खगोलशास्त्राचे जनक महर्षि अत्रि !
ब्रह्मदेवाच्या १० मानसपुत्रांपैकी एक म्हणजेच अत्रि ऋषि ! अत्रि ऋषींची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या नेत्रांपासून झाली आहे, असे पौराणिक संदर्भ आहेत. ज्यांच्यात सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण नाहीत, म्हणजेच जे या त्रिगुणांच्याही पलीकडे आहेत, ते अत्रि !
महर्षि अत्रि यांचे वैदिक कार्य !
महर्षि अत्रि हे वैदिक काळातील सूक्तद्रष्टा होते. ऋग्वेदाच्या, पाचव्या मंडलातील ३७ ते ४३ आणि ७६, ७७, ही सूक्ते त्यांनी रचली. वाग्देवी आणि प्रजापती यांचे हे पुत्र होत. त्यांनी सांगितले, ‘‘वैदिक मंत्रांच्या अधिकारपूर्वक जपाने सर्व प्रकारच्या पाप-क्लेशांचा विनाश होतो. पठणकर्ता पवित्र होतो. त्याला जन्मांतरीय ज्ञान होते.’’ अत्रि ऋषींनी समाजाला ‘सदाचार आणि धर्माचरणपूर्वक उत्तम जीवनचर्या कशी असावी ?’ हे सांगून प्रेरणा दिली. ‘मानवाचे जीवनातील कर्तव्य काय असावे ?’ याविषयी उपदेश केला. मानवाला केलेल्या या मार्गदर्शनाची सूत्रे ‘आत्रेय धर्मशास्त्र’ या नावाने ओळखली जातात. यामध्ये त्यांनी वेदांमधील सूक्ते आणि मंत्र यांचे माहात्म्यही सांगितले. महर्षि अत्रींनी एवढे प्रचंड कार्य केले आहे, त्याची आपण कल्पना करू शकणार नाही.
(संदर्भ : भक्तीसत्संग, सनातन संस्था)
प्रायश्चित्त कर्म सांगून समाजाचा उद्धार करणारे महर्षि अत्रि !
अत्रिसंहितेत योगविषयक विचार मांडले आहेत. यामध्ये ९ अध्याय असून यामध्ये योग, जप, कर्मविपाक, प्रायश्चित्त इत्यादी विषयांचे विवरण आहे. पापक्षालनासाठी ‘प्रायश्चित्त’ हा उपाय देऊन महर्षि अत्रि यांनी पापी माणसालाही पुण्यमार्ग दाखवला आहे. एकदा चूक केली की, व्यक्ती कायमची गुन्हेगार ठरत नाही. तिला सुधारण्यास वाव असतो, हा विश्वास त्यांनी दिला. महर्षि अत्रींनी ‘पर्जन्यसूक्त’ रचले.
– स्वाती आलूरकर (साभार : मासिक ‘मनशक्ती’, मार्च २००५)
खगोलशास्त्राचे जनक !
तपस्वी महर्षि अत्रींनी खगोलशास्त्रविषयक शोधही लावले होते. ते प्रथम खगोलशास्त्रज्ञ होते. आज विज्ञानाने अनेक उपकरणांचा आधार घेऊन असे शोध लावले; परंतु अत्रि ऋषींच्या तपःसामर्थ्यामुळेच त्यांना झालेल्या अंतःप्रेरणेने प्राप्त झालेल्या दिव्य दृष्टीने सूर्यग्रहणाविषयीचे ज्ञान अखिल मानवजातीला झाले.
(संदर्भ : भक्तीसत्संग, सनातन संस्था)
भर दुपारी सूर्य काळवंडू लागला. तो निस्तेज झाला. हे पाहून लोक भयभीत झाले. त्यांना वाटले, ‘परमेश्वराचा कोप झाला.’ निसर्गातील या चमत्कारसदृश घटनेचा अभ्यास करून, एका माहात्म्याने यामागचे रहस्य लोकांना समजावून सांगितले. तो म्हणाला, ‘‘हे सूर्यग्रहण आहे. काही घंट्यांत सूर्य यातून बाहेर पडेल अन् पूर्ववत् प्रकाशमान दिसेल.’’ तसेच घडले. लोकांनी त्या माहात्म्याचा जयजयकार केला. त्यांचे नाव होते महर्षि अत्रि !
स्वरभानु नावाच्या असुराने मायावी शक्तीने सूर्याला झाकले आणि लोकांना सांगितले, ‘‘आता सूर्य केव्हा प्रकाशमान होणार ? ते अत्रींना विचारा.’’ त्यांनी इंद्राच्या साहाय्याने, स्वरभानूचे मायावी सोंग उघडे पाडले.
(संदर्भ : भक्तीसत्संग, सनातन संस्था)
भ्रष्ट राजसत्तेला पदभ्रष्ट केले पाहिजे ! – महर्षि अत्रि
‘अविचारी, अविवेकी राजांना पदभ्रष्ट केले पाहिजे’, हे मत अत्रि यांनी समाजमनावर बिंबवले. जनतेला तिच्या अधिकारांची जाणीव करून दिली. राजसत्तांनी मात्र या मतांचा त्या वेळी धिक्कार केला. महर्षींना कारागृहात टाकले. त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला; तरीही त्यांनी माघार घेतली नाही. त्यांचे असह्य कष्ट पाहून साक्षात् अश्विनीदेवांनी त्यांना साहाय्य केले.
वनवासकाळात राम, लक्ष्मण आणि सीता यांनी अत्रि ऋषींच्या आश्रमाला भेट दिल्याचे उल्लेख वाल्मिकी रामायणात आहेत. अत्रि ऋषींनी त्यांना पुढील मार्गक्रमणाविषयी माहिती दिली. – स्वाती आलूरकर (साभार : मासिक ‘मनशक्ती’, मार्च २००५)
अनसूयेच्या पातिव्रत्याची परीक्षा !
अत्रि ऋषि आणि पत्नी अनसूया यांनी दीर्घकाल निरंतर तपस्यादी साधना केली. त्यांच्या या तपश्चर्येने साक्षात् ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे तिन्ही देव त्यांच्यापुढे प्रगट होऊन त्यांनी त्यांच्या घरी पुत्ररूपात जन्म घेण्याचे त्यांना वरदान दिले. लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती या ३ शक्तींनी जगाला अनसूयेचे पातिव्रत्य दाखवून देण्यासाठी लीला केली. त्रिदेव अनसूयेची सत्त्वपरीक्षा घेण्याची ही लीला करण्यास पृथ्वीलोकी आले. त्रिदेवांनी ब्राह्मणाची रूपे घेतली आणि ते दुपारी अत्रि ऋषींच्या आश्रमात गेले. ते अतिथी तिला म्हणाले, ‘‘आम्ही तुझ्याकडे इच्छाभोजनासाठी आलो आहोत. तुझ्या सौंदर्याची ख्याती ऐकून आम्ही अत्यंत लांबून आलो आहोत. तेव्हा तू विवस्त्र होऊन आम्हाला अन्न वाढावेस.’’ अनसूया पतीकडे गेली.
महर्षी अत्रि यांनी पत्नीला एका पंचपात्रात गंगोदक देऊन ते म्हणाले, ‘‘हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर शिंपड आणि त्यांना इच्छाभोजन दे.’’ महर्षी अत्रि यांनी दिलेले गंगोदक तिने त्या तिघांवर शिंपडले. त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले. त्या वेळी तिच्यातील मातृत्व आणि वात्सल्य जागृत झाले. तिला पान्हा फुटला. तिने त्यांना स्तनपान करवले. त्यांची क्षुधा निवारण केली. अनसूयेच्या पातिव्रत्याचा असा हा चमत्कार झाला !
अशी कित्येक युगे लोटली. एकदा नारदमुनी महर्षि अत्रि यांच्या आश्रमात आले. त्यांनी ब्रह्मा-विष्णु-महेश त्या ३ बालकांच्या रूपात असतांना पाहिले. त्यांनी हे त्रिदेवींना सांगितले. तिन्ही देवी व्याकुळ होऊन अनसूयेकडे गेल्या. त्यांनी अनसूयेची क्षमाही मागितली. त्यामुळे अत्रि ऋषींनाही करूणा आली. त्यांनी लगेच त्या तिन्ही बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा त्या बालकांमधून ब्रह्मा-विष्णु-महेश प्रगटले. साक्षात् त्रिदेव पुनश्च प्रगट झाले.
दत्तात्रेयांचे अवतारधारण !
‘३ शिरे, सहा हात, वदनावरती मधुर हास्य आणि तेजस्वी अंगकांती असलेले’ असे ते दिव्य बालक होते. हेच ते परमवंदनीय दत्तरूप ! त्या बालकाचे अत्यंत तेजोमय आणि दिव्य रूप पाहून सती अनसूयेला अन् अत्रि ऋषींना अत्यानंद झाला. त्रिमूर्तीस्वरूप दत्तदिगंबर ज्यांच्या अपार तपःसाधनेमुळे हे भगवंताचे अवतारधारण झाले, त्यांच्याप्रती आपण किती कृतज्ञ रहायला हवे ?
(संदर्भ : भक्तीसत्संग, सनातन संस्था)