पू. भिडेगुरुजींवर टीका केल्यास धारकरी जशास तसे उत्तर देतील !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभागप्रमुख हणमंतराव पवार यांची चेतावणी

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. सचिन पवार, मध्यभागी श्री. हणमंतराव पवार आणि उजवीकडे श्री. अनिल तानवडे

सांगली – नुकत्याच पुणे येथे झालेल्या भक्ती-शक्ती संगम येथे पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे यांनी पाश्चात्त्य विकृतीनुसार नाही, तर विवाहित हिंदू महिलांनी हिंदु संस्कृतीनुसार पारंपरिक वेशभूषेत वटपौर्णिमेची पूजा करावी, असे आवाहन केले होते. असे असतांना आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यासारखे लोक पू. भिडेगुरुजी यांच्यावर टीका करण्यातच धन्यता मानत आहेत. केल्या काही वर्षांपासून पू. भिडेगुरुजी यांच्या वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात येत आहे. ज्या व्यक्तीने त्यांचे संपूर्ण आयुष्य देश, धर्म यांच्यासाठी वाहिले त्यांच्याविषयी धारकर्‍यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे यापुढील काळात पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर टीका केल्यास अथवा अपशब्द वापरला, तर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी जशास-तसे उत्तर देतील, अशी चेतावणी विभागप्रमुख श्री. हणमंतराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सर्वश्री अनिल तानवडे, सचिन पवार, शेखर तांदळे उपस्थित होते.

या प्रसंगी श्री. अनिल तानवडे म्हणाले, ‘‘आज काही लोकांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे लोकांना ‘सॉफ्ट टार्गेट’ (सोपे लक्ष्य) वाटतात. त्यामुळे पू. भिडेगुरुजी जे बोलतील त्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करायचा आणि समाजात राळ उठवून द्यायची असे चालू आहे. पू. भिडेगुरुजी यांची वाक्ये प्रसिद्धीमाध्यमांमध्ये जाणीवपूर्वक तोडून दाखवली जातात. पू. भिडेगुरुजी यांनी तरुणांच्या मनात जी राष्ट्रभक्ती-धर्मभक्ती निर्माण केली आहे त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. गुरुजींच्या नावाविषयी, शिक्षणाविषयी शंका-संभ्रम उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात सर्व दाखले, प्रमाणपत्रे आमच्याकडे आहेत. वेळप्रसंगी आम्ही ते सादर करू.’’

हिंदु धर्म ‘सॉफ्ट टार्गेट’ असल्याने राहुल गांधींकडून हिंदु धर्मावर टीका !

ज्या पद्धतीने  पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे काही लोकांना ‘सॉफ्ट टार्गेट’ वाटतात. त्याच पद्धतीने राहुल गांधी यांनाही हिंदु धर्म ‘सॉफ्ट टार्गेट’ वाटतो. त्यामुळे ते हिंदु धर्मावर टीका करत आहेत; मात्र आता हिंदू जागा होत असून यापुढील काळात ते राहुल गांधींना निश्चित प्रत्युत्तर देतील, असेही श्री. तानवडे यांनी या प्रसंगी सांगितले.