष्मातून सूर्य देव तिथे आहे’, असे पू. वामन यांनी सांगितले.

(क्रमशः)

– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन यांची आई, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४० वर्षे ), फोंडा, गोवा. (२७.६.२०२४)

पुढील भाग वाचाण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/813046.html

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ केवळ नारायणांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) इच्छेनुसारच होणार आहे’, असे पू. वामन यांनी सांगणे

श्री. निषाद देशमुख

‘वर्ष २०२४ मधील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या  संदर्भात पू. वामन म्हणाले, ‘‘हा महोत्सव केवळ नारायणांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) इच्छेनुसारच होणार आहे. आता सतत युद्ध करून वाईट शक्ती थकल्या आहेत; कारण त्यांनासुद्धा हे ठाऊक आहे की, नारायणच जिंकणार आहेत. त्यामुळे वाईट शक्तींनी कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, तरी नारायणांमुळे त्यांना ते शक्य होणार नाही.’’ – सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन यांची आई, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४० वर्षे), फोंडा, गोवा. (२७.६.२०२४)

(‘या वर्षी महोत्सवात सूक्ष्मातून वाईट शक्तींची पुष्कळ आक्रमणे होणार आहेत; पण देवाची एवढी कृपा आहे की, वाईट शक्तींना स्थुलातून काही अडथळे आणता येत नाहीत. त्यामुळे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांनी सांगितलेले वरील सूत्र अगदी योग्य आहे.’)

– सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.६.२०२४))

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.