शेतीपिकांची हानी आणि वन्यप्राणी आक्रमण यांविषयी तात्काळ कार्यवाहीसाठी अधिकार्यांना सूचना ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री
मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकर्यांची होणारी हानी आणि वन्य प्राण्यांच्या आक्रमणात मृत किंवा घायाळ झालेल्यांच्या साहाय्याविषयी शासन गंभीर आहे. पीक हानीभरपाई मर्यादा ६ सहस्रांवरून ५० सहस्र रुपये करण्यात आली. वन्यप्राणी आक्रमणातील मृतांच्या कुटुंबियांना आता २५ लाख रुपये साहाय्य शासनाकडून दिले जात आहे. वनांचे संरक्षण, पर्यावरणाचे संरक्षण करणार्या गावांच्या, गावकर्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.