मनोविकारांवर ‘मन’ हाच उपाय!
एका वर्तमानपत्रात आलेल्या वृत्तानुसार नववधूंची मानसिक आजारांवरील उपचारांसाठी रुग्णालयातील संख्या वाढत आहे. यावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानसिक आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. पूजा सिंग यांनी सांगितले की, पूर्वीच्या काळी महिलांमध्ये असलेली सहनशीलता आताच्या महिलांमध्ये फार अल्प प्रमाणात आढळते. परिणामस्वरूप शारीरिक आणि मानसिक आजार उद्भवतात.
महिलांमध्ये इतरांशी जुळवून घेण्याचा विचार, समाधानी वृत्ती, कर्तव्यभावना यांचा अभाव निर्माण होत आहे. मुलगी विवाह होऊन सासरी जाते, ही जगाची पद्धतच आहे. त्यामुळे आई-वडिलांना मुलीचे लाड करावेसे वाटणे, तिला स्वातंत्र्य द्यावे, असे वाटणे स्वाभाविक आहे; पण त्याच वेळी विवाहानंतर तिच्यावरील दायित्व आणि मर्यादा यांचीही जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे. याचा लाभ मुलीला तिच्या वैवाहिक आयुष्यात नक्कीच होईल, मनाच्या संघर्षावर मात करून आनंद अनुभवता येईल. सासरच्या मंडळींनीही नवीन मुलीला घरात रुळायला थोडा अवधी लागणार आहे, हे लक्षात घेऊन तिला समजून घ्यायला हवे.
व्यक्तीने मनावरील इतरांकडून असणार्या अपेक्षांचे ओझेही अल्प करायला हवे, इतरांशी स्वत:ची केली जाणारी तुलना थांबवायला हवी. विनोबा भावे म्हणतात त्याप्रमाणे ‘ज्या गोष्टी सुटत नसतील, त्या सोडून देणे शिकायला हवे.’ आग्रही भूमिका सोडून थोडी माघार घेता आली पाहिजे. असे झाले नाही, तर ‘झोपेचा अभाव, चिडचीड, डोकेदुखी, अस्वस्थता या सगळ्या मानसिक आजारांना व्यक्ती स्वत:च खतपाणी घालत आहे’, असे म्हणावे लागेल. मनाला समाधान मानण्याची सवय लावावी. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या ‘मन वढाय वढाय..’ या कवितेत मनाच्या खेळांचे सुंदर वर्णन केले. व्यक्तीच्या आयुष्यातील बहुतांशी समस्या या तिच्या मनावर अवलंबून आहेत. त्यामुळे मन पालटले, तर अनेक समस्या तिथेच सुटतील. यांसह ‘उत्तम संवाद’ हे या सर्वांवर अधिक रामबाण औषध आहे. यामुळे बहुतांशी समस्या सहज सुटतात आणि मनावरचे प्रचंड ओझे, ताण न्यून होतो.
या आजारांवर मानसिक उपायांसह आध्यात्मिक स्तरावरील उपाय अवश्य करावेत. ते अधिक लाभदायी आहेत. हिंदु धर्मात विविध व्रतवैकल्ये, सण, उपवास आदी गोष्टी सांगितल्या आहेत. यामुळे मनाशी संघर्ष करणे, सहनशीलता वाढवणे, शांत आणि संयमी वागणे या गोष्टी आपसूकच अंगवळणी पडतात. नामजपाने शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सामर्थ्य वाढते. याचा लाभ आयुष्यभरासाठी होतो. साधनेने आपल्या चित्तावरील चुकीचे संस्कार न्यून होतात, आपल्याला आनंदी जीवन जगता येते.
– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी