वर्ष २०२३ आणि वर्ष २०२४ च्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवां’साठी आध्यात्मिक उपाय करतांना जाणवलेला भेद !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. ‘जून २०२३ मधील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’

‘जून २०२३ मध्ये ७ दिवस झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये आलेले अडथळे दूर करण्यासाठी मी आध्यात्मिक उपाय केले. तेव्हा लक्षात आले, ‘येणारे अडथळे हे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे जे ध्वनीचित्रीकरण झाले, ती सर्व माहिती संगणकाच्या ‘सर्व्हर’मध्ये घेण्यामध्ये, तसेच त्या माहितीतील महत्त्वाच्या माहितीचे छोटे छोटे (१ मिनिटाचे) ‘व्हिडिओ’ (चलचित्रपट, म्हणजे ‘रिल’) ‘यु ट्युब’वर, तसेच अन्य ‘सोशल प्लॅटफॉर्म’वर प्रसारित करण्यामध्ये प्रतिदिन अडथळे येत होते. यावरून ‘वाईट शक्ती वायुतत्त्वाच्या स्तरावर लढत होत्या’, असे लक्षात आले. आध्यात्मिक उपाय केल्यावर ते अडथळे ५ – १० मिनिटांत दूर व्हायचे. प्रत्यक्ष शिबिरामध्ये मात्र कोणतेही अडथळे आले नाहीत, तसेच शिबिरात सहभागी झालेल्या संतांनाही कोणताही त्रास जाणवला नाही.

२. ‘जून २०२४ मधील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’

सात दिवस झालेल्या या महोत्सवात मार्गदर्शन करणारे संत आणि साधक यांवर वाईट शक्तींची आक्रमणे झाली. काही संत महोत्सवाच्या कालावधीत ताप आणि घसा दुखून १ – २ दिवस आजारी पडले, तर काहींना अपचनाचे त्रास झाले. तसेच साधक मार्गदर्शनासाठी व्यासपिठावर आल्यावर वाईट शक्ती काही साधकांवर त्रासदायक शक्तीचे आवरण आणत होत्या. संत आणि साधक यांवर आध्यात्मिक उपाय केल्यावर ते या त्रासातून बाहेर पडत. याउलट या वर्षी माहितीच्या प्रसारणामध्ये कोणतेही अडथळे आले नाहीत.

यातून लक्षात येते, ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होत असलेल्या यावर्षीच्या (वर्ष २०२४ च्या) बाराव्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये वाईट शक्तींना वायुतत्त्वाच्या स्तरावर आक्रमण करता आले नाही. यावरून ‘वाईट शक्तींचा जोर आता अल्प झाला आहे’, असे लक्षात येते. हे ‘तिसरे महायुद्ध जवळ आले आहे आणि वाईट शक्तींचा प्रत्यक्ष लढण्याचा काळही आता जवळ आला आहे’, यांचे द्योतक आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि ईश्वर यांच्या कृपेनेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संत, साधक आणि हिंदुत्वनिष्ठ हा लढा लढत आहेत. यासाठी गुरुदेव आणि ईश्वर यांच्या चरणी आपण कृतज्ञता व्यक्त करूया.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.६.२०२४)