पनवेल परिसरात पावसाचा जोर !

पनवेल परिसरातील पावसाचे दृश्य

रायगड – ६ जुलैला रात्रभर आणि ७ जुलै या दिवशी पहाटे झालेल्या पावसामुळे पनवेलमधील सखल भागात पाणी शिरले. कळंबोली, तळोजा, खारघर, तसेच पनवेलमधील सुकापूर, देवद आदी ग्रामीण भाग येथेही मोठ्या प्रमाणात तळमजल्यावरील घरांत पाणी शिरले. सकाळी १० नंतर पावसाचा जोर अल्प झाल्यावर पाणी ओसरले. घरात पाणी गेल्याने ग्रामीण भागातील लोकांच्या घरातील वस्तूंची हानी झाली. सखल भागांतील रस्त्यावर २ ते ४ फूट पाणी होते. येथील मोरबे आणि पडघे या गावात सर्वाधिक पाणी शिरले. १२१.६० मि.मी. एवढा पाऊस २४ घंट्यांत पडला. पडघे गावाचा पूल पाण्याखाली गेल्याने औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी कर्मचार्‍यांनी ५ फूट पाण्यातून वाट काढली. गाढी नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात वर आल्याने तिच्यावरील उरण परिसराला जोडणारा पूल पाण्याखाली गेला होता. कामोठे आणि गावातील रस्ते येथे २ फूट पाणी होते.

तळोजा वसाहतीत कमरेपर्यंत पाणी होते. त्यामुळे अनेक कारखाने बंद ठेवावे लागले. नाले आणि खाडी दोन्ही भरून गेल्याने येथे पाणी शिरले. कमरेपर्यंत पाणी भरलेले कळंबोली येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय


मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळ दुपारी ४ वाजल्यापासून दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. सिंधुदुर्ग येथे ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने ही स्थिती निर्माण झाली.


ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपले !

ठाणे, ७ जुलै (वार्ता.) – ठाणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये रात्रभर चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. शहापूर आणि मुरबाड येथे १८ गावपाड्यांचा संपर्क तुटला होता. मध्य रेल्वेच्या कसारा ते आसनगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे मार्गावर झाड कोसळले होते. वासिंद आणि खडवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान डोंगराच्या खचलेल्या मातीचा भाग रेल्वे रूळांवर आला होता. त्यामुळे रेल्ववाहतूक विस्कळीत झाली होती.


कास तलाव (सातारा) परिसरात पावसाचा जोर कायम !

कास तलाव भरून वहात आहे

सातारा, ७ जुलै (वार्ता.) – गत काही दिवसांपासून झालेल्या प्रचंड पावसामुळे शहरातील पश्चिम भागातील नागरिकांची तहान भागवणारा कास तलाव भरून वहात आहे. कास बामणोली, तापोळा, कांदाटी खोरे या संपूर्ण परिसरातील ओढे-नाले भरून वहात आहेत. कास पठारामार्गे कास बामणोली मुख्य रस्ता पाण्यामध्ये गेल्याने कासकडे जाणारा मार्ग बांबूचे संरक्षक कुंपण टाकून बंद करण्यात आला आहे.

कास तलावाची खोली २२ मीटर आहे. कास तलावाची उंची वाढवल्यामुळे कास-बामणोली मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून सर्व वाहतूक श्री घाटाईदेवी मंदिरामार्गे वळवण्यात आली आहे. छोट्या वाहनांची आणि चारचाकी वाहनांची वाहतूक कास तलावाच्या वरील बाजूने सातारा नगरपालिकेने केलेल्या कच्च्या रस्त्याने चालू आहे; मात्र या रस्त्यावर वाहतूक वाढल्यास हा रस्ताही बंद करावा लागू शकतो. या मार्गावरील वाहतूक चालू रहाण्यासाठी रस्त्याचे अर्धवट असलेले खडीकरणाचे काम सातारा नगरपालिकेने लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक अन् पर्यटक करत आहेत.