Shahbaz Sharif In Shanghai Summit : शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पाकच्या पंतप्रधानांची काश्मीरवरून भारतावर टीका !
अस्ताना (कझाकिस्तान) – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार, दीर्घकाळ चाललेले वाद सोडवले गेले पाहिजेत. पाकिस्तान अनेक दिवसांपासून याची मागणी करत आहे. सर्व देशांनी लोकांच्या आत्मनिर्णयाच्या अधिकाराचा आदर केला पाहिजे. तसे झाले नाही, तर लोकांना त्रास सहन करावा लागेल, अशी टीका पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांच्यासमोर काश्मीरवरून केली.
या वेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हेही उपस्थित होते. येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत शरीफ बोलत होते. शिखर परिषदेत द्विपक्षीय वादग्रस्त सूत्र उपस्थित करण्यावर बंदी घालण्यात आली असतांनाही पतंप्रधान शरीफ यांनी काश्मीरचे सूत्र उपस्थित केले. पुढील शिखर परिषद पाकिस्तानमध्ये होणार आहे. या वेळी शाहबाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांना या परिषदेला उपस्थित रहाण्याचे निमंत्रणही जयशंकर यांच्याकडे दिले.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताचे नाव न घेता ‘आतंकवाद कुठलीही व्यक्ती, समूह किंवा देश यांच्याकडून होत असला, तरी त्याला सामूहिक पद्धतीने हाताळले पाहिजे. सर्व प्रकारच्या आतंकवादावर स्पष्ट आणि विनाअट टीका केली पाहिजे. निरपराध लोकांची हत्या होणे, हे समर्थनीय नाही. आतंकवादाचा वापर राजकीय लाभ मिळवण्यासाठी करू नये. आर्थिक विकासासाठी आतंकवाद निर्मूलन ही पूर्वअट आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने भारतावर आरोप केला होता की, भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ चिनी नागरिकांना लक्ष्य करणार्या तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बलूच लिबरेशन आर्मी यांना साहाय्य करत आहे.
संपादकीय भूमिकापाकने कोणत्याही व्यासपिठावर काश्मीरचे सूत्र कितीही वेळा उपस्थित केले, तरी त्याचा काहीही लाभ होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे. भारताने आता काश्मीरचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत ! |