संपादकीय : अहंकारामुळे सुनक यांचा पराभव !
सत्ता येण्यापूर्वी विविध पक्ष विविध आश्वासने देतात; मात्र सत्ता आल्यानंतर तीव्र अहंकार वाढल्याने सत्ताधारी मनमानी पद्धतीने वागू लागतात. अशा सत्ताधार्यांना वेळोवेळी खाली खेचण्याचे काम लोकशाहीतील जनतेने वारंवार केले आहे. हे आजपर्यंतच्या इतिहासात पाहिले गेले आहे. असा प्रकार नुकत्याच ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकीत पहायला मिळाला. गेली १४ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर हुजूर (कंझर्व्हेटिव्ह) पक्षाचा दारुण पराभव नुकताच झाला आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखाली यंदा हुजूर पक्षाचा पराभव झाला. हुजूर पक्षाची सत्ता संपुष्टात आणणारे मजूर पक्षाचे नेते किर स्टार्मर हे आता ब्रिटनचे पंतप्रधान होणार आहेत. मानवी हक्कांचे संरक्षण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
पराभवामागील कारणे
देशातील अनेक जटील प्रश्न सोडवण्यात आलेले अपयश, सातत्याने नेतृत्व पालट, पक्षांतर्गत मतभेद, पक्षफुटी, महागाईवर नियंत्रण न मिळवणे, गुन्हेगारीत वाढ, अनेक प्रकारची करवाढ अशा अनेक कारणांमुळे या पक्षाला ब्रिटनच्या जनतेने सत्तेतून खाली खेचले. अर्थव्यवस्थेच्या स्थितीपासून आरोग्यसेवेपर्यंत पक्षाची सत्ता गमावण्याची काही प्रमुख कारणे आहेत. सुनक सरकारच्या पराभवाचे सर्वांत महत्त्वाचे कारण, म्हणजे गेल्या काही वर्षांत ब्रिटनमध्ये आलेल्या आर्थिक संकटांची मालिका ! ऋषी सुनक ब्रिटनमधील आर्थिक व्यवस्था सुरळीत करण्यात अपयशी ठरले. अर्थव्यवस्थेच्या मंदीमुळे ब्रिटन त्रस्त असून इतर मोठ्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत देश पुष्कळ वाईट कामगिरी करत आहे. ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर ते सर्वांत प्रथम महागाई नियंत्रणात आणतील, अशी अपेक्षा होती; पण तसे झाले नाही. वस्तू महाग झाल्या. लोकांचा खर्च झपाट्याने वाढला. त्यामुळे लोकांमध्ये सुनक सरकारविषयी चीड निर्माण झाली. सार्वजनिक सेवा कोलमडल्या आहेत. ‘राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा’ ही आरोग्यसेवा निधीच्या संकटामुळे कोलमडली आहे. सामान्य नागरिकांना वेळेवर आणि स्वस्त आरोग्य सेवा मिळणे कठीण होत आहे, ज्यामुळे हुजूर पक्षाच्या विरोधात संताप निर्माण झाला आहे. निर्वासितांची समस्या हाताळण्यातही हुजूर पक्ष अपयशी ठरला. सुनक सरकारला गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी घटना रोखण्यात अपेक्षित यश मिळाले नाही.
सुनक यांच्या महागड्या जीवनशैलीवर प्रश्नचिन्ह !
जुलै २०२३ मध्ये सुनक स्कॉटलंडच्या दौर्यावरून परतल्यानंतर ते ‘बीबीसी रेडिओ’ला मुलाखत देत होते. निवेदकाने त्यांना प्रश्र विचारला की, तुम्ही नेहमी हवामान पालट थांबवण्याविषयी बोलता. दुसरीकडे देशांतर्गत प्रवास करण्यासाठी खासगी जेटही वापरता. याचा परिणाम कार्बन उत्सर्जनावरही होतो. या प्रश्नावर सुनक संतापून म्हणाले, ‘‘मला माझ्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे. या प्रश्नावर उपाय सांगितल्यास बरे होईल.’’ सुनक यांच्या या महागड्या अशा जीवनशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. ते अर्थमंत्री असतांनाही त्यांच्या महागड्या जीवनशैलीमुळे त्यांच्यावर अनेकदा टीका झाली होती. वर्ष २०२० मध्ये ते २० सहस्र रुपयांच्या कॉफी मगसमवेत दिसले होते. सुनक यांनी वर्ष २०२२ मध्ये एका आठवड्यात खासगी जेट प्रवासासाठी ५ कोटी रुपयांहून अधिक सरकारी पैसे खर्च केले होते. त्यामुळे करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप विरोधक करत होते. ब्रिटनमधील जनता महागाईच्या झळा सोसत असून ऋषी सुनक हे सर्वसामान्यांच्या पैशांवर चैनीचे जीवन जगत असल्याचे सूत्र विरोधकांनी अनेक वेळा उपस्थित केले होते. वर्ष २०२३ मध्ये सुनक आणि अक्षता यांच्या संपत्तीत १ सहस्र २०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ६८ सहस्र कोटी रुपयांवर गेली. सुनक आणि अक्षता हे ब्रिटनच्या महाराजांपेक्षा श्रीमंत आहेत. मजूर पक्षानेही अक्षता मूर्ती यांच्यावर करचुकवेगिरीचे आरोप केले आहेत. सुनक पंतप्रधान असतांनाही त्यांच्यावर हा आरोप करण्यात आला होता. ‘द गार्डियन’च्या म्हणण्यानुसार ‘लोक सुनक यांच्या दैनंदिन जीवनात त्यांच्या संपत्तीची झलक पहात राहिले.’ यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली की, सुनक त्यांच्या समस्या समजून घेऊ शकत नाहीत. जे त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.
स्टार्मर यांच्या सरकारमुळे भारतियांना लाभ !
ब्रिटनमधील कराचे दर ७० वर्षांतील सर्वोच्च आहेत. जनतेवर व्यय करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी ब्रिटनच्या सेंट्रल बँकेने व्याजदरात वाढ केली. यामुळे महागाई अल्प झाली; पण ब्रिटीश सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याजात वाढ झाली. व्याजदर ५ टक्क्यांहून अधिक झाले. सुनक यांचे सरकार प्रतिवर्षी ४० अब्ज पौंड कर्ज परतफेड करत होते, जे वाढून १०० अब्ज पौंड झाले. व्याजदरात वाढ झाल्यामुळे लोकांच्या गरजा, देशाची सुरक्षा आणि आरोग्य व्यवस्था यांवर व्यय करण्यासाठी सरकारचा पैसा संपू लागला. त्यामुळे सुनक सरकारने जनतेवर होणारा खर्च न्यून केला. ब्रिटनमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा १९० वर्षांनंतर सर्वांत दारुण पराभव झाला. मजूर पक्षाने भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसामध्ये सवलत देण्याचे आधी घोषित केले आहे. सुनक सरकारने या व्हिसावर बंदी घातली होती. मजूर पक्षाने वर्ष २०१९ मध्ये काश्मीरमध्ये पर्यवेक्षक पाठवण्याचा प्रस्ताव संमत केला होता; पण स्टार्मर यांनी तो पालटला. ते आता काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग मानतात. स्टार्मर यांनी भारतीय माहिती तंत्रज्ञान आणि वैद्यकीय व्यावसायिकांना विशेष पॅकेज अन् विशेष श्रेणी देण्याची घोषणा आधीच केलेली आहे, तसेच भारताशी ‘मुक्त व्यापार करार (एफ्.टी.ए.)’ लवकरच करण्याची घोषणा केली. सुनक सरकारमध्ये या करारावर २ वर्षे मान्यता मिळाली नव्हती. स्टार्मर यांचे सरकार आल्यामुळे भारतियांच्या अनेक मागण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा केली जात आहे.
खरेतर ब्रिटनमध्ये सुनक यांच्या अहंकारी वृत्तीमुळे त्यांचा पराभव झाला आहे. आपल्याला सत्ता मिळाली की, आपण मनमानी पद्धतीने कसेही वागू, अशा शासनकर्त्यांच्या विचारसरणीला जनतेने थारा दिला नाही, हे सुनक यांच्या पराभवातून लक्षात येते. अशी स्थिती भारतात येऊ नये; म्हणून भारतीय शासनकर्त्यांनी योग्य असेच वागायला हवे, अन्यथा उद्या ब्रिटनसारखी परिस्थिती भारतातही निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. आजपर्यंतच्या इतिहासात अनेक राजांचा अहंकारामुळे विनाश झाला. त्याप्रमाणे यातून भारतीय शासनकर्त्यांनी बोध घेऊन रामराज्याप्रमाणे देशाचा कारभार करावा, हीच जनतेची अपेक्षा !