सूतगिरण्यांना अनुदान, तर यंत्रमाग धारकांना वीजदर सवलत देणार ! – चंद्रकांत पाटील, वस्त्रोद्योगमंत्री
मुंबई, ५ जुलै (वार्ता.) – राज्यातील सूतगिरण्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन या सूतगिरण्यांना नवसंजीवनी देण्यासाठी सहकारी सूतगिरण्यांना प्रती युनिट ३ रुपयेप्रमाणे ३ वर्षांसाठी वीज अनुदान आणि खासगी सूतगिरण्यांना प्रतियुनिट २ रुपयेप्रमाणे वीज अनुदान देण्याचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे, अशी माहिती वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ४ जुलै या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिली. यंत्रमाग धारकांच्या अडचणींच्या संदर्भात सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
त्यावर वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण घोषित केले आहे. यंत्रमाग धारकांना २७ एच्.पी.पेक्षा अल्प जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रतियुनिट १ रुपये अतिरिक्त वीजदर सवलत आणि २७ एच्.पी.हून अधिक; परंतु २०१ पेक्षा अल्प जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रतियुनिट ०.७५ अतिरिक्त वीजदर सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य सर्वश्री बच्चू कडू, अनिल देशमुख, नाना पटोले, रवी राणा, श्रीमती यामिनी जाधव, विजय देशमुख यांनी भाग घेतला.