उत्तर भारतात सामूहिक नामजप सत्संगासाठी सेवा करणार्या साधकांमध्ये झालेले गुणसंवर्धन !
उत्तर भारतातील जिज्ञासूंसाठी प्रतिदिन सामूहिक नामजप आणि सत्संग यांचे आयोजन केले जाते. या उपक्रमाच्या सेवेत सहभागी झालेल्या साधकांना अनेक लाभ झाले. याविषयी त्यांनी केलेले अनुभवकथन ६ जुलै २०२४ या दिवशी पाहिले. आज पुढील भाग पाहूया.
याच्या आधीचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/811401.html
२. सेवेतून सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढून नवीन गोष्टी शिकता येणे
२ अ. सौ. सीमा शर्मा, फरीदाबाद
२ अ १. आळस हा स्वभावदोष दूर होऊन नवीन गोष्टी शिकता येणे : ‘सकाळी उशिरा उठण्यामागे माझा आळस हा स्वभावदोष होता. गुरुकृपेने या सेवेच्या माध्यमातून माझा तो स्वभावदोष दूर झाला. मी वेळेत सत्संगाला जोडू लागले. ‘सत्संगाचे लिखाण (टेक्स्ट) ‘पोस्ट’ कशा सिद्ध करतात ?’, हे मला शिकायला मिळाले.
२ अ २. सकारात्मकता वाढून शिकण्याची वृत्ती वाढणे : माझ्या मनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढली. माझ्यातील शिकण्याची वृत्ती आणि आत्मविश्वास वाढला. आधी मला एखादी सेवा मिळायची. तेव्हा मी ती सेवा करायला त्वरित नकार देत होते; परंतु आता मला एखादी सेवा मिळाल्यावर शिकण्याच्या स्थितीत राहून मी ती सेवा शिकण्याचा प्रयत्न करते. अन्य राज्यांतील साधकांशी समन्वय करण्याच्या माध्यमातून मला इतरांविषयी प्रेमभाव वाढवण्याची संधी मिळाली आहे.’
२ आ. सौ. पुष्पा सावंत, इंदूर, मध्यप्रदेश.
२ आ १. जवळीक करणे : ‘या सेवेच्या माध्यमातून सेवेतील साधकांशी समन्वय करतांना माझी त्यांच्याशी जवळीक होऊन माझ्यामध्ये त्यांच्याविषयी प्रेमभाव निर्माण झाला.
२ आ २. आत्मविश्वास वाढणे : या सेवेच्या माध्यमातून मला नवनवीन सेवा शिकायला मिळाल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला असून पुढाकार घेऊन सेवा करण्याच्या वृत्तीत वाढ झाली आहे.
२ आ ३. नियोजनकौशल्य शिकणे : सेवेसाठी मोजकेच साधक उपलब्ध असूनही या सेवेच्या माध्यमातून गुरुदेवांनी मला ‘योग्य नियोजन करून सेवा कशी करायची ?’, हे शिकवले. ‘गुरुदेवच माझ्यामध्ये ही क्षमता निर्माण करत आहेत’, याची जाणीव होऊन मला गुरुकृपा अनुभवता आली.
२ आ ४. इतर साधकांमध्ये जाणवलेले गुण !
२ आ ४ अ. नोएडाचे श्री. वैभव हरिकिशन शर्मा यांच्यातील सेवेची तळमळ ! : ‘श्री वैभव यांना ‘यू ट्यूब’वर सत्संग ‘लाईव्ह’ (Live) करायची सेवा होती. त्यांना सकाळी महाविद्यालयात जायचे असूनही ते स्वतःची सकाळची कामे करतांना ही सेवा करतात. सकाळी ७.३० वाजता ही सेवा पूर्ण झाल्यानंतर ते महाविद्यालयात जातात. त्यातून त्यांची सेवा करण्याची तळमळ लक्षात आली.
२ आ ४ आ. नोएडाचे कु. अनुराग यादव यांच्यात असलेली अडचणींवर मात करून सेवा करण्याची तळमळ ! : हे सत्संगात ‘स्क्रीन शेअरिंगची’ सेवा करतात. एकदा त्यांच्या घरात कुणीच नव्हते. त्यामुळे त्यांना घरातील पूजा करायची होती. ते मला म्हणाले, ‘‘मी पहाटे ५ वाजता उठून पूजा करून ७ वाजता ‘स्क्रीन शेअरिंगची’ सेवा करीन; परंतु मलाच ही सेवा करायची आहे.’’ यातून ‘सेवेप्रती तळमळ कशी असली पाहिजे आणि तळमळ असेल, तर कुठल्याही अडचणीवर कशी मात करू शकतो ?’, हे मला शिकता आले.
२ आ ४ इ. जयपूर (राजस्थान) येथील कु. वंशिका राठी हिच्यातील सतर्कता ! : एकदा कु. वंशिका राठी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) हिची बहीण कु. यशिका राठी हिला नामजप सत्संगात सूत्रसंचालन करायची सेवा होती. काही कारणाने तिला सत्संगाला जोडायला विलंब झाला. तेव्हा वंशिका हिने प्रसंगावधान राखून त्वरित स्वतः सूत्रसंचालन करायला आरंभ केला.
(वंशिका म्हणजे बासरी)
२ आ ४ ई. देवास (मध्यप्रदेश) येथील सौ. प्रणिता बागलीकर यांनी सांगितलेले पालट त्वरित स्वीकारणे : साधना सत्संगात सहभागी होणार्या सौ. प्रणिता बागलीकर यांनी नामजप सत्संगात विषय सादर करण्याची सेवा केली. त्यांना त्यांच्या विषयाशी संबंधित पुष्कळ पालट सांगितले जात असूनही त्या त्वरित ते पालट आनंदाने स्वीकारत होत्या. त्या मला म्हणाल्या, ‘‘मला विषय सादर करण्याच्या सेवेतून पुष्कळच आनंद मिळाला.’’
२ आ ४ उ. कुठलीही सेवा सांगितली, तरी ती त्वरित स्वीकारून करणारे इंदूरचे कु. अथर्व सावंत (वय १८ वर्षे) ! : अथर्वला आधी सकाळी लवकर उठायचा पुष्कळ आळस होता; परंतु आता तो एक हाक मारल्यावर त्वरित उठून सेवा करतो. त्याचा ‘राग येणे’, हा स्वभावदोषही थोडा अल्प झाला आहे. सकाळी तो नियमितपणे सत्संग ‘लाईव्ह’ (Live) करायची सेवा करतो. त्याला कुठलीही सेवा सांगितली, तरी तो त्वरित ती सेवा करायला सिद्ध होतो.’
ही सेवा करणार्या युवा साधकांमध्ये एवढ्या लहान वयात दिसलेली ‘सतर्कता, तळमळ आणि मनापासून सेवा करणे’ हे गुण पाहून ‘गुरुदेवांनीच आम्हाला या सेवेसाठी हे दैवी युवा साधक दिले आहेत’, असे मला जाणवले. त्यासाठी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
२ इ. सौ. संपदा दूधगांवकर, जयपूर, राजस्थान.
२ इ १. गुरुकृपेने नवनवीन संकल्पना सुचणे आणि सर्वांच्या मनात तोच विचार येणे : ‘आता मी नियमितपणे सेवा करत आहे. ‘नामजप करतांना गुरुदेव मला सेवेविषयी नवनवीन संकल्पना कशा सुचवतात ?’, ते माझ्या लक्षात आले आणि मला सुचलेली सूत्रेच गुरुदेव अनेक साधकांच्या मनात घालतात. त्यातून ‘ते साधकांची मने एकमेकांशी जोडून ती एकरूप करत आहेत’, असे मला वाटले.’
२ इ २. गुणवृद्धी होणे : सेवा करतांना स्वतःला न येणार्या गोष्टी ‘इतरांना विचारून घेणे’ हा गुण माझ्यामध्ये पूर्वी अत्यल्प होता. आता माझे इतरांना विचारून घेण्याचे प्रयत्न वाढले आहेत. माझ्यामध्ये ‘स्लाइड’ बनवण्यासाठी संहितावाचन करणे आणि तिच्याशी संबंधित चित्रे मिळवण्यासाठी ती संकेतस्थळावर शोधणे’ या कृती करण्याचे प्रमाण वाढले आहे. या सेवा नियमितपणे केल्यामुळे ‘हिंदी भाषा समजणे, टंकलेखन करणे आणि बोलणे’ या सर्वच गोष्टींत माझ्यामध्ये पुष्कळ सुधारणा झाली आहे.
गुरुदेवांनी मला या सेवेच्या माध्यमातून पुष्कळ शिकवले. त्यासाठी मला गुरुचरणी केवळ शब्दातीत कृतज्ञता वाटते.’ (समाप्त)