America Dating App : अमेरिकेत डेटिंग अ‍ॅपमुळे ८० टक्‍के लोकांना येत आहे मानसिक थकवा !

न्‍यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेत झालेल्‍या सर्वेक्षणात समोर आले की, डेटिंग अ‍ॅपचा वापर करणार्‍यांपैकी ८० टक्‍के वापरकर्ते मानसिक थकव्‍याचा सामना करत आहेत. या समस्‍येला तज्ञांनी ‘डेटिंग अ‍ॅप बर्नआऊट’ असे नाव दिले आहे. दुसरीकडे डेटिंग अ‍ॅप्‍सच्‍या सततच्‍या वापरामुळे त्‍याचा वापर करणार्‍यांमध्‍ये नातेसंबंधातील रुची अल्‍प होत आहे.

१. डेटिंग अ‍ॅप्‍सच्‍या अधिक आणि सतत वापर यांमुळे अमेरिकेत मानसिक थकवा आणि एकटेपणा याचा अनुभव वाढणे एक गंभीर सूत्र होत आहे. क्‍लिनिकल सायकोलॉलिस्‍ट यास्‍मीन साद यांनी सांगितले की, प्रत्‍येक १० पैकी ८ लोकांना मानसिक थकवा जाणवणे चिंतेचा विषय आहे. डेटिंग अ‍ॅप्‍सवर सर्व कामे सोडून अधिक वेळ घालवणे आणि त्‍यानंतरही जोडीदार न मिळणे थकव्‍याचे मोठे कारण आहे. यावर उपाय म्‍हणजे, स्‍वतःला थकवा जाणवत असेल, तर त्‍याने अ‍ॅप्‍स पहाणे बंद करून विश्रांती घेतली पाहिजे. तसेच लोकांशी वैयक्‍तिकरित्‍या भेटणे आणि चर्चेचा प्रयत्न केला पाहिजे. याने मानसिक थकवा अल्‍प होण्‍यास लाभ होतो.

२. अमेरिकेत डेटिंग अ‍ॅप्‍सचा वापर करणार्‍यांची संख्‍या ५ वर्षांत ४१ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. याची बाजारपेठ ११ सहस्र २६९ कोटी रुपयांची आहे. वर्ष २०१९ मध्‍ये याची बाजारपेठ ६ सहस्र ६७८ कोटी रुपये होती. वर्ष २०१९ मध्‍ये ४ कोटी ६२ लाख अमेरिकी नागरिक डेटिंग अ‍ॅपचा वापर करत होते, जे आता ६ कोटी ५ लाख झाले आहेत. असे असले, तरी हळूहळू त्‍यांच्‍यात नातेसंबंधांविषयीची रुची अल्‍प होत असल्‍याचे दिसून येत आहे.

डेटिंग म्‍हणजे काय ?

एखाद्याशी प्रेमसंबंध असलेल्‍या व्‍यक्‍तीसोबत नियमित वेळ घालवणे, याला ‘डेटिंग’ करणे, असे म्‍हटले जाते. सध्‍या केवळ पाश्‍चात्त्य देशांतच नव्‍हे, तर भारतातही असे ‘डेटिंग’ अ‍ॅप्‍स उपलब्‍ध आहेत. यात ज्‍या तरुण-तरुणींना प्रेमसंबंध प्रस्‍थापित करायचे आहेत, ते त्‍यांचे नाव अशा ‘अ‍ॅप्‍स’मध्‍ये नमूद करतात. या अ‍ॅप्‍स’मध्‍ये असे संबंध प्रस्‍थापित करण्‍यासाठी इच्‍छुक असलेल्‍या तरुण-तरुणींची नावे उपलब्‍ध असतात. त्‍यानुसार डेटिंगसाठी व्‍यक्‍तीची निवड केली जाऊ शकते.

संपादकीय भूमिका

मानसिक स्‍वास्‍थ्‍यासाठी मनाला योग्‍य वळण लावणे आवश्‍यक असते. पाश्‍चात्‍य संस्‍कृतीमध्‍ये अशी काही व्‍यवस्‍थाच नसल्‍याने आणि त्‍यांचे अनुकरण भारतीय करत असल्‍याचे अशी स्‍थिती निर्माण होत आहे. हिंदु धर्मानुसार साधना केली, तर मानसिक थकवा किंवा एकटेपणाची समस्‍या कधीही येणार नाही !