भारत जगाला चांगले अभियंते आणि व्यवस्थापक देत आहे ! – डॉ. टी.जी. सीताराम, अध्यक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद
|
पुणे – भारत संशोधन आणि नाविन्यता क्षेत्रात जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकावर आहे. देशातील ‘भारतीय तंत्रज्ञान संस्थे’च्या तुलनेत ‘भारतीय विज्ञान संस्थे’त (आय.आय.एस्.सी.) सर्वाधिक संशोधन होत आहे. भारत गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून संपूर्ण जगाला चांगले अभियंते आणि व्यवस्थापक देत आहे. जगात असे एकही आस्थापन (कंपनी) नाही, ज्यात भारतीय अभियंते आणि व्यवस्थापक नाहीत, असे प्रतिपादन ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’चे अध्यक्ष डॉ. टी.जी. सीताराम यांनी केले. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या १२४ व्या पदवी प्रदान सोहळ्यात बोलत होते. या कार्यक्रमामध्ये विविध विद्या शाखांमधील ७१ विद्यार्थ्यांना ११७ सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.
डॉ. टी.जी. सीताराम म्हणाले की, सध्या देशामध्ये अत्यंत प्रतिभावान विद्यार्थी घडत आहेत. यातील काही विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षणासाठी जात आहेत; परंतु ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’नुसार होणार्या पालटांमुळे शिक्षणासाठी परदेशात जाणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अल्प होऊ शकते.
कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, ‘‘सर्वच क्षेत्रांमध्ये भारताचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचे मोठे दायित्व तुमच्या (विद्यार्थ्यांच्या) खांद्यावर आहे. पदवी घेणार्या प्रत्येकाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा ‘ब्रँड अॅम्बॅसिडर’ (विश्वासाचा मुखवटा) म्हणून आपली भूमिका निष्ठेने पार पाडावी.’’