सेवेची तीव्र तळमळ आणि तत्त्वनिष्ठ असलेल्या पुणे येथील सनातनच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक !
पुणे येथील साधकांना पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांचे जाणवलेले वैशिष्ट्यपूर्ण गुण येथे दिले आहेत. ६.७.२०२४ या दिवशी यातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू. (भाग २)
मागील भाग येथे वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/811426.html
५. सौ. लता वाघ, वल्लभनगर, पुणे.
५ अ. संत असूनही स्वतःला सेवक समजणे : ‘तळेगाव (जि. पुणे) येथे एक कार्यशाळा झाली. त्या दिवशी रात्री आवराआवर झाल्यानंतर बहुतेक साधक घरी गेले. शेवटी आम्ही केवळ ५ – ६ जण मागे राहिलो होतो. आम्ही ज्या गाडीने जाणार होतो, त्या गाडीला यायला उशीर होणार होता. पू. मनीषाताईंना घरी जाण्यासाठी २ घंटे प्रवास करावा लागणार होता; म्हणून आम्ही त्यांना जायला सांगितले, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मी तुम्हाला एकटे सोडून जाणार नाही. मी सेवक आहे. मी तुमची गाडी येईपर्यंत थांबेन. आपण सगळे एकत्र निघूया.’’ त्या आमची गाडी येईपर्यंत थांबल्या. त्यांच्या ‘सेवक’ या शब्दाने मला पुष्कळ अंतर्मुख केले. नंतर मीही ‘मी सेवक आहे’, असा विचार करून सेवा करण्याचा प्रयत्न चालू केला. तेव्हापासून मनात पुष्कळ सेवकभाव निर्माण होऊन भावजागृती होऊ लागली.’
६. श्री. महेंद्र अहिरे, भोर, पुणे.
६ अ. झोकून देऊन सेवा करणे : ‘हडपसर, पुणे येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवांसाठी पुष्कळ अडचणी आल्या. अडचणी आल्यावर पू. मनीषाताई शांत राहून विचारून निर्णय घेतात. आरंभी साधक संख्या अल्प होती. तेव्हा सर्वप्रथम पू. मनीषाताई हडपसर येथे एका खोलीत रहायला गेल्या. त्यांनी त्या खोलीची स्वतःच स्वच्छता केली. त्यांनी स्वतः झोकून देऊन सेवा करायला आरंभ केला. त्यानंतर सभेच्या सेवेसाठी साधक उपलब्ध होऊ लागले. ‘आपण झोकून देऊन सेवा केली, तर ईश्वर आपल्या अडचणी सोडवतो’, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. ओझर येथील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या सेवेच्या वेळीही आरंभी त्यांनी स्वतः पुण्याहून ओझर येथे अनेक वेळा जाऊन सेवा केली.
६ आ. पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या संकल्पाने ग्रंथ प्रदर्शनासाठी ‘स्टँड’ बनवून मिळणे
६ आ १. कार्यालयातील कामाच्या व्यस्ततेमुळे ‘स्टँड’ बनवायला वेळ नसणे, कार्यालयातील एका सुताराने ‘स्टँड’ बनवून देतो’, असे सांगणे : ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या वेळी ग्रंथ प्रदर्शनासाठी २ ‘स्टँड’ची आवश्यकता होती. पू. मनीषाताईंनी मला ‘स्टँड’ बनवण्याची सेवा दिली होती; पण माझ्या चाकरीमुळे मला ‘स्टँड’ बनवायला वेळ मिळत नव्हता. मी एका धर्मप्रेमींना ‘स्टँड’ बनवण्याविषयी विचारले; पण त्यांनाही ‘स्टँड’ बनवण्यास वेळ नव्हता. शेवटी मी आमच्या कार्यालयातील एका सुताराला ‘स्टँड’ बनवून देण्याविषयी विचारले. त्यांनी पटकन होकार दिल्यावर मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
६ आ २. सुतारालाही ‘स्टँड’ बनवण्यासाठी वेळ न मिळणे; मात्र त्याने जागून एका रात्रीत २ ‘स्टँड’ बनवून देणे : कामाच्या व्यस्ततेमुळे त्या सुतारालाही वेळ मिळाला नाही. ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या आदल्या रात्री ९ वाजता मी त्यांना संपर्क केला, तेव्हाही त्यांनी ‘स्टॅन्ड’ बनवले नव्हते; पण ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही उद्या सकाळी ७ वाजता ‘२ स्टँड घेऊन जा’’; पण मला ‘स्टँड मिळतील’, अशी शाश्वती वाटत नव्हती; म्हणून मी तसे पू. मनीषाताईंना कळवले होते. दुसर्या दिवशी मंदिर परिषदेसाठी निघतांना मी त्या सुतारांना संपर्क केला, तेव्हा ते म्हणाले, ‘‘२ स्टँड बनवले आहेत. ते घेऊन जा.’’
६ आ ३. पू. (सौ.) मनीषा पाठक यांचा संकल्प कार्यरत झाल्याचे अनुभवणे : ‘स्टँड’ पाहून मला आश्चर्य वाटले. मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही हे कधी बनवले ? काल रात्री ९ वाजेपर्र्यंत तुम्ही कार्यालयातच होता.’’ ते मला म्हणाले, ‘‘मी रात्री १२ वाजता ‘स्टॅन्ड’ बनवायला घेतले आणि पहाटे ४ वाजेपर्यंत २ ‘स्टँड’ बनवून पूर्ण झाले. तुम्ही धर्माचे कार्य करत आहात. माझी सेवा म्हणून मी हे २ ‘स्टँड’ तुम्हाला अर्पण देत आहे. यापुढे कधी साहाय्य लागले, तर मला सांगत जा.’’ खरेतर त्यांना सनातन संस्थेचे कार्य फारसे ठाऊक नाही. केवळ ‘पू. मनीषाताईंच्या संकल्पामुळे त्यांनी ते बनवून दिले’, हे माझ्या लक्षात आले. ‘संतांचा संकल्प कसे कार्य करतो ?’, हे मला प्रत्यक्ष अनुभवता आले.
६ इ. तत्त्वनिष्ठता
६ इ १. यजमान श्री. महेश पाठक यांच्याकडून झालेल्या चुकीची सत्संगात जाणीव करून देऊन ‘योग्य काय असायला हवे ?’, ते सांगणे : एकदा पू. मनीषाताईंचे यजमान श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांच्याकडून एक चूक झाली होती. तेव्हा पू. मनीषाताईंनी सर्व साधकांसमोर यजमानांना चुकीची जाणीव करून दिली. त्यांनी ‘यजमानांचे कुठे चुकले ? आणि पुढे कसे करायला पाहिजे ?’, याविषयी सांगितले.
६ इ २. धर्मप्रेमीच्या संदर्भात साधकाकडून झालेली चूक त्याला सांगणे : एकदा एका धर्मप्रेमीच्या संदर्भात एका साधकाकडून मला निरोप देण्यात चूक झाली होती. तेव्हा पू. मनीषाताईंनी त्या साधकाला आणि आम्हाला सर्वांना भ्रमणभाष करून एकत्र जोडले अन् त्या साधकाला त्याच्याकडून झालेल्या चुकीची जाणीव करून दिली. ‘धर्मप्रेमीची साधना व्हावी’ आणि ‘ते संस्थेशी जोडून रहावेत’, या दृष्टीने ती चूक साधकाला सांगितली.’
७. सौ. स्मिता बोरकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) जुन्नर, पुणे.
७ अ. समाजातील सर्वसाधारण व्यक्तीला पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्यातील चैतन्य, वेगळेपण आणि प्रीती जाणवणे : ‘डिसेंबर २०२३ मध्ये ओझर, जिल्हा पुणे येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ झाली. परिषदेचे नियोजन आणि अन्य सेवा यांसाठी पू. मनीषाताई जुन्नर येथे आमच्या घरी निवासाला होत्या. तेव्हा एकदा आम्ही पू. मनीषाताईंच्या समवेत आमच्या घराशेजारील एका दुकानात काही वस्तू आणायला गेलो होतो. ते दुकान सांभाळणार्या दादांना ‘पू. मनीषाताई संत आहेत’, हे ठाऊक नव्हते. ते दादा पू. मनीषाताईंशी मोकळेपणाने बोलत होते. त्यांनी स्वतःच्या अडचणी पू. मनीषाताईंना सांगितल्या. अडचणी सांगतांना त्यांना पुष्कळ भरून आले होते. पू. मनीषाताईंनी त्यांना समजावले आणि योग्य दृष्टीकोन देऊन आधार दिला. या प्रसंगातून ‘समाजातील साधना न करणार्या व्यक्तीलाही पू. मनीषाताईंमधील चैतन्य, वेगळेपण आणि प्रीती जाणवते’, याची मला प्रचीती आली.’
८. सौ. राधिका घागरे, भोसरी, पुणे आणि सौ. पद्मा लोणे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सांगवी, पुणे.
८ अ. सखोल नियोजन करून परिपूर्ण सेवा करून घेणार्या पू. (सौ.) मनीषा पाठक !
८ अ १. नियोजन कौशल्य : ‘डिसेंबर २०२३ मध्ये ओझर (जि. पुणे) येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन केले होते. त्या परिषदेचे नियोजन आणि सेवा यांची व्याप्ती पुष्कळ मोठी होती. पू. मनीषाताईंनी आम्हा साधकांचे सत्संग घेऊन एकेका सेवेसाठी समित्या नेमल्या. प्रत्यक्ष ओझर येथे जाऊन त्या त्या समितीतील साधकांना त्यांच्या सेवेच्या जागा दाखवून कार्यक्रमस्थळ, भोजनव्यवस्था, निवासव्यवस्था इत्यादी सेवांचे सखोल नियोजन करून घेतले. ‘या सेवेतून साधकांची साधना कशी होणार आहे ?’, हे वारंवार सांगून ते साधकांच्या मनावर बिंबवले.
८ अ २. सेवेची तळमळ आणि प्रेमभाव : पू. मनीषाताईंनी सेवा करणार्या साधकांचा आढावा घेऊन ‘साधकांची सेवा नियोजन केल्याप्रमाणे होत आहे ना ?’, हे स्वतः पाहिले. त्यांनी प्रत्येक सेवा परिपूर्ण होण्यासाठी न थकता आणि काही दिवस पहाटे ४ – ५ वाजेपर्यंत सेवा केली. त्याच वेळी त्या ‘साधकांचे जेवण आणि झोप व्यवस्थित होत आहे ना ?’, याची प्रेमाने विचारपूस करून साधकांची काळजीही घेत होत्या.
८ अ ३. ‘इतरांच्या कलाने घेऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित सेवा कशी करून घ्यायची ?’, हे प्रत्यक्ष कृतीतून शिकवणे : पू. मनीषाताईंनी भोजनव्यवस्था सेवेत स्वयंपाक करणार्या सर्व आचार्यांच्या समवेत जवळीक साधली. ‘त्यांच्या कलाने; पण गुरुमाऊलींना अपेक्षित सेवा त्यांच्याकडून कशी करून घ्यायची ?’, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून आम्हाला शिकवले. परिषदेला विविध भागांतून संत, सद्गुरु, मंदिर न्यासाचे अनेक प्रतिष्ठित आले होते. ‘त्यांचे पथ्य जाणून घेऊन त्याचे नियोजन कसे करायचे ?’, या सर्व बारकाव्यांचा अभ्यास पू. मनीषाताईंनी आमच्याकडून करून घेतला. यातून पू. मनीषाताईंची समष्टी सेवा परिपूर्ण करण्याची धडपड आणि साधकांवरील प्रीती या गुणांची मला अनुभूती घेता आली.’ (समाप्त)
(वरील सर्व सूत्रांचा दिनांक २५.२.२०२४)