Bharatpur Hindu Conversion : भरतपूर (राजस्‍थान) येथे ख्रिस्‍त्‍यांच्‍या उपचार सभेत १०० हून अधिक हिंदूंच्‍या धर्मांतराचा प्रयत्न !

उपचार सभेत कर्करोगासारखे आजार बरे करण्‍याचा दावा

भरतपूर (राजस्‍थान) – येथील एका गावात झालेल्‍या ख्रिस्‍त्‍यांच्‍या उपचार सभेत १०० हून अधिक हिंदूंना धर्मांतरासाठी बोलावण्‍यात आले होते. ‘ख्रिस्‍ती धर्म स्‍वीकारणार्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीला प्रति महिन्‍याला १० सहस्र रुपये देऊ आणि कर्करोगासारखे आजार बरे करू’, असा दावा ख्रिस्‍ती धर्मगुरु करत होते. या सभेत ख्रिस्‍ती धर्मप्रचारक हिंदूंच्‍या देवतांविषयी अपमानास्‍पद शब्‍द वापरत होते. देवतांना येशू ख्रिस्‍तासमोर दुर्बल मानले जात होते. येशू सर्वांत महान देव असल्‍याचा दावा आरोपी करत होते. या सभेत ख्रिस्‍ती धर्मप्रचारकांनी धर्मांतरासाठी आणलेल्‍या हिंदूंना त्‍यांच्‍या देवतांच्‍या मूर्ती तोडून फेकून देण्‍यास सांगितले. या धर्मांतराच्‍या सभेविषयी माहिती मिळताच पोलीस घटनास्‍थळी पोचले. या प्रकरणी पोलिसांनी २८ जणांना कह्यात घेतले आणि नंतर त्‍यांची जामिनावर सुटका करण्‍यात आली.

१. मथुरा गेट पोलीस ठाण्‍याचे प्रमुख करणसिंह राठोड यांनी सांगितले की, आरोपींच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. या घटनेतील मुख्‍य आरोपी रवींद्र कुमार (वय ३९ वर्षे) आणि त्‍याची पत्नी रुबी (३२ वर्षे) हे ख्रिस्‍ती जोडपे आहे. (असे बाटगे ख्रिस्‍ती त्‍यांची हिंदु नावे पालटत नाहीत, हे लक्षात घ्‍या. हिंदु समाजात मिसळून हिंदूंचे धर्मांतर करणे सोपे जावे, यासाठी ते स्‍वतःची हिंदु नावे तशीच ठेवतात ! – संपादक)

२. हे पती-पत्नी शहरात ‘चर्च फाऊंडेशन चालवतात. ते लोकांना त्‍यांच्‍या ‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप’ गटाशी जोडायचे आणि ‘कर्करोगासारखे आजार बरे करू’, असा दावा करून उपचार सभेत बोलवायचे.

३. पोलिसांनी रवींद्र कुमार याच्‍या घराची झडती घेतली असता तेथे ५ बायबल आणि ख्रिस्‍ती धर्माचे इतर प्रचार साहित्‍य सापडले. या प्रकरणी पोलीस रवींद्र कुमारच्‍या बँक खात्‍यांची चौकशी करत असून निधीचा स्रोत शोधत आहेत.

४. विहिंपचे जिल्‍हाध्‍यक्ष लखन सिंह यांनी सांगितले की, रवींद्र कुमार हा भरतपूरमध्‍ये अनेक वर्षांपासून धर्म परिवर्तन केंद्र चालवत आहे. यात त्‍याची पत्नीही त्‍याला साथ देते. हे जोडपे प्रत्‍येक गावात आणि वस्‍तीत जाऊन लोकांना ख्रिस्‍ती धर्माविषयी सांगत असत.

हिंदु धर्म सर्वांत हीन धर्म असल्‍याचा ख्रिस्‍ती धर्मप्रचारकांकडून कुप्रचार

पोलिसांत दाखल (प्रविष्‍ट) केलेल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे की, रवींद्र कुमार सभेत उपस्‍थित असलेल्‍यांना हिंदूंच्‍या देवतांची मूर्तीपूजा सोडून ख्रिस्‍ती धर्म स्‍वीकारण्‍यास सांगत होता. देवतांनी कोणताही अवतार घेतला नाही. तो भगवान श्रीकृष्‍णाविषयी अपशब्‍द वापरत होता. हिंदु धर्म सर्वांत खालच्‍या दर्जाचा धर्म असल्‍याचे वर्णन तो करत असे. ‘येशू हा सर्वांत मोठा देव आहे. त्‍याची सेवा केली, तर तुम्‍हाला स्‍वर्ग मिळेल’, असेही त्‍यात म्‍हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • कठोर धर्मांतर विरोधी कायद्याची आवश्‍यकता अशा घटनांतून पुन्‍हा एकदा अधोरेखित होते !
  • इतर वेळी चमत्‍कार करणार्‍या हिंदु संतांच्‍या नावाने बोटे मोडणारे बुद्धीप्रामाण्‍यवादी आणि पुरो(अधो)गामी ख्रिस्‍ती धर्मप्रचारकांच्‍या अशा दाव्‍यांच्‍या विरोधात चकार शब्‍दही काढत नाहीत, हे लक्षात घ्‍या !