विमानशास्त्राचे जनक महर्षि भरद्वाज !

महर्षि भरद्वाज हे देवतांचे गुरु बृहस्पति यांचे पुत्र ! वैदिक ऋषींमध्ये महर्षि भरद्वाज यांचे स्थान अत्यंत उच्च आहे. ऋग्वेद, तसेच अथर्ववेदातही महर्षि भरद्वाज यांनी रचलेले मंत्र आहेत. चरक संहितेनुसार महर्षि भरद्वाज यांनी इंद्राकडून आयुर्वेदाचे आणि व्याकरणाचे ज्ञान प्राप्त केले होते. ब्रह्मदेव, बृहस्पति आणि इंद्र यांच्यानंतर चौथे व्याकरण प्रवक्ते म्हणजे महर्षि भरद्वाज आहेत. महर्षि भृगू यांनी त्यांना धर्मशास्त्राचे ज्ञान दिले. महर्षि भरद्वाज यांनी व्याकरण, आयुर्वेदासहित धनुर्वेद, राजनीतीशास्त्र, यंत्रसर्वस्व, अर्थशास्त्र, पुराण इत्यादी विषयांवर आधारित अनेक ग्रंथ लिहिले. ते शिक्षाशास्त्री, राजतंत्र मर्मज्ञ, अर्थशास्त्री, शस्त्रविद्या विशारद, आयुर्वेद विशारद, विधि वेत्ता, अभियांत्रिकी विशेषज्ञ आणि मंत्रद्रष्टा होते.

महर्षि भरद्वाज

विमानशास्त्राचे जनक !

विमानशास्त्राचे मुख्य जनक महर्षि भरद्वाज आहेत. महर्षि भरद्वाज अद्भूत प्रतिभासंपन्न विमानशास्त्री होते. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला, असे म्हटले जाते; परंतु राईट बंधूंच्या २ सहस्र ५०० वर्षांपूर्वी भरद्वाज ऋषींनी ‘विमानशास्त्र’ ग्रंथ लिहिला. केवळ माणसांना वाहून नेणारी विमानेच नव्हे, ‘विमानशास्त्रा’मध्ये अंतराळ यान, युद्ध करणारी विमाने, विमान अदृश्य करण्याचे शास्त्र आदीही उल्लेखांचे वर्णन केले आहे.

प्रयाग क्षेत्राची स्थापना करणारे महर्षि भरद्वाज !

महर्षि भरद्वाज यांनीच प्रयाग क्षेत्र वसवले होते. सर्वप्रथम महर्षि भरद्वाजच तेथे राहिले, त्यामुळे त्यांना पहिले प्रयागवासी मानले जाते. येथे त्यांनी धरतीवरील सर्वांत मोठ्या गुरुकुलाची, विश्वविद्यालयाची स्थापना केली आणि सहस्रो वर्षांपर्यंत त्यांनी विद्यादान केले.

महर्षि भरद्वाज आणि प्रभु श्रीराम यांची भेट !

प्रभु श्रीरामांच्या अलौकिक अवतारी कार्याचे प्रत्यक्ष साक्षीदार महर्षि भरद्वाज होते. प्रभु श्रीरामचंद्र जेव्हा १४ वर्षांच्या वनवासासाठी निघाले, त्या वेळी वाटेत त्यांची महर्षि भरद्वाज यांच्याशी भेट झाली. प्रभु श्रीराम वनगमनास निघाले. चालता चालता गंगा-यमुनेच्या संगमक्षेत्री ते येऊन पोचले. त्याच वेळी त्यांना आकाशात दूरवर धूर दिसला. तो पाहून श्रीराम बंधू लक्ष्मणाला म्हणाले, ‘‘येथेच मुनीवर भरद्वाजांचा आश्रम असावा.’’ बोलता बोलता श्रीराम, सीता, लक्ष्मण तिघेही महर्षि भरद्वाजांच्या आश्रमात येऊन पोचले. त्यांच्या चारही बाजूंनी हरणे, अन्य प्राणी, पक्षी, ऋषिमुनी आणि शिष्य बसलेले होते. तपस्येच्या सामर्थ्याने तिन्ही काळातील सर्व गोष्टी पहाण्याची दिव्यदृष्टी त्यांना प्राप्त झालेली होती. ते एकाग्रचित्त आणि त्रिकालदर्शी होते. महर्षींना पहाताच श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांनी हात जोडून त्यांना वंदन केले. प्रभु श्रीरामाच्या आगमनाने महर्षि भरद्वाज यांना अत्यंत आनंद झाला होता. त्यांनी श्रीरामप्रभूंना हृदयाशी धरले. ‘आपल्या सर्व सुकृतांचे फळ जणू विधात्याने आपल्याला आज प्रदान केले’, या विचाराने त्यांना अत्यानंद झाला. महर्षिंनी प्रभु श्रीरामांचे आतिथ्य केले.  ते विनम्रतेने प्रभु श्रीरामांना म्हणाले, ‘‘हे श्रीरामा, आज आपल्या दर्शनाने माझे मनोरथ सफल झाले. आज माझी तपश्चर्या, तीर्थयात्रा हे सर्व सुफल झाले आहे. आता कृपावंत होऊन आपल्या प्रती अपार भक्ती माझ्या मनात उत्पन्न करा. एवढाच वर मला द्या.’’

प्रभु श्रीरामाला निवासस्थान सांगणारे महर्षि भरद्वाज !

भरद्वाजांनी श्रीरामांना तिथेच रहाण्याची विनंती केली. यावर प्रभु श्रीराम म्हणाले, ‘‘आम्ही येथे आहोत, हे समजल्यावर अयोध्यावासी वारंवार आम्हाला भेटायला येतील. आमचा वनवास सफल होणार नाही. त्यामुळे अन्य एखादा एकांत प्रदेश, योग्य आणि उत्तम स्थान सांगावे.’’ त्यावर महर्षि भरद्वाज म्हणाले, ‘‘हे श्रीरामा, येथून काही अंतरावर परम पवित्र चित्रकूट पर्वत आहे. आपल्या वनवासासाठी तो योग्य आहे. तेथे आपण निवास करावा.’’ प्रभु श्रीरामांना चित्रकुट पर्वताचा निवास सांगणारे असे हे महान महर्षि भरद्वाज आहेत. चित्रकूट पर्वताची वाट चालतांना प्रभु श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, ‘‘चित्रकूटाचे स्थान माहात्म्य सांगून त्यांनी आपल्यावर मोठीच कृपा केली आहे.’’  १४ वर्षांच्या वनवास काळात अनेक अवतारी कार्ये करून वनगमन समाप्त होतांनाही प्रभु श्रीराम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भरद्वाज ऋषींच्या आश्रमात उतरले.

महर्षि भरद्वाज आणि भरत यांची भेट अन् आथित्य !

महर्षि भरद्वाज यांच्या आश्रमात प्रभु श्रीराम, सीता, लक्ष्मण

प्रभु श्रीरामाला परत आणण्यासाठी भरत चित्रकूट पर्वतावर जाण्यास निघाला. वाटेत प्रयागवनात महर्षि वसिष्ठांसमवेत महर्षि भरद्वाजांचे दर्शन घेण्यासाठी आश्रमात गेला. २ महर्षींची अनुपम्य भेट झाली. भरत प्रभु श्रीरामांना नेण्यासाठी आला आहे, हे महर्षि भरद्वाजांनी ओळखले. त्यांनी त्याला ‘‘येथून ८० मैलाच्या अंतरावर एक निर्जन वनात चित्रकूट पर्वतावर नदीकिनारी श्रीराम पर्णकुटीमध्ये रहात आहेत’’, असे दिशादर्शन केले. रामविरहाने व्याकुळ झालेल्या भरताच्या आतिथ्य-सत्कारासाठी भरद्वाजांच्या आज्ञेवरून विश्वकर्म्याने उत्तम महाल, राजपरिवारासाठी सुंदर भवने, सैनिकांसाठी छोटी भवने आणि त्यांच्या हत्ती घोड्यांसाठी पागा सिद्ध केल्या. जणू तेथे छोटी नगरीच वसवली होती. सर्व प्रकारचे दिव्य रस, दिव्य भोजन आणि दिव्य वस्त्रे प्रस्तुत केली. त्या सर्वांचा आस्वाद घेत सर्व सैन्यही तृप्त झाले. मातांचा परिचय करून देतांना भरताला गहिवरून आले. कैकयीमातेची उपेक्षा करत तो बोलत होता. त्याचे कटू शब्द ऐकल्यानंतर महर्षि भरद्वाज अतिशय शांतपणे त्याला म्हणाले, ‘‘भरता ! जीवन-मृत्यू हे सारे प्रारब्धाच्या अधीन असते. दैवाच्या करणीपुढे, भगवंताच्या लीलेपुढे कुणाचेच काही चालत नाही. कैकेयी केवळ निमित्त आहे. साक्षात् सरस्वतीनेच कैकेयीची, तुझ्या मातेची बुद्धी फिरवून तिच्याकडून हे वदवून घेतले आहे. त्यामागे मोठेच अवतारी रहस्य दडलेले आहे. श्रीरामांच्या वनात जाण्यामुळे देवता, दानव, ऋषिमुनी, तसेच समस्त विश्व यांचे हितच साधले जाणार आहे. या विश्वात जे जे काही मंगल, कल्याणकारी आहे, ते म्हणजे रघुवीर श्रीरामांच्या चरणी स्नेह आणि भक्ती असणे होय. तू भाग्यवान आहेस. शोक आवर. रामरूपी भगवंताच्या लीलेची वाट पहा.’’ भरताला उपदेश करतांना स्वतः महर्षि भरद्वाजांचे मन रामभक्तीने भरून आले होते. भरत आपल्या बंधूप्रेमाने गद्गद्ला होता. प्रभु श्रीरामांच्या स्मरणाने दोघांच्याही देहावर रोमांच उभे राहिले होते. दोघेही प्रभूंच्या स्मरणाने, त्यांच्या प्रतीच्या अपार भक्तीने भारावले होते. देवता दोघांवरही पुष्पवृष्टी करत होत्या !

(संदर्भ : भक्तीसत्संग, सनातन संस्था)