सृष्टीनिर्माणकर्ते महर्षि कश्यप !
ब्रह्मदेवाच्या १० मानसपुत्रांपैकी एक मरिची ! मरिची आणि कर्दमकन्या ‘कला’ यांचे पुत्र म्हणजेच महर्षि कश्यप ! महर्षि कश्यप हे सध्या चालू असलेल्या वैवस्वत मन्वंतरातील सप्तर्षींपैकी प्रथम ऋषि आहेत.
महर्षि कश्यप यांच्यापासून या मन्वंतरातील सृष्टीच्या उत्पत्तीचे कार्य चालू होते. महर्षि कश्यपांचा विवाह दक्ष प्रजापतीच्या कन्यांशी झाला. या कन्यांपासून कश्यपांना जी संतती प्राप्त झाली, तीच समस्त सजीव सृष्टी आहे. कश्यपांची पत्नी ‘अदिती’पासून इंद्रादि अनेक देवतांची उत्पत्ती झाली. दुसरी बलशाली पत्नी ‘दिती’पासून हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष यांसारखे दैत्य, कश्यपांची तिसरी पत्नी ‘दनू’ हिच्यापासून दानव उत्पन्न झाले. पत्नी ‘क्रोधा’ हिच्या कन्यांपासून गायी, अश्व, सिंह, वाघ, वानर, किन्नर, श्वान, तसेच मोर, हंस आदि सर्व प्राणीसृष्टी उदयास आली. यातील वानरांच्या वंशपरंपरेत पुढे अंजनीने वायूपासून महाबली हनुमंताला जन्म दिला. भार सहन करणारी पत्नी ‘विनता’पासून गरूड, अरूण आदी ६ पुत्र उत्पन्न झाले. ‘कद्रु’ हिच्यापासून सर्प, तसेच शेषनाग, वासुकी आदी ९ नागांची उत्पत्ती झाली. ‘सुपर्णा’ ही सर्व पक्ष्यांची जननी होती. परोपकारी पत्नी ‘इरा’ हिच्या वंशात पुढे वनस्पती, वृक्ष-वेली यांची उत्पत्ती झाली. कश्यप ऋषींच्या अन्य पत्नींपासूनही विविध प्रकारची जीवसृष्टी निर्माण झाली. मनुष्य, गंधर्व, नभचर, जलचर, वनस्पती यांचाही त्यात समावेश होता. महर्षि कश्यपांचे संपूर्ण सृष्टीवर अनंत उपकार आहेत.
महर्षि कश्यपांपासून सृष्टी निर्माण झाल्याने आपल्या संस्कृतीत असा नियम आहे की, ज्याला गोत्र आठवत नसेल अथवा ठाऊक नसेल, तो अगदी नि:संकोचपणे त्याचे गोत्र ‘कश्यप’ म्हणून सांगू शकतो !
(संदर्भ : भक्तीसत्संग, सनातन संस्था)
देवतांना जन्म देणारे महर्षि कश्यप !
ब्रह्मांडात ३३ कोटी देवतांना निर्गुणातून प्रत्यक्ष सगुणात साकार केले. साक्षात् भगवंत ज्यांच्या पोटी येतो, त्यांचे सामर्थ्य किती अफाट असेल ?
महर्षि कश्यप त्रिकालज्ञानी होते. भगवंताच्या लीला त्यांनी आधीच जाणल्या होत्या. भगवंताने जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जन्म घेतला, त्या प्रत्येक वेळी त्यांना दिव्य चतुर्भुज रूपात दर्शन दिले.
(संदर्भ : भक्तीसत्संग, सनातन संस्था)
विद्या आणि तपशक्ती !
महर्षि कश्यप यांनी त्यांचा निवास असलेल्या अर्बुद पर्वताच्या परिसरात अत्यंत घोर तप केले. तेथे त्यांनी ‘शालिग्राम’ नावाचा आश्रम स्थापन केला. येथे अनेक जण साधना करण्यासाठी येत. महर्षि कश्यपांनी अनेक शिष्यांना सिद्ध करून समाजात पाठवले. काव्य, नाटक, दर्शनशास्त्रे, स्मृतीग्रंथ इत्यादींमध्ये कश्यपांनी संस्कृत साहित्याची निर्मिती केली.
ऋग्वेदातील विविध मंडलांमध्ये कश्यपरचित सूक्ते आहेत. कश्यपसंहिता, कश्यपोत्तर संहिता, कश्यपस्मृती आणि कश्यपसिद्धांत हे त्यांचे ४ ग्रंथ होत. कश्यपांनी अग्नीची कठोर उपासना करून विद्या प्राप्त केली. वेद, यंत्र, शस्त्र अनेक विद्यांमध्ये ते निपुण होते. विद्या आणि तपशक्ती यांच्या बळाने समाजाला सुसंस्कृत करण्याचा वसाच त्यांनी घेतला होता.
– स्वाती आलूरकर (साभार : मासिक ‘मनशक्ती’, मार्च २००५)
भगवान परशुरामांचे गुरु महर्षि कश्यप !
कश्यप महर्षि यांनी घडवलेली एक महाशक्ती, म्हणजे मूर्तीमंत तेज म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून भगवंताचा सहावा अवतार साक्षात् परशुराम होता ! त्याचे गुरु होऊन महर्षि कश्यपांनी त्यांना घडवले, तसेच विद्यासंपन्न केले. भगवान परशुरामांनी महर्षि कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली शंकराची भक्ती करून अनेक विद्या प्राप्त केल्या.
(संदर्भ : भक्तीसत्संग, सनातन संस्था)
पृथ्वीसंहार थांबवण्यासाठी भगवान परशुरामांचा क्रोध आवरणारे महर्षि कश्यप !
क्षत्रियांशी घनोघर युद्ध करून२१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करणार्या संतापलेल्या महापराक्रमी परशुरामाला थोपवणे अत्यंत अवघड गोष्ट होती. हे करू शकेल, अशी एकच व्यक्ती भूतलावर होती. ती म्हणजे महर्षि कश्यप ! कश्यपांनी आपल्या लाडक्या शिष्याच्या पाठीवरून प्रेममय हात फिरवला. गुरूंना पहाताच परशुरामाचे लोहाचे अंतःकरण लोण्यासारखे स्निग्ध झाले. त्यांनी विचारले, ‘‘गुरुदेवा, ही जिंकलेली सारी पृथ्वी मी तुमच्या चरणी वाहिली आहे.’’
त्यावर महर्षि कश्यप म्हणाले, ‘‘या पृथ्वीतलावर रहाण्याचा तुला हक्क नाही. परशुरामा, क्षत्रियांच्या चुकीचे शासन आता पूर्ण झाले. हा संहार थांबव ! ही पृथ्वी मला दान कर.’’ हे ऐकून परशुराम म्हणाला, ‘‘मग मी कुठे जाऊ ?’’ त्यावर महर्षि कश्यप म्हणाले, ‘‘तू नवीन सृष्टीनिर्मितीसाठी दक्षिणेकडे सह्याद्रीजवळ जा. जेथे सागर आणि पर्वत सतत लढत आहेत तिथे जा. नवी भूमी निर्माण कर. तुझ्यातील तेजस्विता कामी लाव. येथून ब्राह्मण कुटुंबे घेऊन जा.’’
२१ वेळा निःक्षत्रिय केलेल्या पृथ्वीची पुनर्रचना करणारे महर्षि कश्यप !
क्षत्रियांच्या अधःपतनामुळे आणि संहारामुळे विस्कटलेली समाजाची घडी पुन्हा सुरळीत करण्याचे कार्य महर्षि कश्यपांनी हाती घेतले. उरल्यासुरल्या क्षत्रियांना त्यांनी एकत्र केले. वैश्यांची प्रगती घडवून, त्यांच्यात क्षात्रगुण निर्माण केला. सामान्य माणसाला ज्ञान देऊन सुसंस्कृत केले. विद्यार्जनासाठी आश्रम स्थापन केले. – स्वाती आलूरकर (साभार : मासिक ‘मनशक्ती’, मार्च २००५)
महर्षि कश्यप यांनी पृथ्वीची, भारताची पुनर्रचना केली. पुनर्रचनेचे हे कार्य अत्यंत कठीण आहे ! लोकांमध्ये तेजस्वी विचार, तेजस्वी वृत्ती निर्माण केली. पुन्हा आश्रम निर्माण केले. तेजस्वी ब्राह्मण उभे केले. क्षत्रियांची सत्ता उभी केली. मृतवत् जीवन जगणार्या मानवांना परत जिवंत केले. समाजाची पुनर्रचना केली. (संदर्भ : भक्तीसत्संग, सनातन संस्था)
समाजस्थैर्याचे कार्य पूर्ण होताच, त्यांनी स्वतःला त्यापासून अलिप्त केले. एक ज्ञानसोहळा आयोजित करून त्यांनी ब्राह्मण, ऋषि आणि सामान्यजन यांना एकत्र केले. वैभवशाली, स्थिर, शांत संस्कृतीचे आपले ज्ञानभांडार त्यांनी जनसमुदायासमोर रिते केले. सारी सृष्टी सप्तर्षींपैकी वसिष्ठ आदी अन्य ६ ऋषींना देऊन टाकली आणि स्वत: तपश्चर्येसाठी निघून गेले.’
– स्वाती आलूरकर (साभार : मासिक ‘मनशक्ती’, मार्च २००५)
या महात्म्याला ‘प्रजापती’ म्हणून गणले जाते. या महर्षि कश्यपरूपी दिव्य गुरुतत्त्वाला आपण कोटी कोटी नमन करूया !