गोवंश हत्या प्रकरणी सकल हिंदु समाजाच्या भूमिकेला विश्व हिंदु परिषदेचा पाठिंबा घोषित !

गोवंश हत्या प्रकरणी रत्नागिरी येथे विश्व हिंदु परिषदेची पत्रकार परिषद

रत्नागिरी – गेली अनेक वर्षे गोमातेचे पूजन, संगोपन आणि गोमातेचे महत्त्व सर्वांना समजावून देणार्‍या विश्व हिंदु परिषदेने गोवंश हत्या प्रकरणाचा जोरदार निषेध नोंदवला आहे. २ दिवसांपूर्वी झालेल्या गो वंश हत्या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोपीला शोधण्यासाठी सकल हिंदु समाजाने पोलिसांना ४८ तासांची मुदत दिली असून त्यानंतर आंदोलन केले जाणार आहे. या भूमिकेला विश्व हिंदु परिषदेनेही पाठिंबा दर्शवला आहे. यासंबंधीची माहिती येथील पत्रकार परिषदेत देण्यात आली.

व्यंकटेश हॉटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेला विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा मंत्री कुमार जोगळेकर, उपाध्यक्ष सौ. उमा देवळे, मातृशक्ती संयोजिका सौ. अस्मिता सरदेसाई बजरंग दलाचे जिल्हा संयोजक विराज चव्हाण, गोरक्षा संयोजक विशाल पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी श्री. जोगळेकर म्हणाले की, गोमाता समस्त भारतियांची माता आहे. तीच आपले पोषण करते. ती देवरूप असल्यामुळे तिची हत्या आम्ही खपवून घेणार नाही. यापूर्वी पोलिसांना, जिल्हा प्रशासनाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी गोहत्येच्या विरोधात पावले उचलण्याविषयी निवेदने दिली आहेत; परंतु रत्नागिरी एम्.आय.डी.सी. भागात घडलेल्या गोहत्या प्रकरणामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. रत्नागिरीसारख्या शांत शहरात असे प्रकार निंदनीय असून प्रशासन आणि पोलिसांनी आरोपींना पकडून कठोर शिक्षा द्यावी.

प्रत्येक गावात गोरक्षण चालू करण्यासाठी प्रयत्न !

विशाल पटेल म्हणाले की, गेले काही महिने रत्नागिरीत गो वंश हत्या घडण्याचे प्रकार आमच्या कानावर येत होते; परंतु आताच्या दुःखद घटनेमुळे आम्ही सारे व्यथित झालो आहोत. आम्ही गोमातेच्या संरक्षणासाठी प्रयत्न करत आहोत. रत्नागिरीतून गोवंशाची तस्करी थांबवण्यासाठी नाक्या-नाक्यांवर तपासणी व्हावी, तसेच मुर्शी, साखरपा येथील नाक्यांवर कडक तपासणी झाली पाहिजे; कारण तिथे अनेक वेळा अशा तस्करी थांबवण्याचे काम हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केले आहे. (निष्क्रीय आणि कामचुकार पोलिसांमुळेच हिंदुत्वनिष्ठांना गोरक्षण करावे लागते ! – संपादक)

गोवंश अथवा मोकाट गायी, गुरे असतील त्यांच्यासाठी प्रत्येक गावाने गायरान उपलब्ध करून द्यावे. तिथे निवारा बांधून गोमातेचे संगोपन करणे शक्य आहे. त्याकरता विश्व हिंदु परिषद, सकल हिंदु समाज काम करेल. याविषयी जिल्हा प्रशासनाकडे विनंती केली आहे; परंतु ही जमीन महसूल खात्याकडे आहे, काही वाद प्रकरणे चालू आहेत, असे उत्तर मिळाले आहे.