Brain Eating Amoeba : केरळमध्‍ये मेंदू खाणार्‍या ‘अमिबा’मुळे २ महिन्‍यांत ३ जणांचा मृत्‍यू !

कोळीकोड (केरळ) – राज्‍यात ‘अमिबा’ (सूक्ष्म जिवाणूचा प्रकार) मानवी मेंदू खात असल्‍याच्‍या घटना आता वारंवार समोर येऊ लागल्‍या आहेत. गेल्‍या २ महिन्‍यांत अशा ४ घटना घडल्‍या असून त्‍यांपैकी तिघांचा मृत्‍यू झाला आहे. चौथ्‍या घटनेत एका १४ वर्षांच्‍या मुलाला मेंदूतील हा दुर्मिळ संसर्ग असलेला ‘अमीबिक प्रायमरी मेनिंगोएन्‍सेफलायटीस’ झाल्‍याचे निदान झाले. त्‍याच्‍यावर उपचार चालू असून त्‍याच्‍यात सुधारणा होत असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. हा मुलगा उत्तर केरळ जिल्‍ह्यातील पयोली गावचा रहिवासी आहे. त्‍याला १ जुलैला रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले.

३ जुलै या दिवशी अन्‍य एका १४ वर्षीय मुलाचा या संसर्गामुळे मृत्‍यू झाला. हा मुलगा एका छोट्या तलावात आंघोळीसाठी गेला असता त्‍याला हा संसर्ग झाला. याआधी वर्ष २०१६, २०१७, २०१९, २०२०, २०२२ आणि २०२३ या वर्षांमध्‍येही हा आजार काही प्रमाणात आढळून आला होता.

काय आहे हा आजार ?

दूषित पाण्‍यात आढळणारा हा अमिबा’ जिवाणू नाकातून शरिरात प्रवेश केल्‍यामुळे हा संसर्ग होतो. ‘यू.एस्. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’च्‍या मते, ‘प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्‍सेफलायटीस’ (पी.ए.एम्.) हा मेंदूचा संसर्ग अमीबा किंवा नेग्‍लेरिया फॉवलेरी नावाच्‍या एकल-पेशी जिवांमुळे होतो. हा अमीबा तलाव, नद्या आणि गरम पाण्‍याचे झरे यांसारख्‍या माती अन् ऊबदार गोड्या पाण्‍यात आढळतो. याला सामान्‍यतः ‘ब्रेन इटिंग अमिबा’ असे म्‍हटले जाते. हा सामान्‍य अमिबा नसून सामान्‍य प्रतिजैविकांनी हा बरा होत नाही. हा इतका जीवघेणे आहे की, जर संसर्ग वेळीच थांबला नाही, तर ५ ते १० दिवसांत एखाद्या व्‍यक्‍तीचा मृत्‍यू होऊ शकतो.