Masoud Pezeshkian : हिजाबला विरोध करणारे पजश्‍कियान इराणचे नवे राष्‍ट्राध्‍यक्ष !

  • कट्टरतावादी जलिली पराभूत !

  • माजी राष्‍ट्राध्‍यक्ष रायसी यांच्‍या मे महिन्‍यात झालेल्‍या निधनामुळे ४ महिन्‍यांनी पुन्‍हा झाली निवडणूक !

इराणचे नवे राष्‍ट्राध्‍यक्ष मसूद पजश्‍कियान

तेहरान (इराण) – मसूद पजश्‍कियान हे इराणचे नववे राष्‍ट्राध्‍यक्ष बनले आहेत. त्‍यांनी कट्टरतावादी नेते सईद जलिली यांचा ३० लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. पजश्‍कियान यांना १ कोटी ६४ लाख मते मिळाली, तर जलिली यांना १ कोटी ३६ लाख मते मिळाली. निवडणुकीत अनुमाने ५० टक्‍के लोकांनी मतदान केले. देशाचे सर्वोच्‍च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी जनतेला अधिकाधिक मतदान करण्‍याचे आवाहन केले होते. पजश्‍कियान यांची देशात ‘हिजाबला (मुसलमान महिलांनी डोक आणि मान झाकण्‍यासाठी वापरलेल्‍या वस्‍त्राला) विरोध करणारे नेते’ अशी ओळख आहे.

१९ मे या दिवशी इराणचे राष्‍ट्राध्‍यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्‍टर अपघातात निधन झाले. यानंतर देशात राष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडणुका घोषित झाल्‍या. यापूर्वी फेब्रुवारी २०२४ मध्‍ये निवडणूक झाली होती. यात रायसी पुन्‍हा देशाचे राष्‍ट्राध्‍यक्ष बनले होते.

इराणचे सध्‍याचे राष्‍ट्रीय राजकारण !

भ्रष्‍टाचार, पाश्‍चिमात्‍य देशांनी लादलेले निर्बंध, वृत्तपत्र स्‍वातंत्र्य, स्‍थलांतर रोखणे अशी सूत्रे यंदा झालेल्‍या निवडणुकीत चर्चेत होती. विशेष म्‍हणजे इराणमधील हिजाबविरोधी चळवळ आणि त्‍यानंतर सरकारने केलेल्‍या दडपशाहीमुळे वर्ष २०२२ मध्‍ये अनेक मतदारांच्‍या मनात ही सर्वांत मोठी समस्‍या होती. इराणमध्‍ये हिजाबच्‍या सूत्राकडे एक राजकीय शस्‍त्र म्‍हणूनही पाहिले जाते. वर्ष १९७९ मधील इस्‍लामी क्रांतीनंतर इराणमध्‍ये जेव्‍हापासून हिजाब कायदा लागू झाला, तेव्‍हापासून महिला वेगवेगळ्‍या मार्गाने त्‍यास विरोध करत आल्‍या आहेत. इराणच्‍या ६ कोटी १० लाख मतदारांपैकी निम्‍म्‍याहून अधिक मतदार महिला आहेत.

कोण आहेत मसूद पजश्‍कियान ?

इराणमधील ताब्रिझचे खासदार मसूद पजश्‍कियान यांना सर्वांत ‘संयमी नेता’ म्‍हणून ओळखले जाते. जनता त्‍यांच्‍याकडे सुधारणावादी म्‍हणून पहाते. ते माजी राष्‍ट्राध्‍यक्ष हसन रुहानी यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते याआधी देशाचे आरोग्‍यमंत्री राहिले आहेत. ते हिजाबला विरोध करत आले आहेत. पजश्‍कियान वर्ष २००६ मध्‍ये ताब्रिझमधून प्रथमच खासदार म्‍हणून निवडून आले. ते अमेरिकेला आपला शत्रू मानतात.

वर्ष २०१९ पासून इराण ‘फायनॅन्‍शिअल अ‍ॅक्‍शन टास्‍क फोर्स’च्‍या काळ्‍या सूचीत असल्‍यामुळे त्‍याला आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, एशियन डेव्‍हलपमेंट बँक आदींकडून इराणला कोणतेच आर्थिक साहाय्‍य मिळत नाही. ‘फायनॅन्‍शियल अ‍ॅक्‍शन टास्‍क फोर्स’ ही जागतिक संस्‍था आतंकवादाला आर्थिक साहाय्‍य होऊ देणार्‍या देशांवर कारवाई करते.