एका गावात झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या साधकांना आलेले कटू अनुभव !

एका गावात ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा होती. त्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या साधकांना आलेले कटू अनुभव पुढे दिले आहेत.

(प्रतिकात्मक चित्र)

१. एका प्रमुख संघटनेच्या प्रमुखांना भेटून त्यांना हिंदु राष्ट्र-जागृती सभेला निमंत्रण देण्याचे ठरवणे आणि त्यांनी भेटण्यासाठी सहमती दर्शवणे 

गावात असलेल्या एका हितचिंतकाकडे प्रतिदिन बैठक होत असे. तेव्हा आम्हाला कळले की, एका संघटनेकडून समितीच्या कार्याला पुष्कळ विरोध होत असल्याने साहाय्य करायला कोणी सिद्ध नाही. ते हितचिंतक म्हणाले, ‘‘आपण सर्वांत आधी येथील एका प्रमुख संघटनेच्या प्रमुखांना भेटून त्यांना निमंत्रण देऊया; म्हणजे सर्वांचा सहभाग होऊन सभा होईल.’’ तेव्हा आम्ही होकार दिला. त्या संघटनेचे प्रमुख रुग्णाईत असल्याने २ दिवसांनी त्यांची भेट घेण्याचे ठरले. ज्या दिवशी भेटायचे होते, त्याच्या आदल्या दिवशी समितीच्या एका साधकाने त्या संघटनेच्या जिल्हाप्रमुखांना संपर्क केला. तेव्हा त्यांनी भेटण्यासाठी सहमती दर्शवली.

२. संघटनेच्या जिल्हाप्रमुखांनी समितीच्या साधकांना न भेटणे आणि ‘मी समितीच्या साधकांना भेटू शकत नाही, या गावात सभा न घेता दुसरीकडे घेण्यास सांगा’, असा निरोप देणे

त्यांना भेटण्यासाठी ८५ कि.मी. दूर जायचे होते. तेथे जाण्यासाठी निघतांना आम्ही त्यांना तसे कळवले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘पोचायला १५ मिनिटे असतांना मला संपर्क करा.’’ त्याप्रमाणे आम्ही पोचण्यापूर्वी संपर्क केला. तेव्हा त्यांचा भ्रमणभाष बंद (Switch off) होता. ज्या समन्वयकांनी त्या संघटनेच्या प्रमुखांना भेटण्याविषयी सांगितले होते, त्यांना आम्ही भ्रमणभाष केला. तेव्हा त्यांचा भ्रमणभाष त्या संघटनेच्या प्रमुखांनीच घेतला. त्यांनी आम्हाला एका हितचिंतकाकडे येण्यास सांगितले. त्याप्रमाणे आम्ही तेथे पोचलो; परंतु त्या संघटनेचे प्रमुख तेथे आले नाहीत. तेथे आम्ही त्यांची अर्धा घंटा वाट पाहिली आणि नंतर तेथूनच त्यांना संपर्क केला. तेव्हा संघटनेचे प्रमुख हितचिंतकांना म्हणाले, ‘‘मी त्यांना भेटू शकत नाही. त्यांना विचारा, ‘या गावात सभा का घेत आहात ? दुसरीकडे घ्या. आमचे कार्यकर्ते कशाला पाहिजेत ?’’ त्यानंतर त्यांनी भ्रमणभाष बंद केला.

३. एका प्रतिष्ठित उद्योजकांनी त्या संघटनेशी संबंधित त्यांच्या २ सदनिका समितीच्या साधकांना निवासासाठी देणे आणि त्या संघटनेच्या दबावाखाली येऊन काहीही कारणे सांगत सदनिका रिकामी करण्यास सांगणे

सभेच्या आधीच्या एका बैठकीत उपस्थित असलेल्या एका प्रतिष्ठित उद्योजकांनी त्याच संघटनेशी संबंधित त्यांच्या २ सदनिका आम्हाला निवासासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे आम्ही ८ जण तेथे निवासासाठी गेलो. आम्ही एक रात्र तेथे राहिलो आणि अकस्मात् त्यांनी निवासाच्या सदनिका सोडण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘‘तुमचे लोक पुष्कळ त्रास देतात. इमारतीमधील लोकांनीही सांगितले की, यांचा त्रास होतो.’’ त्या उद्योजकांनी काहीही कारणे सांगत त्याच क्षणी आम्हाला ते निवासस्थान सोडण्यास सांगितले. प्रत्यक्षात ते जे सांगत होते, तसे काही घडले नव्हते; पण त्यांच्यावर त्या संघटनेकडून प्रचंड दबाव आल्याने ते तसे सांगत होते. आम्ही त्यांना ‘आम्ही अकस्मात् कुठे जाऊ ? उद्या निवासस्थान रिकामे करतो’, असे सांगितले. आम्ही त्यांची क्षमा मागितली. तेव्हा त्यांनी आमची मागणी मान्य केली.

४. दुसर्‍या दिवशी उद्योजकांच्या माणसांनी महिला कार्यकर्त्यांचा विचार न करता त्यांना सदनिकेतून हाकलणे

दुसर्‍या दिवशी आम्ही दिवसभर प्रसार न करता अन्य निवासस्थान शोधले आणि या सदनिकांमधून त्या नवीन निवासस्थानी साहित्य नेणे चालू केले. समितीच्या २ साधिका रिक्शातून साहित्य घेऊन नवीन स्थानी साहित्य पोचवत होत्या आणि एक युवा साधक त्या सदनिकेत थांबला होता. तेव्हा त्या उद्योजकांच्या माणसांनी युवा साधकासहित सर्व साहित्य सदनिकेच्या बाहेर काढले आणि सदनिकेला कुलूप लावून ते निघून गेले.

त्या संघटनेचा त्यांच्यावर इतका प्रचंड दबाव होता की, ते काहीच ऐकण्याच्या सिद्धतेत नव्हते. त्यांनी साधिकांना अक्षरशः तिकडून हाकलून लावले. ती वेळ संध्याकाळी ७.३० ची होती. ‘सगळ्या महिला आहेत’, हा विचारही त्यांनी केला नाही.

५. संघटनेने उद्योजकांवर दबाव निर्माण केल्यामुळे समितीच्या साधकांना गावात अल्प अर्पण मिळणे

त्या संघटनेने गावातील उद्योजकांवर इतका दबाव निर्माण केला की, ते अर्पणही मिळू देत नव्हते. सभेच्या ४ दिवस आधीपर्यंत साधकांकडे थोडेच अर्पण जमा झाले होते. त्या संघटनेला घाबरून काही जण आम्हाला भेटायचे टाळत होते, तर काही जण गावात असूनही ‘आम्ही गावात नाही’, असे खोटे सांगत होते. यावरून ‘त्या संघटनेची गावात किती दहशत आहे !’, हे आमच्या लक्षात आले.

६. गावातील अन्य धार्मिक कार्यक्रमांना विनामूल्य साहित्य देणार्‍या एका मंडप ‘डेकोरेटर’ने समितीचे नाव पाहून मंडपाच्या साहित्याचे मूल्य २ लक्ष रुपये सांगणे

त्या गावात एक प्रतिष्ठित मंडप ‘डेकोरेटर’ आहे. त्या गावातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाला तेच मंडप डेकोरेटर (सजावट करणारा) सर्व साहित्य देतात. स्थानिक लोकांनी आम्हाला त्यांच्याकडे जाण्यास सुचवले. जेव्हा समितीचे काही साधक तेथे संपर्कासाठी गेले, तेव्हा तेथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख असलेले ४ – ५ जण उपस्थित होते. तेथे त्या सगळ्यांनी साधारण २ घंटे साधकांशी वैचारिक वाद घातला. ते म्हणत होते, ‘‘समिती तुमचा वापर करून घेत आहे. ही ब्राह्मणांची, भटुकड्यांची संस्था आहे. तुम्ही तरुण आहात; म्हणून तुमचा वापर करून घेतला जात आहे. आम्ही तुम्हाला साहाय्य करू; पण तुम्ही आम्हाला एकेक दायित्व द्या. व्यासपिठावर धर्माविषयी सांगा. ब्राह्मणांचे ज्ञान सांगायला नको.’’

हे बोलणे चालू असतांना तेथे अन्य काही संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याने साधकांना तेथून उठून जाता आले नाही. प्रत्यक्षात मंडप डेकोरेशन करणार्‍या त्या व्यक्तीने समितीला अंदाजे २ लक्ष रुपये व्ययाचे ‘कोटेशन’ सांगितले. एरव्ही ते त्यांचे साहित्य अन्य धार्मिक कार्यक्रमांना विनामूल्य देतात; पण ‘हिंदु जनजागृती समिती’ हे नाव पाहून त्यांनी एवढे मूल्य सांगितले. त्यानंतर साधकांनी अन्य मंडप ‘डेकोरेटर्स (सजावट करणारे)’ शोधले.

 ७. जिल्ह्यातील धार्मिक कार्यक्रमांना साहाय्य करणार्‍या अन्य एका संघटनेचा प्रमुख असलेल्या उपाहारगृहाच्या मालकांना साधकांनी अर्पणात भोजन मागितल्यावर त्यांनी रागाने नकार देणे

त्या गावात अन्य एका संघटनेच्या प्रमुखाचे एक उपाहारगृह आहे. ‘त्या गावातीलच नाही, तर त्या जिल्ह्यातील कोणत्याही धर्मकार्यासाठी ते पुष्कळ साहाय्य करतात’, असे आम्हाला अनेकांकडून समजले; म्हणून समितीचे २ साधक त्यांच्याकडे गेले आणि त्यांना अर्पणामध्ये साधकांनी भोजन देण्याविषयी विचारले. तेव्हा ते अतिशय रागाने म्हणाले, ‘‘मी आमची संघटना सोडून कोणालाही जेवण देत नाही. येथे तुम्हाला कुणी साहाय्य करणार नाही.’’

८. सभेच्या आदल्या दिवशी अन्य एका संघटनेच्या लोकांनी पोलिसांना निवेदन दिले, ‘ही ब्राह्मणांची संघटना आहे. या सभेत प्रक्षोभक भाषणे होतात. आम्ही सभा उधळून लावू.’

९. सभा चालू झाल्यावर समितीची साधिका विषय मांडायला उभी राहिली असता कोणीतरी बाहेरून ध्वनीक्षेपक यंत्रणेवर गुलेरने दगड मारणे

सभा चालू झाल्यावर हिंदु जनजागृती समितीचा परिचय सांगण्यात आला. त्यानंतर लगेचच समितीची एक साधिका विषय मांडणार होती. ती विषय मांडण्यासाठी व्यासपिठावर उभी राहिली असता कोणीतरी ध्वनीक्षेपक यंत्रणेवर (‘साऊंड सिस्टिम’वर) बाहेरून गुलेरने (टीप) दगड मारला. तो दगड थेट व्यासपिठावर येऊन पडला. दोन धर्मप्रेमींनी दगड मारणार्‍या दोघांचा पाठलाग केला; पण ते दुचाकीवरून पळून गेले.

टीप – गुलेर : हे दोन फाटे असलेल्या लाकडाला काळ्या रबराने बांधून बनवलेले विशिष्ट आकाराचे खेळणे असते. या रबरात दगड अडकवून रबर ताणून नेम धरला असता तो दगड त्या लक्ष्यावर लागतो.’                                                                                                                                           –

– हिंदु जनजागृती समितीचा एक साधक