उत्तर भारतात सामूहिक नामजप सत्संगासाठी सेवा करणार्‍या साधकांमध्ये झालेले गुणसंवर्धन !

दायित्व घेऊन सेवा केल्यामुळे साधकांमध्ये गुण आणि कौशल्ये यांची वृद्धी होऊन त्यांची समष्टी साधना होणे

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. दायित्व घेऊन सेवा केल्यामुळे साधकांमध्ये नेतृत्व गुण विकसित होत असल्यामुळे गुरुकार्य वृद्धींगत होणे

‘परात्पर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) एका मार्गदर्शनात सांगितले आहे, ‘स्वावलंबी साधक निर्माण करणे’ ही महत्त्वाची समष्टी साधना आहे.’ स्वावलंबी होण्यासाठी साधकांना स्वतःमध्ये गुण आणि कौशल्ये यांची वृद्धी करणे आवश्यक असते. साधकांमध्ये साधकत्व, कौशल्ये आणि गुण निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रत्येक प्रसंगाचा उपयोग केला पाहिजे. ही गोष्ट गुरुकार्य वृद्धींगत करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

२. नामजप सत्संगाच्या सेवेत सहभागी सर्वच साधकांची समष्टी साधना होणे

नामजप सत्संगाचे आयोजन करण्याच्या सेवेत पूर्वी सौ. पुष्पा सावंत आणि सध्या सौ. संपदा दुधगावकर अन् संहितालेखन सेवेत सौ. मातंगी तिवारी दायित्व घेऊन सेवा करत आहेत. प्रतिदिन हा उपक्रम चालवण्यासाठी ‘त्याचे नियोजन करणे, आवश्यक तो समन्वय करणे, उपक्रमातील सहभागी साधकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, वेगवेगळ्या जिल्ह्यांतील संबंधित साधकांशी समन्वय करणे’, अशा सेवा कराव्या लागतात. या सेवेमुळे साधकांमध्ये ही सर्व कौशल्ये वृद्धींगत होत आहेत, उदा. काही साधकांमध्ये क्षमता असूनही त्यांच्यात विषय मांडण्याचा आत्मविश्वास नव्हता. आता ते आत्मविश्वासाने विषय मांडायला लागले आहेत, साधना सत्संगातील जिज्ञासू आणि धर्मप्रेमी या नामजप सत्संगात विषय मांडत आहेत, तर युवा साधक दायित्व घेऊन या सत्संगाच्या सेवेसाठी वेळ देत आहेत.

३. कृतज्ञता

एक प्रकारे सर्व साधकांच्या समष्टी साधनेसाठी ‘नामजप सत्संग’ एक माध्यम झाले आहे. यासाठी मी तिन्ही मोक्षगुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा संकल्प आणि दूरदृष्टी यांमुळे प्रतिदिन घेतल्या जाणार्‍या नामजप सत्संगाचे झालेले लाभ !

श्री. आनंद जाखोटिया

१. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नामजप सत्संग प्रतिदिन घेण्यास सांगितल्यावर ‘हे शक्य होईल का?’, असा विचार येणे, तेव्हा देवाने ‘संतांचे आज्ञापालन केले पाहिजे’, असा विचार देणे

प्रथम ‘नामजप सत्संग’ केवळ काही ठराविक सण-उत्सव यानिमित्त घेण्याचे नियोजन केले होते. या नामजप सत्संगाचा आरंभ श्रावणी सोमवारी झाला. श्रावणी सोमवारचा हा उपक्रम पूर्ण झाल्यानंतर सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘हा नामजप सत्संग आपण प्रतिदिनच घेऊया. आपल्याशी जोडलेल्या लोकांची प्रतिदिन साधना होईल आणि साधकांनाही सेवेची संधी मिळेल.’’ हे ऐकल्यावर माझ्या मनात आले, ‘इतर सेवांची पुष्कळ व्यस्तता असल्यामुळे प्रतिदिन नामजप सत्संग घेणे शक्य होईल का ?’ तेव्हा ईश्वराने माझ्या मनात विचार दिला, ‘संतांनी सांगितले आहे, तर आपण आज्ञापालन करू या.’

२. प्रतिदिन नामजप सत्संग चालू ठेवल्यावर तो सत्संग ‘साधकांची समष्टी सेवा आणि आध्यात्मिक प्रगती यांचे माध्यम बनला आहे’, असे लक्षात येणे

नामजप सत्संगाच्या माध्यमातून जिज्ञासूंना होणारा लाभ, अनेक साधकांना समष्टी सेवा करण्याची मिळालेली संधी, त्या सेवेमुळे त्यांच्यामध्ये झालेले पालट आणि त्यांच्यामध्ये वृद्धींगत होत असलेली विविध कौशल्ये पाहून ‘ही सेवा साधकांच्या प्रगतीचे माध्यम होत आहे’, हे हळूहळू माझ्या लक्षात आले.

सद्गुरु पिंगळेकाकांची दूरदृष्टी आणि संकल्प यांमुळे हा उपक्रम समष्टी साधनेचे एक माध्यम झाले. यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. आनंद जाखोटिया (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३६ वर्षे), भोपाळ, मध्यप्रदेश.

उत्तर भारतातील देहली, हरियाणा, पंजाब, पश्चिम उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील जिज्ञासूंसाठी प्रतिदिन सकाळी ७ ते ७.३० या वेळेत सामूहिक नामजप अन् सत्संग यांचे आयोजन केले जाते. वर्ष २०२२ मधील श्रावणी सोमवारपासून या उपक्रमाचा आरंभ झाला. प्रतिदिन ‘गूगलमीट’ (या ॲपवर ‘ऑडिओ’ आणि ‘व्हिडिओ’ ‘कॉन्फरन्सिंग’ करता येते) आणि ‘यू ट्यूब’ वर चालणार्‍या या उपक्रमाचा जवळजवळ ६५ साधक लाभ घेत आहेत. या उपक्रमामुळे दिवसाचा आरंभ नामजप आणि सत्संग यांमुळे होत असल्यामुळे सहभागी जिज्ञासूंना चांगले वाटते. त्यामुळे ते नियमितपणे या सत्संगात सहभागी होतात. या उपक्रमाच्या तांत्रिक सेवेत १०, सूत्रसंचालनाच्या सेवेत १० युवा साधक आणि विषय सादर करण्याच्या सेवेत १८ साधक सहभागी झाले आहेत. साधनासत्संग आणि धर्मशिक्षणवर्गात सहभागी होणारे ७ जिज्ञासू आणि धर्मप्रेमी हेही विषय सादर करण्याच्या सेवेत सहभागी झाले आहेत. या उपक्रमाच्या सेवेत सहभागी झालेले साधक, जिज्ञासू आणि युवा साधक यांना स्वतःची साधना अन् आध्यात्मिक उन्नती या दृष्टीने अनेक लाभ झाले आहेत. याविषयी त्यांनी केलेले अनुभवकथन त्यांच्याच शब्दांत येथे दिले आहे.

१. युवा साधकांचा सहभाग

१ अ. अधिवक्त्या अमिता सचदेवा (कु. सिमरन सचदेवाची आई), नवी देहली : ‘कु. सिमरन सचदेवा (वय १४ वर्षे) देहली येथून तिने या सत्संगात सूत्रसंचालन करण्याची सेवा केली. ती वयाने लहान असूनही तत्परतेने आणि सतर्कतेने सेवा करण्याचा प्रयत्न करते. सिमरनला सकाळच्या नामजप सत्संगाच्या सेवेतून चांगले लाभ झाले.

१ अ १. गुणसंवर्धन होणे : पूर्वी ती सकाळी लवकर उठत नव्हती; परंतु आता ती सेवा करण्यासाठी घड्याळाचा गजर झाल्यावर लगेच उठते.

१ अ २. आत्मविश्वास वाढणे : सिमरनचा स्वभाव लाजाळू आहे. सत्संगात सूत्रसंचालनाची सेवा केल्यामुळे तिच्यामध्ये समाजातील लोकांसमोर किंवा एखाद्या समूहासमोर बोलण्याचा आत्मविश्वास वाढला आहे.

१ अ ३. धर्माभिमान वाढणे : सत्संगात घेतले जाणारे विषय ऐकल्यामुळे तिला लहान वयातच हिंदु धर्माचे ज्ञान मिळून तिचा हिंदु धर्माप्रती अभिमान वाढला आहे.

१ अ ४. इतरांना प्रेरणा मिळणे : ‘सिमरन वयाने लहान असूनही सूत्रसंचालन करू शकते, तर आपणही करू शकतो’, असा आत्मविश्वास तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या काही साधकांमध्ये निर्माण झाला आणि त्यांनीही या सेवेत सहभाग घेतला.

१ अ ५. आई-वडिलांच्या मनात कृतज्ञताभाव निर्माण होणे : मुलीला एवढ्या लहान वयात चांगले मार्गदर्शन मिळत असल्यामुळे आम्हाला पुष्कळ कृतज्ञता वाटते. मुले वाढत्या वयाची होतात, तेव्हा आई-वडिलांना त्यांच्याकडे पुष्कळ लक्ष देण्याची आवश्यकता असते; परंतु आता असे वाटते, ‘ईश्वराचेच तिच्याकडे विशेष लक्ष आहे.’

गुरुदेवा (परात्पर गुरु डॉ. आठवले), त्यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

१ आ. कु. वंशिका राठी, जयपूर, राजस्थान. (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे)

१ आ १. चुकांविषयी खंत वाटून पुन्हा नव्याने प्रयत्न करणे : अनेकदा माझ्या सेवा नियोजित वेळेत पूर्ण होत नाहीत. साधकांनी ही चूक दाखवून दिल्यावर मला पुष्कळ खंत वाटते आणि त्यामुळे काही वेळा ‘माझा उत्साह जागृत होऊन मी पुन्हा नव्याने प्रयत्न करते’, असे मला अनुभवता आले.

१ आ २. स्वभावदोष न्यून होऊन गुणवृद्धी होणे : ‘माझ्यामध्ये ‘अनावश्यक विचार करणे’ हा स्वभावदोष आहे; परंतु या सेवेमुळे त्याचे प्रमाण न्यून झाले असून ‘इतरांचा विचार करणे’ या गुणाची वाढ झाली आहे’, असे मला वाटते.

१ आ ३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेल्या भावात वृद्धी होणे

१ आ ३ अ. ‘सत्संग ऐकणार्‍या सर्व साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटल्याचा आनंद मिळावा’, यासाठी ‘तेच हात धरून संहिता लिहून घेत आहेत’, असा भाव ठेवणे : गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले), सद्गुरु किंवा संत यांना भेटल्यावर त्यांचे बोलणे ऐकून आपल्याला आनंद अनुभवता येतो. ते आपल्यासाठी बोलत असून ‘त्यांना आपली सर्व स्थिती ठाऊक आहे’, असे अनुभवता येते. त्याचप्रमाणे माझ्या मनात ‘सत्संगात सहभागी होणार्‍या सर्व जिज्ञासूंनाही गुरुदेवांना भेटल्याचा आनंद मिळाल्याची अनुभूती यावी’, अशी इच्छा होती; म्हणून संहितालेखनाची सेवा करतांना ‘गुरुदेवच माझा हात धरून माझ्याकडून संहिता लिहून घेत आहेत’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करत होते.

१ आ ३ आ. सूत्रसंचालनाची सेवा करतांना ‘गुरुदेवच माझ्या मुखातून बोलत आहेत’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करत होते.

गुरुदेवांनी मला या नामजप सत्संगाच्या माध्यमातून सत्सेवेशी सदैव जोडून ठेवले आहे. या गुरुकृपेसाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

१ इ. श्री. वैभव हरिकिशन शर्मा, नोएडा, नवी देहली. (वय १८ वर्षे)

१ इ १. सेवेत सहभागी होणे : ‘सकाळच्या सत्संगात सेवा करण्यासाठी मला लवकर उठावे लागत असल्यामुळे माझी दिनचर्या चांगली रहाते. माझ्या इतर सेवाही वेळेत पूर्ण होतात. त्यामुळे ‘माझी दिनचर्या सात्त्विक झाली आहे’, असे मला जाणवते.

१ इ २. एकाच विषयाचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास होणे : प्रत्येक सत्संगात वेगवेगळे विषय घेतले जात असल्यामुळे ते सर्व विषय मला शिकता येतात. काही वेळा वेगवेगळ्या सत्संगात एकच विषय होत असल्यामुळे माझा आपोआप त्या विषयाचा सखोल अभ्यास होतो.’

१ ई. कु. अनन्या मोदी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), जोधपूर, राजस्थान (वय १९ वर्षे)

१ ई १. सेवेमुळे उत्साह वाढणे : ‘मला संहितालिखाणाची (स्क्रिप्टिंगची) सेवा मिळाल्यावर पुष्कळ आनंद झाला. महाविद्यालयात नोकरी करून घरी आल्यावर मी थकलेली असते; परंतु ही सेवा केल्यावर मला उत्साह जाणवतो.

१ ई २. दायित्वाची जाणीव ठेवून सेवा करण्यासह इतरांचा विचार करण्यास शिकता येणे : मला ‘संहितालेखन करणे’ एवढेच नाही, तर ‘दायित्वाची जाणीव ठेवून सेवा कशी करायची ?’, हे शिकायला मिळाले. ‘कार्यपद्धतीनुसार माझ्याकडून संहिता वेळेत पूर्ण झाली नाही, तर पुढे सर्वच साधकांना अडचण येते’, हे माझ्या लक्षात आले. पूर्वी मी सत्संगाच्या एक दिवस आधी संहिता पाठवत होते; पण त्यामुळे सत्संगात विषय मांडणार्‍या साधकाला चांगली सिद्धता करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. आता मी एक आठवडा आधी संहिता देण्याचे नियोजन करून तसे प्रयत्न चालू केले आहेत. ‘वेळेत संहिता सिद्ध करण्यासाठी मला काही अडचण असेल, तर ती मी त्वरित उत्तरदायी साधकांना सांगणे किती महत्त्वाचे आहे ?’, हेही माझ्या लक्षात आले. यातून माझ्यामध्ये इतरांचा विचार करण्याचा गुण वाढला.’

१ उ. श्री. दीपक लढ्ढा, सोजत रोड, राजस्थान. 

१ उ १. ‘आता मी नियमितपणे सकाळी वेळेवर उठतो.

१ ऊ. श्री. अनुराग यादव , नोएडा, नवी देहली.

१ ऊ १. ‘सेवा करतांना ईश्वर सतत समवेत आहे’, याची अनुभूती येणे : ‘मी नोकरीनिमित्त काही दिवसांसाठी महाराष्ट्रात गेलो होतो. मला तेथील सर्व लोक अपरिचित वाटत होते; म्हणून मी एकटाच माझ्या खोलीत बसून सेवा करत असे. तेव्हा ‘माझ्या समवेत कुणीतरी आहे’, असे मला जाणवत होते. त्यामुळे मला एकटेपणा जाणवत नव्हता.

१ ऊ २. आध्यात्मिक त्रास आणि नकारात्मकता न्यून होणे : सेवेसाठी मला सकाळी लवकर उठावे लागेल; म्हणून ‘उद्या सेवा करायला नको’, असा विचार कधी कधी माझ्या मनात यायचा; परंतु तेव्हा लगेच ‘हा माझा विचार नसून तो अनिष्ट शक्तीचा आहे’, हे माझ्या लक्षात यायचे. ‘या सेवेमुळे मला दिवसभर चैतन्य मिळणार आहे’, या जाणिवेमुळे मला सेवेप्रती कृतज्ञता वाटत असे.’ (क्रमशः)

याच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/812144.html