भविष्यात संधी मिळाल्यास अंतराळातील संशोधन करायला निश्चितच आवडेल ! – कु. शर्वरी काळे
नासा दौर्यावरून परतल्यानंतर कु. शर्वरी काळे हिचा जि.प. मराठी शाळा, गुजराळी (राजापूर) च्या वतीने सत्कार
राजापूर – अंतराळ संशोधन केंद्र असलेल्या अमेरिकेतील ‘नासा’ भेटीचा आनंद आणि अनुभव अवर्णनीय होता. अंतराळामध्ये असलेले ‘ब्लॅकहोल’ तेथील विविध गोष्टी स्वतःकडे आकर्षित करत असल्याची माहिती आपल्या वाचनात आली आहे. नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची भविष्यात संधी मिळाल्यास अंतराळातील या ‘ब्लॅक होल’संबंधित संशोधन करायला निश्चितच आवडेल. अशा शब्दामध्ये कु. शर्वरी काळे (‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. सुघोष काळे यांची मुलगी) हिने नासा, इस्त्रो भेट दौर्यानंतर स्वत:च्या भविष्याचा वेध घेतला आहे. शाळेच्या वतीने झालेल्या सत्काराविषयी धन्यवाद देतांना पालक, शिक्षक यांनी केलेल्या मार्गदर्शन आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल जिल्हा परिषेदेच्या योगदानाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.
नासा दौर्यावरून परतल्यानंतर कु. शर्वरी काळे हिचा प्रशाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल करंबेळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मधुरा धुमक, सदस्य मनोज पवार, मुख्याध्यापक मनीषा विचारे यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
कु. शर्वरी काळे हिने नासा भेट दौर्याचा सविस्तर वृत्तांत मांडला. यू ट्यूबवरील व्हिडिओंच्या माध्यमातूनही नासासंबंधित माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केला होता. त्याचा उपयोग प्रत्यक्ष नासा भेट आणि पहाणीच्या वेळी झाला. तेथील केनडी स्पेस सेंटरसह अंतराळ यान पाठवण्याचे ठिकाण, चंद्रावरून आणलेला दगड, यानांच्या विविध प्रतिकृती, एटीएक्स जवळून पाहिला. थ्रीडीच्या माध्यमातून अंतराळवीर म्हणून अवकाशातून अप्रत्यक्षरित्या फिरून येण्याची संधीही मिळाली. अमेरीकेतील नासा आणि भारताचे इस्त्रो ही अंतराळ संशोधन केंद्र उभारणीमध्ये आणि या केंद्राच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध संशोधनामध्ये योगदान देणार्या संशोधकांचे आदर्शवत् आणि प्रेरणादायी असलेले कार्य जवळून पहाण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळाली. जिल्हा परिषदेने राबवलेल्या या उपक्रमामुळे अनेक मुलांना नासा, इस्त्रो अनुभवण्याची संधी मिळाली असून हा उपक्रम भविष्यामध्ये सुरू ठेवावा.
नासाच्या अधिकार्यांकडून ‘इस्त्रो’चे कौतुक ऐकून भारत देशाचा अभिमान वाटला ! – कु. शर्वरी काळेआम्हा विद्यार्थ्यांशी नासाच्या अधिकार्यांनी संवाद साधला. भारतीय अंतराळ संशोधन केंद्र असलेल्या ‘इस्त्रो’ने गेल्या काही वर्षांमध्ये अंतराळ संशोधनामध्ये झपाट्याने प्रगती केली आहे. ‘इस्त्रो’च्या या लक्षवेधी प्रगतीचे नासाच्या अधिकार्यांनी कौतुक केले. आपल्या भारत देशाचे आणि अंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’चे नासाच्या अधिकार्यांनी केलेले कौतुक ऐकून आपल्या भारत देशाचा निश्चितच अभिमान वाटला. |