दैवी आज्ञेनुसार निर्मनुष्य जंगलात ३ मास निर्भयतेने राहून पूर्ण श्रद्धेने साधना करून आज्ञापालन करणार्‍या पू. (कै.) श्रीमती प्रमिला वैशंपायन (वय ९४ वर्षे) !

पू. (श्रीमती) प्रमिला वैशंपायन यांचा ७.७.२०२४ या दिवशी देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने…

प.पू. दादाजी वैशंपायन

‘शिवभक्त पू. (श्रीमती) प्रमिला वैशंपायन (कल्याण) या योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पत्नी आहेत. साधक परिवार त्यांना ‘आई’ या नावाने हाक मारत असत. २८.६.२०२४ च्या रात्री १०.४५ ला पू. (श्रीमती) प्रमिला वैशंपायन यांनी कल्याण येथे त्यांच्या रहात्या निवासस्थानी देहत्याग केला. मला त्यांच्याविषयी जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

पू. (श्रीमती) प्रमिला वैशंपायन

१. जन्म

वर्ष १९३० मध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी उपळे (जिल्हा रत्नागिरी ) येथे पू. प्रमिलाआई यांचा जन्म झाला.

२. साधी रहाणी

पू. प्रमिलाआई यांची रहाणी अत्यंत साधी होती. त्यांना दागिने, कपडे, पैसा यांचा मोह नव्हता. त्यांच्यामध्ये ‘काटकसर, प्रेमभाव, मायेतील गोष्टींची आसक्ती नसणे, साधनेसाठी दृढ निश्चय’, असे विशेष गुण होते.

३. स्वावलंबी

आतापर्यंत त्या स्वतःची दैनंदिन कामे स्वतःच करत असत. योगतज्ञ दादाजींचाच हा गुण त्यांनी अंगी बाणवला होता.

४. संगीताची आवड

त्यांना संगीताची आवड असल्यामुळे त्यांनी ‘संगीत विशारद’ ही पदवी प्राप्त केली होती. त्यांच्या शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणात आणि युरोप दौर्‍यातही झाले.

५. पू. प्रमिलाआई यांनी योगतज्ञ दादाजींच्या कार्यात त्यांना जेवढे शक्य होते, तेवढे मनापासून सर्वतोपरी साहाय्य केले.

श्री. अतुल पवार

६. पू. (सौ.) प्रमिला वैशंपायन यांनी केलेल्या काही खडतर साधना !

६ अ. आळंदी येथील सुवर्ण पिंपळास प्रदक्षिणा घालणे : पू. प्रमिलाआई यांनी दैवी संदेशाप्रमाणे श्री क्षेत्र आळंदी येथे सुवर्ण पिंपळास सव्वा वर्षात सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या. त्यासाठी त्यांना प्रतिदिन १२ घंट्यांपेक्षा अधिक वेळ लागत असे.

६ आ. ‘श्रीराम’ मंत्र लिहिलेल्या कागदाला पीठ लावून त्याची गोळी करून ते इंद्रायणीतील माशांना अर्पण करणे : ‘कागदावर ‘श्रीराम’ मंत्र लिहून त्या कागदाला कणिक लावून लहानशी गोळी करून ती नदीतील माशांना अर्पण करायची’, अशी एक साधना पद्धत प्रचलित आहे. पू. प्रमिलाआई यांनी सव्वा वर्षात अशा सव्वा लाख गोळ्या श्री क्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीतील माशांना अर्पण केल्या.

६ इ. नियमितपणे गोग्रास देणे : त्या अन्नदान आणि गोसेवेला पुष्कळ महत्त्व देत असत. कल्याणपासून नजीकच्या गावात गायींचा गोठा आहे. त्या प्रत्येक आठवड्याला तिथे जाऊन गोग्रास भरवत असत.

६ ई. दैवी आज्ञेने हरिद्वार येथील जंगलात ३ मास एकटीने राहून केलेली साधना !

६ ई १. योगतज्ञ दादाजी यांना ‘सौ. प्रमिला यांना उपासनेसाठी हरिद्वार येथे एकटीला पाठवावे’, असा दैवी संदेश मिळणे आणि त्यानुसार सौ. प्रमिला यांनी तिकडे जाणे : वर्ष १९८२ मध्ये योगतज्ञ दादाजींना देवतांकडून संदेश आला, ‘पत्नी सौ. प्रमिला यांना उपासना करण्यासाठी हरिद्वार येथे एकटीला पाठवावे. त्या तिथे ३ मास राहून साधना करून परत येतील.’ वर्ष १९८२ मध्ये एकटीने एवढ्या दूरवर प्रवास करून जंगलात राहून साधना करणे पुष्कळ कठीण होते; मात्र सौ. प्रमिलाआई यांनी हरिद्वार येथे राहून साधना करण्याची सिद्धता दर्शवली. त्यांना मुंबई ‘सेंट्रल’ येथे रेल्वेत बसवून देण्यासाठी योगतज्ञ दादाजींसह काही साधक गेले होते. सौ. प्रमिलाआई यांच्या समवेत बरेच सामान होते. स्टोव्ह, कपडे, भांडी इत्यादी ३ मासांसाठी आवश्यक असलेले साहित्य होते. योगतज्ञ दादाजी यांनी सौ. प्रमिला यांना हरिद्वार येथे जाणर्‍या रेल्वेत बसवून दिले.

६ ई २. सौ. प्रमिला यांची हरिद्वार येथील जंगलात साधना करून घेण्याची सर्व व्यवस्था दैवी शक्तींनीच केलेली असणे : ३ मासांनी सौ. प्रमिला हरिद्वार येथून परत आल्यावर त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला, ‘‘हरिद्वार स्थानकावर एक गृहस्थ आले. त्यांनी ‘‘माताजी चलिये’’, असे म्हणून माझ्याकडील सर्व सामान घेतले आणि रेल्वे स्थानकाच्या बाहेर उभ्या केलेल्या ‘टॅक्सी’मध्ये नेऊन ठेवले. ‘टॅक्सी’त बसल्यावर ‘टॅक्सी’वाल्याने गाडी भरधाव वेगाने गावाबाहेर नेऊन थांबवली. सर्व सामान खाली उतरवून मला नमस्कार करून तो ‘टॅक्सी’त बसून निघून गेला. यातून ‘हे सर्व दैवी शक्तींनी घडवून आणले होते’, असे माझ्या लक्षात आले.

६ ई ३. एका संन्याशाने सौ. प्रमिला यांची एका कुटीत निवासाची सोय करून देणे : तो ‘टॅक्सी’वाला निघून गेल्यावर मी एकटीच सामानाजवळ बसून राहिले होते. थोड्या वेळाने तिथे एक संन्यासी आला आणि सर्व सामानासह मला गंगेच्या किनार्‍याने अरण्यात घेऊन गेला. तिथे त्याने एका कुटीत माझी रहायची व्यवस्था केली. ‘तिथे मला एकटीने रहायचे आहे’, याची कल्पना देऊन ‘कुठलीही भीती बाळगू नका. योगतज्ञ दादाजींचे हिमालयातील सहकारी तुमच्यावर सूक्ष्मातून पूर्ण लक्ष ठेवून आहेत’, असे आश्वस्त करून तो गेला. तो संन्यासी प्रतिदिन दूध आणि शिधा घेऊन येत असे. मला काही हवे असेल किंवा काही अडचण असेल, तर त्याला ते त्याच वेळी सांगावे लागायचे; कारण तो दिवसातून केवळ एकदाच आणि तेही ५ – १० मिनिटांसाठीच येत असे.

६ ई ४. निर्मनुष्य जंगलात राहून ३ मास साधना करणे : प.पू. दादाजींनी मला ‘सतत ध्यानधारणा करावी’, असे सांगितले होते. मी त्या निर्मनुष्य अरण्यांत नागराजांच्या परिसरात एकाकी राहून ३ मास साधना केली. केवळ दैवीशक्तींच्या साहाय्यानेच ते शक्य झाले. त्यांनी मला अदृश्यपणे मार्गदर्शन करून माझ्याकडून कठीण योगसाधना करून घेतली.

६ ई ५. साधनेचे ३ मास पूर्ण झाल्यावर पुन्हा पहिल्यांदा घडलेल्या घटनाक्रमाच्या उलट सर्व घटना घडून मुंबईला परत येणे : माझी ३ मासांची साधना पूर्ण झाल्यानंतर प्रतिदिन येणार्‍या संन्याशाने मला इकडे येतांना ‘टॅक्सी’वाल्याने गावाबाहेर जिथे सोडले होते, तिथे आणून सोडले. काहीच वेळात तो पूर्वीचा ‘टॅक्सी’वाला आला. त्याने मला रेल्वेस्थानकावर नेऊन मुंबईला जाणार्‍या गाडीचे तिकीट काढून रेल्वेत बसवून दिले आणि विचारले, ‘‘तुम्हाला एवढ्या दूर जंगलात एकटीला जायला भीती वाटली नाही का ?’’ मी म्हणाले, ‘‘प.पू. दादाजींनी मला सांगितले होते, ‘दैवी शक्ती लक्ष ठेवून आहेत. काही काळजी करायची नाही.’’

७. पू. (श्रीमती) प्रमिला वैशंपायन यांनी सनातन संस्थेविषयी काढलेले गौरवोद्गार !

त्या नेहमीच सनातन संस्थेचे कौतुक करत असत, ‘‘साधक किती छान सेवा करतात. सनातन संस्थेच्या साधकांमध्ये शिस्त आहे.’’

७ अ. सनातन संस्थेने योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्याविषयी प्रकाशित केलेला ग्रंथ वाचून ‘सनातन संस्थेने मोठे कार्य केले आहे’, असे कौतुक करणे : ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (गुणवैशिष्ट्ये, कार्य, सिद्धी आणि देहत्याग)’ या सनातन-निर्मित ग्रंथाचे प्रकाशन पू. प्रमिलाआई यांच्या हस्ते कल्याण येथील त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. त्यानंतर २ दिवसांनी त्यांनी मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘मी योगतज्ञ दादाजींचा ग्रंथ वाचत आहे. तो वाचतांना त्यांचे संपूर्ण चरित्रच माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले. तू ग्रंथ पुष्कळ चांगला लिहिला आहेस. मला हा ग्रंथ पाहून फार आनंद झाला. सनातन संस्थेने योगतज्ञ दादाजींवरील हा ग्रंथ प्रकाशित करून मोठे कार्य केले आहे.’’

८. पू. (श्रीमती) प्रमिला वैशंपायन यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती असलेला भाव !

पू. प्रमिलाआईंचा मला भ्रमणभाष आल्यावर किंवा मी त्यांना भ्रमणभाष केल्यावर त्या आवर्जून प.पू. डॉक्टरांची विचारपूस करायच्या आणि ‘त्यांना माझा नमस्कार सांग’, असे मला सांगायच्या.

९. कृतज्ञता

प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे मला योगतज्ञ दादाजी आणि पू. प्रमिलाआई यांच्या सत्संगाची संधी मिळाली’, यासाठी मी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.६.२०२४)