SANATAN PRABHAT EXCLUSIVE : ज्ञानवापी, भोजशाळा आदी प्रकरणात पक्षकार असलेल्‍या हिंदु नेत्‍याला शाळेने शिक्षक पदावरून काढले !

  • लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ‘सिटी माँटेसरी स्‍कूल’चा हिंदुद्वेष !

  • हिंदु मंदिरांना अतिक्रमणमुक्‍त करण्‍याच्‍या याचिकांमध्‍ये पक्षकार असल्‍याने, तसेच हिंदूंच्‍या धर्मांतराच्‍या विरोधात कार्यरत असल्‍याने शाळेला होता राग !

  • जगातील सर्वांत मोठी शाळा म्‍हणून बहुमान !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : येथील प्रसिद्ध सी.एम्.एस्.चे (सिटी माँटेसरी स्‍कूलचे) शिक्षक आणि प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. कुलदीप तिवारी यांना शाळेने नोकरीवरून काढल्‍याची घटना नुकतीच समोर आली आहे. तिवारी हे भोजशाळा, ज्ञानवापी, मथुरा आदी प्रकरणात हिंदु पक्षकार असल्‍याने, तसेच इस्‍लामी अतिक्रमणाच्‍या विरोधात त्‍यांनी सातत्‍याने आवाज उठवल्‍याने त्‍यांच्‍यावर ही टोकाची कारवाई करण्‍यात आली आहे.

हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. कुलदीप तिवारी

विशेष म्‍हणजे ‘जगातील सर्वांत मोठी शाळा’ असा बहुमान या शाळेला आहे. शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिका जयश्री कृष्‍णन् यांना ‘सनातन प्रभात’च्‍या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्‍यांनी बैठक असल्‍याचे कारण देत बोलायचे टाळले. त्‍यांना पुन्‍हा संपर्क केला असता त्‍यांनी भ्रमणभाष घेतला नाही. तसेच लक्ष्मणपुरीचे जिल्हाधिकारी सूर्यपाल गंगवार यांनी या प्रकरणात कोणती कारवाई केली का, यासाठी त्यांना संपर्क साधला असता त्यांचे स्वीय सचिव आशुतोष यांच्याशी बोलणे होऊ शकले, परंतु गंगवार यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही.

मुख्‍याध्‍यापिका जयश्री कृष्‍णन्

असा आहे हा धक्‍कादायक घटनाक्रम !

श्री. कुलदीप तिवारी यांनी लक्ष्मणपुरी येथील जिल्‍हाधिकार्‍यांना पत्र लिहून त्‍यांच्‍यावर केलेल्‍या अन्‍याय्‍य कारवाईची तक्रार केली आहे. तक्रारीची प्रत ‘सनातन प्रभात’कडे उपलब्‍ध असून त्‍यातील महत्त्वाची सूत्रे अशी :

१. श्री. तिवारी वर्ष २००९ पासून म्‍हणजे गेल्‍या १५ वर्षांपासून शाळेत शिक्षक या नात्‍याने कार्यरत आहेत.

२. स्‍वत: धर्मनिष्‍ठ हिंदू असल्‍याने ते प्रतिदिन शाळेत जातांना टिळा लावत. यासह त्‍यांनी शेंडीही ठेवली आहे. या कृतीला शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिका जयश्री कृष्‍णन् आणि उपमुख्‍याध्‍यापिका रिटा फ्‍लेमिंग या नेहमी विरोध करत अन् त्‍यांना नोकरीवरून काढण्‍याची चेतावणी देत असत. त्‍यांनी वेळोवेळी त्‍यांना कार्यालयात बोलावून त्‍यांचा अवमानही केला होता. तरी तिवारी यांनी या विरोधाला कधीच जुमानले नाही.

श्री. कुलदीप तिवारी यांनी केलेल्या तक्रारीची प्रत –

‘सनातन प्रभात’च्‍या प्रतिनिधीने यासंदर्भात तिवारी यांना विचारले असता ते म्‍हणाले की, माझ्‍यासारखेच धर्माचरण शाळेतील अन्‍यही काही शिक्षक करत होते, परंतु शाळा व्‍यवस्‍थापनाने त्‍यांच्‍यावर कारवाई करण्‍याची धमकी दिल्‍यामुळे त्‍यांनी धर्माचरण करणे सोडून दिले. ही शाळा अन्‍य शाळांच्‍या तुलनेत शिक्षकांना चांगला पगार देते, त्‍यामुळे उदरनिर्वाहाचे चांगले माध्‍यम सोडण्‍याचा कुणी विचार करत नाही. (ही घटना श्री. कुलदीप तिवारी यांची धर्मासाठी कोणत्‍याही स्‍तराला जाऊन त्‍याग करण्‍याची सिद्धता दर्शवते. असे हिंदूच हिंदु धर्माची खरी शक्‍ती होत. ‘धर्मो रक्षति रक्षित:।’ नुसार भगवंत त्‍यांचे रक्षण करेल, हे निश्‍चित आहे, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे ! – संपादक)

३. तक्रारीत पुढे म्‍हटले आहे की, तिवारी धार येथील भोजशाळा, मथुरा येथील श्रीकृष्‍णजन्‍मभूमी, तसेच वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणी हिंदु पक्षकार आहेत. त्‍यांनी स्‍थापन केलेली संस्‍था ‘जन उद़्‍घोष सेवा संस्‍थान’द्वारे ते राष्‍ट्रहिताची अनेक कार्ये करत आहेत. काही महिन्‍यांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘आदिपुरुष’मध्‍ये ‘श्रीरामचरितमानस’विषयी अयोग्‍य चित्रण केल्‍याच्‍या विरोधात त्‍यांनी अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाच्‍या लखनऊ खंडपिठात जनहित याचिका प्रविष्‍ट (दाखल) केली होती. त्‍यावर न्‍यायालयाने सुनावणीही केली होती. यासह शरियत कायदा हा राज्‍यघटनेच्‍या विरोधात असल्‍याचे सांगत त्‍यावर सर्वोच्‍च न्‍यायालयात प्रविष्‍ट याचिकेत तिवारी हे एक पक्षकार आहेत. हिंदूंचे धर्मांतर होऊ नये, यासाठी त्‍यांची संस्‍था जनजागृतीपर कार्यक्रम घेते. यामुळे शाळा व्‍यवस्‍थापनाचा त्‍यांच्‍यावर डोळा होता.

४. २९ ऑक्‍टोबर २०२३ मध्‍ये तिवारी यांच्‍या संस्‍थेने लक्ष्मणपुरीत काशी-मथुरा-भोजशाळा यांच्‍याविषयी जनजागृती करणारे भव्‍य आध्‍यात्मिक अन् सांस्‍कृतिक राष्‍ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्‍याला राष्‍ट्रीय स्‍तरावरील अनेक गणमान्‍य व्‍यक्‍तींनी भेट दिली आणि हिंदूंच्‍या समस्‍यांवर संबोधनही केले. या प्रदर्शनानंतर तिवारी यांना शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिकांनी ‘नोकरीचे त्‍यागपत्र द्या अथवा आम्‍हीच तुम्‍हाला काढू’, अशी चेतावणी दिली.

५. मार्च २०२४ मध्‍ये मध्‍यप्रदेशच्‍या धार येथील भोजशाळेचे न्‍यायालयाच्‍या आदेशाने सर्वेक्षण चालू झाले. त्‍या वेळी तिवारी तेथे उपस्‍थित राहिले, तसेच यासंदर्भात त्‍यांनी प्रसारमाध्‍यमांसमोर येऊन हिंदूंची भूमिकाही मांडली. यानंतर मात्र शाळा व्‍यवस्‍थापनाने तिवारी यांच्‍यावर थातूरमातूर आरोप करत त्‍यांना नोकरीवरून काढले. १ जुलै २०२४ ला त्‍यांना शाळेकडून त्‍याचे अधिकृत पत्र मिळाले. यावरून तिवारी यांनी ४ जुलैला लक्ष्मणपुरीच्‍या जिल्‍हाधिकार्‍यांना पत्र लिहून यासंदर्भात तक्रार केली आहे.

मुसलमान शिक्षकांचा भरणा असलेली आणि बहाई धर्माचा प्रसार करणारी ‘सिटी माँटेसरी स्‍कूल’ !

तिवारी यांच्‍याशी या घटनाक्रमाविषयी चर्चा करतांना अनेक धक्‍कादायक गोष्‍टी समोर आल्‍या. ‘सिटी माँटेसरी स्‍कूल’ या शाळेत बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. या शाळेत शहरातील तब्‍बल ६५ सहस्र मुले शिकतात. शहरात शाळेच्‍या २० ते २५ शाखा आहेत. शाळेची स्‍थापना जगदीश अग्रवाल यांनी केली असून त्‍यांनी इस्‍लामची शाखा असलेला बहाई पंथ स्‍वीकारला आहे. त्‍यांच्‍या शाळेतील बहुतेक शिक्षकवर्ग हा मुसलमान अथवा ख्रिस्‍ती पंथाचा आहे. त्‍यांच्‍या शाळेत इफ्‍तार पार्टीचे आयोजन केले जाते. बहाई पंथ हा इस्‍लाम पंथाचाच एक प्रकार असून शाळेद्वारे धर्मांतर करण्‍याचे प्रयत्न होत असल्‍याचे आरोपही करण्‍यात आले आहेत. त्‍यांना विदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा येतो. शाळा न्‍यायालयांच्‍या मुख्‍य न्‍यायाधिशांच्‍या परिषदा भरवते. यामध्‍ये ५० ते ६० देशांचे न्‍यायमूर्ती सहभागी होतात. काळ्‍या पैशाला पांढरा करण्‍यासाठीच हे प्रयत्न केले जात आहेत, असा गंभीर आरोपही तिवारी यांनी केला आहे. (सरकारने अशा शाळांचे अन्‍वेषण करून त्‍यांची अनुज्ञप्‍तीच रहित केली पाहिजे, अशी धर्मनिष्‍ठ हिंदूंची मागणी आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • एखाद्या खासगी शाळेच्‍या शिक्षकाने त्‍याच्‍या वैयक्‍तिक जीवनात काय करावे, हे सांगण्‍याचा शाळा व्‍यवस्‍थापनाला कोणता अधिकार ? हिंदुत्‍वाला खीळ बसवण्‍यासाठीच असे प्रकार केले जातात, हे लक्षात घ्‍या ! अशा शाळांच्‍या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवायला हवा !
  • हिंदुविरोधी ‘इकोसिस्‍टम’ (यंत्रणा) कशा प्रकारे कार्यरत आहे, हे सांगणारे हे जिवंत उदाहरण होय. हिंदूंच्‍या मुळावर उठलेल्‍या या षड्‍यंत्राला नेस्‍तनाबूत करण्‍यासाठी हिंदूसंघटन ही काळाची आवश्‍यकता आहे, हे जाणा !