एक राष्ट्रीयत्वाच्या आग्रहाचा खटाटोप कशासाठी ?
प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, चारही वर्णांतील लोक असलेल्या समाजाचे महत्त्व, कुठे कट्टरपंथी मुसलमान अन् कुठे तथाकथित प्रगत समाजवादी आणि निधर्मीवादामुळे हिंदु धर्माचा घात, गोव्यातील हिंदूंचा धार्मिक छळ करणार्या सेंट झेवियरने ब्राह्मणांवर केलेली टीका, हिंदुस्थान आणि राजसत्ता’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (लेखांक १९)
या पूर्वीचा लेख आपण येथे वाचू शकता : https://sanatanprabhat.org/marathi/811098.html
प्रकरण ४
४. भारतातील हिंदु आणि मुसलमान ही २ राष्ट्रे नसल्याचे (अ)ज्ञान !
माझ्या वाचकांना हे वाचून आश्चर्य वाटेल की, मी विठ्ठलभाई पटेलांना काही मास जरी नाही, तरी काही दिवस मुसलमान समजत होतो; कारण ते दाढी राखत आणि तुर्की टोपी घालत. अनेक मुसलमान समाज हिंदु वारसा कायद्याच्या प्रभावाखाली आहेत. सर महंमद इक्बाल मोठ्या अभिमानाने ‘आपण ब्राह्मणी वंशातील आहोत’, असे सांगत असत. इक्बाल आणि किच्छलू ही हिंदु अन् मुसलमान दोघांतही आढळणारी नावे आहेत. भारतातील हिंदु आणि मुसलमान ही २ राष्ट्रे नाहीत. ज्यांना देवाने एक बनवले आहे, त्यांना मनुष्य तोडू शकणार नाही.
५. अल्पसंख्य आणि बहुसंख्य समुदायांना एक राष्ट्रीयत्वाच्या जोखडांत जखडणे हे अंतिम विनाशाचे कारण !
कायदे आझम जिना यांनी एक मूलभूत समस्या उभी केली आहे. त्यांचा सिद्धांत असा आहे की, आमचे हिंदु बांधव इस्लाम आणि हिंदु धर्म यांचे खरे स्वरूप का समजून घेऊ शकत नाहीत ?, हेच मला समजत नाही. ‘धर्म’ शब्दाच्या स्पष्ट अर्थानुसार ते धर्म नाहीत; पण खरे पहाता ते एकमेकांपासून वेगळे आणि मतभिन्नता असणारे जनसमुदाय आहेत. हिंदु आणि मुसलमान मिळून एक राष्ट्रीयत्व विकसित होईल, असे मानणे हे केवळ स्वप्न आहे. ही एका भारतीय राष्ट्रीयत्वाची कल्पना मर्यादेच्या पलीकडे गेलेली असून ती आमच्या अनेक व्यथांचे कारण आहे आणि आम्ही आमचे मत वेळेवर पालटले नाही, तर ही कल्पना भारताच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरेल. हिंदु आणि मुसलमान यांचे २ भिन्न धार्मिक तत्त्वज्ञान आहे. त्यांचे सामाजिक रीतीरिवाज आणि साहित्यही परस्परभिन्न आहे. त्यांच्यांत परस्परांत विवाह होत नाहीत आणि ते एकत्र जेवतही नाहीत. खरे पहाता ते प्रामुख्याने परस्परांच्या विरुद्ध आणि सतत झगडणार्या विचारांचे आणि संकल्पनांचे वारसदार आहेत. जीवनावरील आणि जीवनाविषयीचा त्यांचा दृष्टीकोन एकमेकांपासून अगदी विरुद्ध आहे.
इतिहासातील परस्परविरुद्ध अंगे ही हिंदु आणि मुसलमान यांची स्फूर्तीस्थाने आहेत. त्यांच्या कथासुद्धा एकमेकांच्या विरुद्ध असतात. पुष्कळ वेळा एकाचा आदर्श नायक हा दुसर्यांना शत्रू वाटतो आणि विजय-पराजयसुद्धा दोघांचे एकमेकांवर ताण निर्माण करणारे असतात. संख्येच्या दृष्टीने अल्पसंख्य आणि बहुसंख्य अशा या २ परस्परविरुद्ध समुदायांना एकाच राज्यात एकराष्ट्रीयत्वाच्या जोखडांत जखडणे, हे वाढत्या असमाधानाला कारण होईल. अशा राज्याच्या आणि शासनाच्या जडणघडणीच्या अंतिम विनाशालाच ते कारण ठरेल.’’
६. हिंदु-मुस्लिम ऐक्य हे गांधींच्या जीवनाचे साध्य होते !
बॅ. जीनांचे वरील विचार सांगून झाल्यावर गांधी पुढे म्हणतात, ‘‘ते असे म्हणत नाहीत की, काही हिंदु वाईट आहेत. ते म्हणतात की, हिंदु आणि मुसलमान यांच्यात काहीच समान नाही. मी धाडसाने म्हणू इच्छितो की, ते म्हणजे जीना आणि त्यांच्या सारख्याच विचारांचे लोक इस्लामची कोणत्याही प्रकारे सेवा करत नाहीत. ‘इस्लाम’ या प्रत्यक्ष शब्दातच अंतर्भूत असलेल्या अर्थाला ते वेगळा अर्थ लावत आहेत. मुस्लिम लीगच्या नावाने जे चालू आहे, त्यामुळे मी अत्यंत विव्हल झालो आहे; म्हणूनच मी हे बोलत आहे. भारतीय मुसलमानांत ज्या असत्याचा प्रचार केला जात आहे, त्याबद्दल मी त्यांना समज दिली नाही, तर मी माझ्या कर्तव्याला अंतरलो, असे होईल. मी त्यांची (मुसलमानांची) त्यांच्या अत्यंत अडचणीच्या क्षणी अंतःकरणपूर्वक सेवा केली आहे आणि हिंदु-मुस्लिम ऐक्य हे माझ्या जीवनाचे साध्य असल्यामुळे ही समज देणे, हे माझे कर्तव्य आहे.’’ (हरिजन, ६ एप्रिल १९४०)
– भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे , चेंबूर, मुंबई
(साभार: ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
पुढील लेख वाचण्या करिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/812702.html