विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्‍यासाठी विशाळगडाच्‍या पायथ्‍याशी सहस्रो शिवभक्‍तांनी केली महाआरती !

विशाळगडावर उपस्‍थित असणारे ह.भ.प. शिरीष महाराज मोरे, तसेच शिवप्रेमी

कोल्‍हापूर – विशाळगड तात्‍काळ अतिक्रमणमुक्‍त करण्‍यात यावा, या मागणीसाठी सहस्रो शिवप्रेमींनी विशाळगडाच्‍या पायथ्‍याशी श्री वाघजाईदेवीची महाआरती केली. भर पावसात सहस्रो शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात विशाळगडावर जमले होते. या प्रसंगी ‘मुक्‍त करा-मुक्‍त करा विशाळगड मुक्‍त करा’, ‘आई भवानी शक्‍ती दे-विशाळगडाला मुक्‍ती दे’, अशा घोषणा या प्रसंगी शिवप्रेमींनी दिल्‍या. सकल हिंदु समाज, हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना आणि जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांच्‍या नेतृत्‍वाखाली हे आंदोलन करण्‍यात आले. या प्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला होता.

या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे कोल्‍हापूर जिल्‍हाध्‍यक्ष श्री. दीपक देसाई, भ्रष्‍टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्‍यक्ष श्री. आनंदराव पवळ, विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. कुंदन पाटील, धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्‍हापुरे यांसह विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.

विशाळगडाच्‍या पायथ्‍याशी सहस्रो  शिवभक्‍तांनी केली महाआरती

विशाळगड पुरातत्‍व विभागाच्‍या अंतर्गत असतांना अतिक्रमण कसे झाले ? – ह.भ.प. शिरीष महाराज मोरे

राज्‍यातील पुरातत्‍व विभागाच्‍या अंतर्गत असणारे राजगड आणि रायगड येथील एक दगड जरी हलवायचा असेल, तर अनेक अनुमती घ्‍याव्‍या लागतात. दुसरीकडे त्‍याच पुरातत्‍व विभागाच्‍या अंतर्गत असलेल्‍या विशाळगडावर १५६ अतिक्रमणे कशी काय उभी रहातात ? ती होईपर्यंत विभाग काय करतो ? रेहान मलीक दर्ग्‍याच्‍या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कसे काय उभे रहाते ? आणि वरती रहाण्‍यासाठी खोल्‍या कशा काय उभ्‍या रहातात ? असा प्रश्‍न या प्रसंगी ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी सर्व शिवप्रेमींसमोर बोलतांना उपस्‍थित केला.

या प्रसंगी माहिती देतांना हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्‍यक्ष श्री. गजानन तोडकर  म्‍हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पदस्‍पर्शाने पावन झालेल्‍या विशाळगडावर जे अतिक्रमण आहे, ते तात्‍काळ काढण्‍यात यावे, या प्रमुख मागणीसाठी श्री वाघजाईची आरती करून शिवप्रेमींनी साकडे घातले. या प्रसंगी ह.भ.प. शिरीष महाराज मोरे आणि हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्‍यक्ष श्री. नितीन शिंदे यांनी प्रशासनाला अतिक्रमण काढण्‍यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. हे अतिक्रमण न काढल्‍यास करसेवा करण्‍यात येईल, असेही सांगितले आहे.’’

सर्वच गडांवरील अतिक्रमणे हटवण्‍याविषयी पाठपुरावा घेणे आवश्‍यक ! – सागरभैय्‍या बेग, अध्‍यक्ष, राष्‍ट्रीय श्रीराम संघ

या प्रसंगी ‘राष्‍ट्रीय श्रीराम संघा’चे अध्‍यक्ष श्री. सागरभैय्‍या बेग म्‍हणाले, ‘‘सरकारने गड-दुर्ग संवर्धनासाठी ‘गड-दुर्ग संवर्धन समिती’ला दिलेल्‍या ८०० कोटी रुपयांच्‍या निधीतून काय कामे झाली ? याचा हिशेब द्यावा आणि त्‍या समितीकडून सर्वच गडांवरील अतिक्रमणांचा पाठपुरावा करावा.’’

क्षणचित्रे

१. महाराष्‍ट्रातील काना-कोपर्‍यांतून शिवप्रेमी भगवे झेंडे घेऊन ७ जुलैला पहाटेपासूनच गडावर येण्‍यास प्रारंभ झाला होता. शिवप्रेमींनी हातात विविध फलक धरले होते आणि अतिक्रमणाच्‍या विरोधात जोरदार घोषणा देण्‍यात आल्‍या.

२. मान्‍यवरांची भाषणे चालू झाल्‍यावर पाऊस थांबला. सर्वांची भाषणे पूर्ण होईपर्यंत पाऊस थांबलेलाच होता. यानंतर परत मुसळधार पाऊस चालू झाला. ‘हा श्री वाघजाईदेवीचा आशीर्वादच आहे’, असे शिवप्रेमींना जाणवले.

उपस्‍थित मान्‍यवर : बांदल घराण्‍यातील श्री. अनिकेत बांदल, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. अनिल दिंडे, सर्वश्री महेश विभुते, मानसिंग कदम, विशाल पाटील, आकाश पवार, सोहम कुर्‍हाडे उपस्‍थित होते.

संपादकीय भूमिका

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्‍यासाठी शिवप्रेमींना महाआरती करावी लागणे, हे प्रशासन आणि पोलीस यांना लज्‍जास्‍पद !