Vivan Karulkar : ब्रिटनमधील मराठी उद्योगपतीच्‍या १६ वर्षीय मुलाने लिहिले सनातन धर्मावर पुस्‍तक

ब्रिटनच्‍या निवडणुकीत किर स्‍टार्मर यांच्‍यासह अनेकांनी केले कौतुक !

डावीकडे किर स्‍टार्मर

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्‍ये ऋषी सुनक यांच्‍या पक्षाचा पराभव होऊन किर स्‍टार्मर यांच्‍या पक्षाचे सरकार आले आहे. ब्रिटनमधील निवडणुकीच्‍या प्रचाराच्‍या काळात प्रसिद्ध उद्योगपती आणि ‘कारूळकर प्रतिष्‍ठान’चे अध्‍यक्ष प्रशांत कारूळकर, तसेच प्रतिष्‍ठानच्‍या उपाध्‍यक्षा शीतल कारूळकर यांचे सुपुत्र विवान कारुळकर यांनी वयाच्‍या अवघ्‍या १६ व्‍या वर्षी लिहिलेल्‍या ‘सनातन धर्म : सोर्स ऑफ ऑल सायन्‍सेस’ (सनातन धर्म : सर्व विज्ञानाचे स्रोत) या पुस्‍तकाचेही पुष्‍कळ कौतुक झाले.

श्री.विवान कारुळकर

स्‍टार्मर यांना लंडनमधील ज्‍येष्‍ठ पत्रकार हरिदत्त जोशी यांनी हे पुस्‍तक प्रदान केले होते. स्‍टार्मर यांनीही या पुस्‍तकाचे कौतुक केले आणि विवानच्‍या प्रयत्नांविषयी त्‍याची प्रशंसाही केली. विजयी झालेले स्‍टार्मर यांचे प्रशांत कारूळकर यांनी अभिनंदन केले असून त्‍यांना शुभेच्‍छाही दिल्‍या आहेत.

निवडणुकीत भारतियांना आकृष्‍ट करण्‍यासाठी सगळे उमेदवार हिंदु धर्माविषयी श्रद्धा दाखवत होते. ब्रिटनमध्‍ये हिंदुत्‍वाविषयीचे कुतूहल उमेदवारांत दिसून येते होते. अनेक उमेदवार प्रचाराच्‍या वेळी मंदिरांना भेटी देत होते. त्‍या वेळी विवान यांच्‍या या पुस्‍तकाची चर्चा होत होती. विवानने एवढ्या अल्‍प वयात हे पुस्‍तक लिहिले यासाठी त्‍याला शाबासकी मिळाली.