मुसळधार पावसाने पंचगंगा नदी पात्राबाहेर
कोल्हापूर, ७ जुलै (वार्ता.) – गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे पंचगंगा नदीचे पाणी ७ जुलैला प्रथमच दुपारी पात्राबाहेर पडले. सायंकाळी ५ वाजता राजाराम बंधारा येथे नदीची पाण्याची पातळी २९ फूट ४ इंच (इशारा पातळी ३९ फूट, धोका पातळी ४३ फूट) नोंदवली गेली. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने एकूण ४५ बंधारे पाण्याखाली आहेत. चंदगड येथील ‘हेरे’ पुलावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी ‘अती मुसळधार’ पावसाची चेतावणी दिली असून नागरिकांना सतर्क रहाण्याविषयी कळवले आहे.
८ टी.एम्.सी. पाण्याची क्षमता असलेले राधानगरी धरण सध्या ४२ टक्के भरले आहे. जिल्ह्यातील तुळशी, वारणा, दूधगंगा, कासारी, चित्रोका, चित्री यांसह अन्य प्रकल्पांच्या पाणीसाठ्यातही जलदगतीने वाढ होत आहे. सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणीपातळीत विशेष वाढ झाली नसून सध्या त्यात केवळ १२ फूट पाणी आहे.