देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ती’ याग या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे
‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या व्यापक कार्यातील अनिष्ट शक्तींचे अडथळे दूर व्हावेत, तसेच सद्गुरु, संत आणि साधक यांच्या सर्व प्रकारच्या त्रासांचे निवारण व्हावे’, यांसाठी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात फाल्गुन कृष्ण नवमी (१६.३.२०२३) या दिवशी ‘दशदिक्पाल पूजन’ सनातनच्या पुरोहितांच्या हस्ते करण्यात आले. सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्या महर्षींच्या आज्ञेने या विधीचे आयोजन करण्यात आले होते. सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून महर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात फाल्गुन कृष्ण दशमी (१७.३.२०२३) या दिवशी भगवान शिवाचे गुरुरूप असलेल्या ‘श्री दक्षिणामूर्ती’ या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. दशदिक्पाल पूजनाच्या वेळी वारा आणि जोराचा पाऊस आल्यावर साधकांनी स्थिर राहून पर्यायी बैठक व्यवस्था करणे
‘दशदिक्पाल पूजनासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ प्रवेशद्वाराजवळ आल्या. त्या वेळी वारा आणि जोराचा पाऊस चालू झाला; पण तो भीतीदायक न वाटता चांगला वाटत होता. साधक वेगवेगळ्या उपाययोजना काढत होते. यज्ञ मंडपाच्या बाजूला साधकांना बसण्यासाठी घातलेल्या मंडपावर हळूहळू पाणी साचू लागले. त्या वेळी साधक स्थिर होते. काही साधकांनी पटापट साहित्य आवरले. यज्ञ पहाण्याची भोजनकक्षात दुसरी व्यवस्था सिद्ध केली आणि त्या ठिकाणी जाऊन बसले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘वरुणदेवतेचा आशीर्वाद असून काळजी करू नका’, असे सांगणे
‘ऐन वेळी पाऊस आणि वारा आल्याने पूजाविधीचे कसे होणार ?’, असे काळजीचे विचार माझ्या मनात येत होते. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला ‘काळजी करू नये. वरुणदेवतेचा आशीर्वाद आहे. चांगलेच आहे’, असे सांगितले. त्या वेळी ‘संत अंतर्यामी असून तेच साधकांना योग्य दिशा देतात’, हे या प्रसंगातून भगवंताने शिकवले.
३. वरुणदेवतेने आशीर्वाद देणे
महर्षींच्या कृपेमुळे वरुणदेवता आशीर्वाद देण्यासाठी आली होती. पावसानंतर वातावरणातील दाब न्यून झाला. वातावरण हलके आणि प्रसन्न वाटू लागले.
४. पावसातही मशाल पेटत रहाणे
आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेल्या दोन मशालींमधील एक मशाल पूर्ण पावसातही पेटतच होती.
५. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी शिवाच्या मंदिरात प्रार्थना करणे आणि ‘शिवाने साधकांना आशीर्वाद दिला’, असे जाणवणे
देवद आश्रम नदीच्या बाजूला आहे. आश्रमाला नदी वळसा घालून जाते. त्या बाजूला भगवान शिवाचे मंदिर आहे. १७.३.२०२४ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी या मंदिरात ‘यज्ञकार्यातील अडथळे आणि साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत’, यासाठी प्रार्थना केली. ‘शिवाने साधकांना आशीर्वाद दिला आहे’, असे मला जाणवले. त्याच शिवाचे एक रूप असणारे ‘श्री दक्षिणामूर्ती’ यांना प्रसन्न करण्यासाठी महर्षींनी यज्ञ करण्यास सांगितले होते.
६. शिव मंदिराची महती
हे शिव मंदिर म्हणजे चैतन्याचा स्रोतच आहे. या शिव मंदिरातून निर्माण होणारे चैतन्य आश्रमात साधना करणार्या जिवांना प्राप्त झाल्यामुळे साधकांना आध्यात्मिक स्तरावर त्याचा लाभ होतो. शिव मंदिरामुळे देवद आश्रमात शांती अनुभवता येते.
७. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ देवद आश्रमात येणे आणि ‘शिवाच्या प्रकट रूपासमवेत पंचमहाभूतेही कार्यरत होऊन साधकांच्या साधनेतील अडथळे दूर झाले’, असे जाणवणे
त्या यज्ञाला उपस्थित रहाण्यासाठी भूदेवी आणि श्रीदेवी म्हणजेच अनुक्रमे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ देवद आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी मला जाणवले, ‘शिवाचे रुद्र रूप प्रकट होऊ लागले होते आणि त्या रूपाच्या समवेत पंचमहाभूतेही कार्यरत होऊन वातावरणातील अनेक त्रास, नकारात्मकता, साधकांच्या साधनेतील अडथळे दूर झाले. देवाची कृपा संपादन करण्यासाठी साधकांना ऊर्जा मिळाली’, असे मला वाटले.
८. यज्ञ विधींसाठी भगवंताच्या कृपेने अनेक गोष्टी सुनियोजित असणे आणि यज्ञाच्या आधी ३ मशाली अर्पण मिळणे अन् यज्ञाच्या दिवशी मशाली पेटवता येणे
या यज्ञ विधींसाठी भगवंताच्या कृपेने अनेक गोष्टी सुनियोजित असल्याचे लक्षात आले. ३.३.२०२३ या दिवशी देवद, पनवेल येथील आश्रमात ३ मशाली सोलापूर येथून अर्पण आल्या. ‘या मशाली कुठे वापरणार ?’, असा विचार करत असतांना ‘देवद आश्रमात यज्ञ आहे’, असे मला समजले. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना विचारले, ‘‘यज्ञाच्या दिवशी मशाली पेटवूया का ? तेव्हा त्यांनीही अनुमती दिल्यामुळे यज्ञाच्या दिवशी मशाली पेटवता आल्या.
९. ‘यज्ञाची देवता ‘श्री दक्षिणामूर्ती’ असून त्या देवतेच्या हातातही मशाल आहे’, हे लक्षात आल्यावर मशाली आश्रमात येण्याचा कार्यकारण भाव समजणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या तिन्ही गुरूंसाठी तीन मशाली मिळाल्या. यज्ञाच्या वेळी मशाली प्रथमच वापरणार होतो; परंतु त्याचा कार्यकारण भाव लक्षात आला नव्हता. ज्या वेळी यज्ञाला प्रारंभ झाला. त्या वेळी यज्ञाची देवता ‘श्री दक्षिणामूर्ती’ असून त्या देवतेच्या हातातही मशाल आहे. त्यामुळे आपल्याकडेही मशाली आल्या. त्या बाहेर प्रवेशद्वारावर लावून पेटवता आल्या, हे भगवंताचे नियोजन असल्याचे लक्षात आले.
१०. ‘सर्व अडथळे पूजाविधीच्या आधीच नाहीसे झाले’, असे वाटणे आणि यज्ञामध्येही सर्व देवता प्रसन्न होऊन साधकांना आशीर्वाद देत आहेत’, असे जाणवणे
‘सर्व अडथळे आणि अनिष्ट शक्तींचे त्रास पूजाविधीच्या आधीच नाहीसे झाले’, असे मला वाटले. पूजाविधी आपण देवतांच्या आव्हानासाठी करतो; पण या वेळी ‘देवतांना आवाहन करण्यापूर्वीच देवता येऊन कार्य करू लागल्या आणि त्यानंतर पूजा झाली’, असे मला जाणवले. ‘यज्ञामध्येही सर्व देवता प्रसन्न होऊन सर्व आहुती स्वीकारत असून सर्व साधकांना आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले.
११. देवद आश्रमात यज्ञ होण्यापूर्वी झालेला त्रास
यज्ञाच्या आधी काही दिवस आश्रमात आणलेला एक कोहळा आपोआप खराब झाला. त्याकडे पाहिल्यावरही त्रासदायक वाटत होते. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितले, ‘‘ते आक्रमणच आहे. साधकांवर होणारे आक्रमण त्या कोहळ्याने स्वतःवर घेतले आणि तो कोहळा खराब झाला.’’
१२. यज्ञाच्या वेळी देवद आश्रमात जाणवलेले पालट
अ. परिसरातील फुलझाडे फुलली होती. झाडांना नवीन पालवी आली होती.
आ. देवद आश्रमाच्या भूमीमध्ये भूमी देवतेचे चैतन्य निर्माण झाले होते.
इ. ‘देवता आश्रमात आल्या आहेत’, असे बर्याच साधकांना जाणवत होते.
भगवान शिव, शिवस्वरूप गुरुमाऊली, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– श्री. शंकर राजाराम नरूटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.३.२०२३)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |