ऋषिऋण फेडण्याचा सोपा मार्ग म्हणजे ऋषींचे आज्ञापालन करणे !
१. मनुष्य आणि देवता यांच्यामधील दुवा म्हणजे ऋषी !
‘पितृऋण, समाजऋण, ऋषिऋण आणि देवऋण फेडणे’, हा मनुष्याचा धर्म आहे. पितर आणि समाज यांच्याशी आपले नाते असल्याने आपल्यावरील त्यांच्या ऋणांची आपल्याला थोडीफार कल्पना असते. देवभक्तीमुळे देवऋणाची कल्पना करता येते; मात्र ऋषींचे कार्य बुद्धीअगम्य असल्याने कलियुगात ऋषिऋणाचे महत्त्व मानवाच्या लक्षात येत नाही. धर्माचे जे जे ज्ञान पृथ्वीवर उपलब्ध आहे, त्याचे कर्ता-धर्ता ऋषि आहेत. ऋषींमुळे केवळ ‘सण, व्रत, परंपरा, पंचांग, तिथी, पूजाविधी, यज्ञ-याग, होम-हवन, ज्योतिष, वास्तू, आयुर्वेद या विषयांचेच ज्ञान मानवाला मिळाले का ? नाही ! खरेतर मनुष्य आणि देवता यांच्यामधील दुवा म्हणजे ऋषि होय. ऋषींमुळे ‘देवता म्हणजे कोण ? त्या कशा दिसतात ? अवतार म्हणजे कोण ? ब्रह्मांड म्हणजे काय ?’, अशा अनेक गोष्टी मानवाला समजल्या.
२. ऋषींनी साधकांना दिलेले ‘ज्ञानामृत, आनंदामृत आणि मार्गदर्शन’, यांबद्दल त्यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच असणे
कलियुगात सर्वसामान्य माणसाला ऋषींचा सहवास लाभणे अशक्य आहे. असे असतांना सनातनच्या साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या कृपेमुळे नाडीवाचनाच्या माध्यमातून सप्तर्षींचा सत्संग लाभला आहे. ऋषींनी सनातनच्या साधकांना वेळोवेळी ज्ञानामृत दिले आहे. त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा जन्मोत्सव साजरा करायला सांगून साधकांना आनंदामृत दिले आहे आणि कठीण परिस्थितीत गुरूंवर श्रद्धा ठेवण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले आहे. त्याबद्दल आम्ही साधकांनी ऋषींविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
३. ऋषिऋण फेडण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्यांचे आज्ञापालन !
गेल्या ९ वर्षांमध्ये सनातनच्या तिन्ही गुरूंनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी) ‘ऋषींचे आज्ञापालन कसे करायचे ?’, याचे सर्वाेत्तम उदाहरण आपल्या सर्वांसमोर ठेवले आहे. सनातनच्या तिन्ही गुरूंचा आदर्श समोर ठेवून आपण ऋषींचे आज्ञापालन करूया आणि नाडीवाचनाच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ करून घेऊया !’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४१ वर्षे), कांचीपूरम्, तमिळनाडू. (४.७.२०२४)