रथयात्रेमुळे वृद्धींगत होते श्री जगन्नाथाची कीर्ती !

आजपासून श्री जगन्नाथ यात्रा चालू होत आहे. त्या निमित्ताने…

हे जगन्नाथपुरीच्या श्री जगन्नाथा ।
काव्यरूपाने गाते तुझी भक्तीगाथा ।। १ ।।

सप्तपुरींपैकी एक असे जगन्नाथपुरी ।
सर्व भक्तांसाठी असे मोक्षदायिनी नगरी ।। २ ।।

श्री जगन्नाथपुरीत आहे भव्य कृष्ण मंदिर ।
गाभार्‍यात आहेत तीन दिव्य मूर्ती सुंदर ।। ३ ।।

तेथे विराजती श्रीकृष्ण, सुभद्रा आणि बलभद्र ।
प्रभुदर्शनासाठी सदैव व्याकुळ असे पुरीचा समुद्र ।। ४ ।।

सुश्री (कु.) मधुरा भोसले

मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण चार द्वारे ।
पूर्वेचे सिंहद्वार आणि पश्चिमेचे व्याघ्रद्वार ।। ५ ।।

मंदिराच्या उत्तरेला आहे हस्तीद्वार ।
आणि दक्षिणेला आहे अश्वद्वार ।। ६ ।।

श्री जगन्नाथाचे मंदिर बांधले इंद्रद्युम्न राजाने ।
श्री जगन्नाथाची भक्ती केली पुरीच्या प्रजेने ।। ७ ।।

भिल्ल विश्ववसूने केले तुझे भक्तीभावे पूजन ।
त्यामुळे तू झालास भिल्ल जमातीवर प्रसन्न ।। ८ ।।

पुरीधामात प्रगटलास नीलमाधवाच्या रूपाने ।
श्री जगन्नाथाची मूर्ती उजळली त्याच्या दिव्य तेजाने ।। ९ ।।

भक्त माधवदासाने केले तुझे भावपूर्ण नामसंकीर्तन ।
भावविभोर होऊन केले भक्त मणिदासाने भावनर्तन ।। १० ।।

भक्त धनंजय शर्मामुळे झाले साक्षी गोपाळाचे दर्शन ।
भक्त बेलाला भेटण्यासाठी आला साक्षात् नारायण ।। ११ ।।

करमाबाईची खिचडी असे जगन्नाथाला अत्यंत प्रिय ।
तिच्या भोळ्याभावाची कथा आहे अत्यंत लोकप्रिय ।। १२ ।।

पुरीच्या भक्तांची सेवा अहोरात्र करतो बिभीषण ।
हनुमान अखंड करतो श्री जगन्नाथपुरीचे रक्षण ।। १३ ।।

विमलादेवीच्या (टीप १) रूपाने वास करते साक्षात् पार्वतीमाता ।
भगवंताच्या मागोमाग आली श्रीमहालक्ष्मी माता ।। १४ ।।

तुझा नैवेद्य शिजतो सात भांड्यांमध्ये । (टीप २)
अवीट गोडी असते या दिव्य नैवेद्यांमध्ये ।। १५ ।।

नीलांचल पर्वत क्षेत्रात असतो तुझा नित्य वास ।
भक्तांची गर्दी उसळते तुला डोळा भरून पहाण्यास ।। १६ ।।

मंदिरावरती विराजनमान आहे धर्मध्वजासह सुदर्शनचक्र ।
त्यामुळे विश्वात गतीमान आहे धर्मसत्तेचे दिव्य चक्र ।। १७ ।।

लाखोंची गर्दी जमते पहाण्यास श्री जगन्नाथाची दिव्य मूर्ती ।
रथयात्रेमुळे वृद्धींगत होते श्रीजगन्नाथाची दिगंत कीर्ती ।। १८ ।।

श्री जगन्नाथाच्या नामाचा करून अखंड गजर ।
श्री जगन्नाथाशी एकरूप होऊन चैतन्य महाप्रभु झाले अजरामर ।। १९ ।।

• टीप १ – विमलादेवीच्या स्थापनेमागील रहस्य : ‘श्री जगन्नाथासाठी बनवलेला दिव्य नैवेद्य सर्व भक्तांना मिळावा’, यासाठी पार्वतीदेवीच्या ‘अन्नपूर्णा’ या रूपाने विमलादेवीचे रूप धारण करून श्री जगन्नाथपुरीमध्ये वास केला आहे. त्यामुळे आधी विमलादेवीला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर श्री जगन्नाथ हा नैवेद्य ग्रहण करतो.

• टीप २ – श्री जगन्नाथासाठी ७ भांड्यांमध्ये बनवलेल्या नैवेद्याच्या संदर्भातील एक सत्य चमत्कार ! : श्री जगन्नाथासाठी एकावर एक अशा ७ भांड्यांमध्ये नैवेद्य शिजवला जातो. तेव्हा पहिल्यांदा सर्वांत वरच्या भांड्यातील अन्न आधी शिजते, त्यानंतर त्याच्या खालील भांड्यातील अन्न शिजते. असे करत करत सर्वांत शेवटी चुलीवर ठेवलेल्या पहिल्या भांड्यातील अन्न शिजते. अशी ही नैवेद्य बनवण्याची दिव्य प्रक्रिया माता पार्वतीच्या कृपेने केवळ श्री जगन्नाथपुरीतील मंदिरातच घडते.

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.६.२०२४)