रत्नागिरी शहरी वाहतुकीतील महिला सन्मान योजना सवलतीचा शुभारंभ

रत्नागिरी – महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या शहरी वाहतुकीत महिला सन्मान योजना सवलतीचा शुभारंभ आणि प्रवास करणार्‍या महिलांचा सन्मान सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृह येथे पार पडला.

या वेळी रत्नागिरी शहरी वाहतूक बसला पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आणि श्रीफळ वाढवून बस रवाना करण्यात आली.
रत्नागिरी विभागाकडून शहरी वाहतुकीत लागू करण्यात आलेल्या महिला सन्मान योजना-शहरी वाहतुकीत महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिक योजना- ६५ ते ७५ वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना शहरी वाहतूक प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना – ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक या योजनेअंतर्गत शहरी वाहतूक प्रवास भाड्यात १०० टक्के विनामूल्य प्रवास सवलत योजना चालू करण्यात आली.

या वेळी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, रा.प. महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, एस्.टी. महामंडळ आगारातील अधिकारी आणि अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या वेळी रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थिनींना पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर पासचे अर्ज आणि ओळखपत्र वितरण करण्यात आले.