श्रावण महिना आणि कुंभमेळ्याच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान दर्शनासाठी ‘ऑनलाईन पास’ देण्याच्या विचाराधीन !
नाशिक – आगामी श्रावण महिना आणि कुंभमेळ्याच्या धर्तीवर आता त्र्यंबकेश्वर देवस्थान दर्शनासाठी ‘ऑनलाईन पास’ देण्याच्या विचाराधीन आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी सहस्रो भाविकांची गर्दी होत असून दर्शन रांगेत नुकतीच एका भाविकाला देवस्थानच्या सुरक्षारक्षकाकडून मारहाण झाली होती. त्यानंतर गर्दी नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी प्रयत्न केले जात आहेत. तिरुपती बालाजी देवस्थानाच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानातही दर्शनासाठी भाविकांना ऑनलाईन पास देण्याचे नियोजन चालू असून पासच्या मुदतीतच दर्शन घ्यावे लागण्याची शक्यता आहे. यामध्ये भाविकांना मुखदर्शनाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
व्हीआयपी दर्शनासाठी शुल्क वाढवण्यावर होणार विचार !त्र्यंबकेश्वर देवस्थानात भाविकांना ‘व्हीआयपी’ दर्शन मिळण्यासाठी देणगी दर्शनाचे शुल्क वाढवण्यावर विचार होणार आहे. सध्या २०० रुपये देणगी देऊन व्हीआयपी दर्शन घेता येते. येत्या एक-दोन दिवसांत ‘त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट’ची बैठक होणार असून ऑनलाईन पास आणि सशुल्क दर्शन देण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. |