ठोसेघर (सातारा) पर्यटनस्थळी हुल्लडबाजी केल्यास होणार कठोर कारवाई !
सातारा, ६ जुलै (वार्ता.) – ठोसेघर येथील धबधब्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस पहारा देण्यात आला आहे. पर्यटकांनी ठोसेघर धबधबा स्थळी संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि पोलीस यांनी घालून दिलेले नियम पाळावेत. मद्यप्राशन करून हुल्लडबाजी केल्यास संबंधित पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांनी दिली.
संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने ठोसेघर धबधबा पर्यटनस्थळी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुरक्षा रेलिंग, प्रेक्षक गॅलरी, प्रवाहाला तारेचे कुंपण, वाहन व्यवस्था, आपत्ती प्रतिसाद दल आदींचा समावेश आहे. तरी पर्यटकांनी स्वतःची काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि सातारा पोलीस दल यांच्या वतीने करण्यात आले आहे.