समंजस आणि श्री गुरूंवर अढळ श्रद्धा असणारे चि. मिलिंद तावडे अन् प्रेमळ आणि परिपूर्ण सेवा करणारी चि.सौ.कां. रेणुका वळंजु !

१. चि. मिलिंद तावडे यांच्याविषयी चि.सौ.कां. रेणुका वळंजु (सनातन आश्रम, देवद, पनवेल) यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

चि. मिलिंद तावडे

१ अ. प.पू. कलावतीआईंच्या मार्गदर्शनानुसार साधना करणे : ‘श्री. मिलिंद हे प.पू. कलावतीआईंच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. ते कितीही व्यस्त असले, तरी नियमित मंदिरात भजनाला (उपासनेला) जातात.

१ आ. ‘साधनामार्ग वेगळा असला, तरी इतरांचा आदर करणे’, हे सूत्र श्री. मिलिंद यांच्याकडून शिकता येणे : त्यांनी मला ‘‘लग्नानंतर तूही मंदिरात येशील का ?’, म्हणजे तुझ्यावर सक्ती नाही, तुला यावेसे वाटले, तर तू मंदिरात येशील का ?’’, असे विचारले. यावरून मला त्यांच्याकडून ‘साधनामार्ग वेगळा असला, तरी सक्ती न करता इतरांचा आदर करणे’, हे सूत्र शिकता आले.

१ इ. ‘तुझ्या समवेत आश्रमातील संत आणि साधक यांचे आशीर्वाद आहेत’, याची जाणीव करून देऊन सकारात्मक करणे : अनेक वेळा मला नकारात्मकता येते, तेव्हा ते मला मायेतील गोष्टी न सांगता ‘‘तुझ्या समवेत आश्रमातील संत आणि साधक यांचे आशीर्वाद आहेत’’, याची जाणीव करून देऊन मला पुन्हा सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतात.

१ ई. श्री गुरूंवरील अढळ विश्वास : आमचा विवाह ठरल्यानंतर सतत काही ना काही अडचणी येत होत्या. त्यामुळे ‘पुढे कसे होणार ?’, अशी माझ्या मनात सतत भीती असायची. तेव्हा श्री. मिलिंद म्हणाले, ‘‘आपल्या दोघांच्या सद्गुरूंनी आपल्याला एकत्र आणायचे ठरवले असेल, तर ते कुणीच थांबवू शकत नाही. श्री गुरूंवर विश्वास ठेव.’’

१ उ. संतांप्रती आणि त्यांनी दिलेल्या प्रसादाप्रती असणारा भाव : एका संतांनी मला आणि श्री. मिलिंद यांच्यासाठी प्रसाद दिला होता. ते मी श्री. मिलिंद यांना सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘माझ्यासाठीचा प्रसाद नीट सांभाळून ठेव. मी तुला भेटीन, तेव्हा तो घेईन’’ आणि आमची भेट झाल्यावर सर्वांत आधी त्यांनी मला प्रसादाविषयी विचारले.

त्यांच्याशी बोलतांना ‘ते साधक आहेत’, असे जाणवते. त्यामुळे त्यांच्याशी मोकळेपणाने बोलता येते. ‘हे गुरुमाऊली, आपण मला असा आध्यात्मिक जोडीदार दिलात, यासाठी मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे.’

२. चि.सौ.कां. रेणुका वळंजु यांच्याविषयी सहसाधकांना जाणवलेली सूत्रे

चि.सौ.कां. रेणुका वळंजु

२ अ. श्री. वेदांत झरकर

२ अ १. उत्तम आकलनक्षमता : ‘कु. रेणुकाताईची आकलनक्षमता चांगली असल्यामुळे मर्दनसेवेच्या संदर्भात एखादा नवीन विषय शिकवला जातो, तेव्हा तिला तो पटकन आकलन होतो आणि तिच्या तो उत्तमरित्या लक्षात रहातो. आश्रमात मर्दनसेवा चालू केल्यावर रेणुकाताई त्या सेवेत सगळ्यात शेवटी सेवेला आली; पण अल्प कालावधीत तिने अनेक गोष्टी आत्मसात् केल्या.

२ अ २. अडचणी तत्परतेने सोडवणे : रेणुकाताई मर्दनसेवा दायित्व घेऊन करते. देवद आश्रमात मर्दनसेवा नव्यानेच चालू केल्यामुळे त्या सेवेची घडी बसली नव्हती. त्यामुळे तिला काही वेळा अडचणी येत असत; पण ती ते सूत्र सोडून न देता लगेच पुढे उत्तरदायी साधकांना विचारून घेते. त्यामुळे ‘एखादे सूत्र थांबून राहिले’, असे होत नाही.’

२ अ ३. संतांप्रती भाव आणि संतांनी केलेले कौतुक : रेणुकाताई संतांवर पुष्कळ भावपूर्ण उपचार करते. त्यामुळे तिने केलेल्या उपचारांची परिणामकारकताही चांगली असते. तिने सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या मानेला मर्दन केल्यावर त्यांना पुष्कळ हलके वाटले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘रेणुकाच्या हाताला चांगला गुण आहे.’’

२ आ. सौ. उमा सुनील कदम

२ आ १. ‘रुग्ण साधकांच्या जागी स्वतः आहे’, असे समजून उपचार करणे : ‘उपचार करतांना रेणुका ‘रुग्णांना ज्या भागात वेदना होतात, तिथे मला वेदना झाल्या असत्या, तर काय केल्याने मला बरे वाटले असते ?’, असा विचार करून उपचार करते. तिच्या या तळमळीमुळे तिला उपचार करतांना ‘हात फिरविण्याची पद्धत’, ‘दाब किती द्यायला हवा ?’, हे आपोआपच सुचते. त्यामुळे ते उपचार परिणामकारक होतात. मर्दनसेवेच्या माध्यमातून तिने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे.

२ आ २. श्रद्धा : तिच्या जीवनात आतापर्यंत आलेल्या अनेक संघर्षाच्या प्रसंगांना ती केवळ श्री गुरूंप्रती असलेल्या श्रद्धेने सामोरी गेली आहे.’

२ इ. सौ. काव्या चेऊलकर

२ इ १. परिपूर्ण सेवा करणे : ‘रेणुका सेवेची बरकाव्यानिशी व्याप्ती काढून त्यानुसार ती सेवा पूर्ण करते आणि सेवा पूर्ण झाल्यावर संबंधित उत्तरदायी साधकांना सेवेचा आढावा देऊन सेवा परिपूर्ण करते.’

२ ई. श्री. राजेंद्र दुसाने

२ ई १. व्यवस्थितपणा : ‘रेणुकाला कितीही उशीर झाला, तरी ती घेतलेले साहित्य व्यवस्थित जागेवर ठेवूनच पुढील सेवेला जाते.

२ ई २. जवळीक साधणे : आश्रमातील लहान आणि मोठे अशा सर्वांशी तिची जवळीक आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २८.६.२०२४)

उखाणे

वधू आणि वर या दोघांसाठी उपयोगी पडतील, असे उखाणे

शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने ।
… रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने ।।

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर, हेवा ।
…चे नाव घेतो, घडू दे आमच्याकडून सत्सेवा ।।