Kalki Mukesh Khanna : ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटात महाभारतातील प्रसंग चुकीच्या पद्धतीने दाखवला! – अभिनेते मुकेश खन्ना यांचा आक्षेप
पौराणिक चित्रपट बनवण्यापूर्वी पटकथा पडताळण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची केली मागणी
मुंबई – ‘कल्की २८९८ एडी’ हा हिंदी चित्रपट ७ दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अभिनेते मुकेश खन्ना यांनी या चित्रपटातील एका प्रसंगावर आक्षेप घेतला आहे. महाभारतातील वस्तूस्थितीचा कसा विपर्यास करण्यात आला आहे ?, हे सांगत त्यांनी या चित्रपटातील एका दृश्यावर आक्षेप घेतला आहे. ‘सरकारने एक विशेष समिती स्थापन केली पाहिजे, जी पौराणिक कथांवर बनलेले चित्रपट पटकथेच्या टप्प्यावरच नाकारेल किंवा संमत करेल’, अशी मागणीही खन्ना यांनी केली आहे. या संदर्भात एक व्हिडिओ त्यांनी त्यांच्या यू ट्यूब चॅनलवर प्रसारित केला आहे.
मुकेश खन्ना म्हणाले की,
१. चित्रपटाच्या प्रारंभी ‘श्रीकृष्ण अश्वत्थामाच्या कपाळावरील मणी काढून टाकतांना शाप देतो’, असे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात महाभारतात असे कधीही झालेले नाही. मी निर्मात्यांना विचारू इच्छितो की, ‘जे इथे (महाभारतात) नाही, ते इतरत्र कुठेही असू शकत नाही’, असे सांगणार्या व्यास मुनींपेक्षा दोन पावले पुढे जाऊन तुम्ही अधिक कसे दाखवू शकता ? मी लहानपणापासून महाभारत वाचत आहे. अश्वत्थामाने द्रौपदीच्या ५ मुलांचा वध केला; म्हणून द्रौपदीच्या सांगण्यावरून भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाचा मणी काढून घेतला होता.
२. अर्जुन आणि अश्वत्थामा यांच्यात मोठे युद्ध झाले होते. त्या युद्धात दोघांनी ब्रह्मास्त्र काढले. कृष्ण आणि व्यास मुनी या दोघांनी अर्जुन अन् अश्वत्थामा यांना समजावून सांगितले होते की, ब्रह्मास्त्र वापरू नका. यावर अर्जुनाने ‘ब्रह्मास्त्र परत घेईन’, असे सांगितले; पण अश्वत्थामाला ‘ब्रह्मास्त्र परत कसे घ्यायचे ?’, हे ठाऊक नव्हते. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला विचारले की, ‘तुला ब्रह्मास्त्र कुठे चालवायचे आहे ?’ तेव्हा अश्वत्थामाने उत्तराच्या (अर्जुनाची सून) गर्भावर ब्रह्मास्त्र चालवणार असल्याचे सांगितले. यावर श्रीकृष्णाने त्याला ब्रह्मास्त्र चालवण्याची अनुमती दिली; मात्र कृष्णाने सुदर्शन चक्राने उत्तराच्या गर्भाचे ९ महिने रक्षण केले.
३. या चित्रपटात वरील प्रसंग चुकीच्या पद्धतीने दाखवल्याने प्रत्येक सनातनी हिंदूने त्यावर आक्षेप घेतला पाहिजे. दाक्षिणात्य चित्रपट निर्माते आपल्या परंपरेचा अधिक आदर करतात, असे मला वाटत होते; पण इथे हे काय झाले ?
संपादकीय भूमिकाकेंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळामध्ये चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याच्या सदस्यांच हिंदु धर्माचा अभ्यास आहे का ? हिंदु धर्माविषयी आस्था आहे का ? हे केंद्र सरकारने पहायला हवे आणि अशाच लोकांची तेथे नेमणूक केली पाहिजे ! |