साधक रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत असतांना त्याच्या विचारप्रक्रियेत टप्प्याटप्प्याने झालेले पालट !
‘मी २ वेळा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी आलो होतो. त्या वेळी माझ्या लक्षात आलेले माझ्या विचारप्रक्रियेतील पालट येथे दिले आहेत.
१. स्वयंपाकघरात सेवा करतांना साधकाची असलेली विचारप्रक्रिया !
अ. पूर्वी मी स्वयंपाकघरात पू. रेखा काणकोणकर (सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत, वय ४६ वर्षे) यांना विचारून सेवा करत असे; मात्र त्या वेळी माझ्या मनात ‘पू. रेखाताईंना ‘मी लगेच सेवा स्वीकारतो. माझी कोणतीही सेवा करण्याची सिद्धता असते’, असे वाटले पाहिजे’, असे प्रतिमा जपण्याचे विचार असत.
आ. या वेळी पू. रेखाताईंनी सेवा सांगितल्यावर ‘मला यातून नवीन शिकायचे आहे. देव मला आता नवीन काय शिकवणार आहे ? माझ्या मनाची स्थिती त्या वेळी कशी असते ?’, याचा अभ्यास करायचा आहे’, ही जाणीव होती. त्यामुळे काही सेवा करणे माझ्या क्षमतेपेक्षा अधिक असूनही त्या करणे मला शक्य झाले.
२. साधकाचा ‘भाज्या चिरण्याविषयी ठाऊक आहे’, असा विचार असतांना !
अ. या वेळी माझा ‘मला भाज्या चिरण्याविषयी ठाऊक आहे’, असा विचार असल्याने कुठेतरी विचारण्याचा भाग अल्प पडत आहे’, असे मला जाणवले. मला याची जाणीव पू. रेखाताईंनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यातही करून दिली. मी आधीच्या स्थितीत असतो, तर मला हे स्वीकारता आले नसते आणि ते स्वीकारण्यासाठी माझा संघर्ष झाला असता.
आ. ‘तुम्ही पुन्हा स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवण्यासाठी आला आहात, तर काहीतरी पुढच्या टप्प्याचे शिकवणार आहेत’, हा दृष्टीकोन ठेवणे अपेक्षित आहे’, अशी मला जाणीव करून दिल्यामुळे त्या विचारावर लवकर मात करणे शक्य झाले.
३. दिवसभरात घडणार्या प्रसंगांत माझे मनाची स्थिरता अनुभवण्याचे आणि सकारात्मक रहाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले आहे.
४. अन्य साधकांनी चूक सांगितल्यास साधकाची पूर्वी असलेली आणि नवीन विचारप्रक्रिया !
पूर्वी साधकांनी माझी चूक सांगितल्यास माझ्या मनात ‘मी कसा योग्य आहे’, असा समर्थनाचा विचार येत असे. या वेळी साधकांनी चूक सांगितल्यावर ‘मला असाही विचार करणे अपेक्षित आहे किंवा एखाद्या गोष्टीचे अन्यही पैलू असू शकतात’, ही जाणीव वाढल्यामुळे मला त्या साधकाबद्दल कृतज्ञता वाटू लागली.
५. अन्य साधकाच्या संदर्भात काही प्रसंग लक्षात आल्यास साधकाची असलेली विचारप्रक्रिया !
पूर्वी साधकांविषयी काही प्रसंग माझ्या लक्षात आल्यास मी त्याविषयी कुणाशीही बोलत नसे; मात्र तो प्रसंग माझ्या मनात रहात असे. त्यामुळे माझी ओढाताण होऊन त्या विचारांमध्ये माझ्या मनाची शक्ती व्यय होत असे. या वेळी असे काही प्रसंग लक्षात आल्यास मला लगेच पू. रेखाताईंना सांगता येऊ लागले. त्यामुळे माझ्या मनावरील ताण हलका होऊन मला सहजतेने वागता येऊ लागले.
६. प्रत्येक घंट्याने मनाचा आढावा घेण्याच्या संदर्भात साधकाची असलेली विचारप्रक्रिया !
स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत प्रत्येक घंट्याने मनाचा आढावा घेणे अपेक्षित आहे. पूर्वी माझा मनाचा आढावा घेण्याचे प्रमाण अल्प होते, तसेच त्या वेळी मला कोरडेपणा जाणवत असे.
या वेळी ‘मनाचा आढावा घेण्याने काय लाभ होतो !’, हे अनुभवता आल्यामुळे मला सहजतेने मनाचा आढावा घेणे जमू लागले.’
– श्री. आशिष जोशी, सनातन आश्रम, मिरज. (८.२.२०२४)