अशी कृत्ये करणार्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश
|
रत्नागिरी – शहरानजीकच्या मिरजोळे एम्.आय.डी.सी.त गोवंशाचे शिर आढळणे, ही निंदनीय घटना आहे. हे कृत्य करणार्या समाजकंटकांवर कडक कारवाई करा, पुन्हा अशी कृत्ये होणार नाहीत, याची दक्षता पोलीसदलाने घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत. जिल्ह्यातील जनतेने कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करावे. पोलीस समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर निश्चित कारवाई करतील, यासाठी भरारी पथके स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते
पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले,
१. रस्त्यावर गोवंशाचे शिर आढळल्यानंतर पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून कडक कारवाई करण्याचे निर्देश त्याच रात्री दिले होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्या प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजेत, या मताचे आपण आहोत. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
२. रत्नागिरीतील जनतेने संयम बाळगून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावी. अशा प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढणार नाहीत, याची दक्षता राज्य सरकार निश्चितपणे घेईल. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनीही समाजकंटकांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. अशा घटनांविषयी ज्या संघटनांकडे ही माहिती आहे त्यांनी ती तात्काळ पोलिसांना द्यावी. पोलीस त्याच्यावर कारवाई करतील.
३. येथील मार्गावर सीसीटीव्हीची निविदा काढण्याचे आदेश दिले आहेत. येत्या काही दिवसांत एम्.आय.डी.सी.तील सर्व रस्ते सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येतील.
संपादकीय भूमिका
|