दहिसर (मुंबई) येथे सायबर चोरट्यांकडून खोटी बतावणी करत फसवणूक !
दहिसर – येथील ५९ वर्षीय महिलेची सायबर चोरट्यांनी १.२ लाख रुपयांची फसवणूक केली. तिला आलेल्या भ्रमणभाषवर समोरून सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगितले होते. महिलेच्या ३८ वर्षीय मुलाला वांद्रे कार्यालयात अटक केल्याचे अधिकार्यांनी सांगितले. ‘५ महिन्यांपूर्वी मुलगा काही मित्रांसमवेत शहराबाहेर पार्टीसाठी गेला होता. तेथे त्याच्या मित्रांनी एका महिलेवर बलात्कार करून तिचा खून केला. मुलगा या गुन्ह्यात सामील नाही; मात्र तो त्याच्या मित्रांना वाचवण्यात सहभागी असल्यामुळे त्याला सहआरोपी केले आहे’, असे अधिकार्यांनी सांगितले. ‘आम्ही ही बातमी थोड्याच वेळात माध्यमांना देणार आहोत. जर बातमी माध्यमात जाण्यापासून थांबवायची असेल, तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील’, असे सांगितल्यावर महिला घाबरली.
या वेळी चोरट्यांनी तिच्या मुलाचा रडण्याचा आवाजही ऐकवला. हा आवाज ‘डीपफेक’द्वारे बनवला असल्याचे नंतर समजले. महिलेने संबंधितांना पैसे पाठवले. नंतर मुलाला संपर्क केला असता, तो त्याच्या कार्यालयात काम करत असल्याचे समजले. यानंतर महिलेने दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिका :वाढत्या सायबर चोरीवर पोलीस नियंत्रण कसे मिळवणार आहेत ? |