Telangana Dog Attack : तेलंगाणा येथे घराबाहेर खेळणार्‍या लहान मुलावर भटक्या कुत्र्यांचे प्राणघातक आक्रमण

अशा घटनांविषयी अहवाल सादर करण्याचा तेलंगाणा उच्च न्यायालयाचा आदेश

संगारेड्डी (तेलंगाणा) – येथील श्रीनगर वसाहतीमध्ये एक लहान मुलाला  कुत्र्यांकडून चावा घेत फरफटत नेण्याच्या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये घरात खेळणारे मूल मध्येच घराबाहेरील रस्त्यावर आल्यावर कुत्र्यांच्या टोळीने अचानक त्या मुलावर आक्रमण केले. या वेळी त्या मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्या कुत्र्यांनी त्याला खाली पाडले आणि ओरबाडून काढले. एका ठिकाणाहून दुसरीकडे त्याला फरपटत नेले. डोके, हात, पाय असे मिळेल तिथे ते कुत्रे चावे घेत होते. त्याच वेळी बाजूच्या घरातून एक जण तिथे धावत आला आणि त्याने त्या मुलाचा जीव वाचवला. घायाळ मुलाला उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

राज्यात भटक्या कुत्र्यांकडून लहान मुलांवर होणार्‍या आक्रमणांच्या वाढत्या घटनांची तेलंगाणा उच्च न्यायालयाने गंभीर नोंद घेतली आहे. न्यायालयाने महानगरपालिका, महसूल आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालात ‘भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अशी आक्रमणे रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा तपशील असावा’, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

भटक्या कुत्र्यांची समस्या संपूर्ण देशात आहे; मात्र ही समस्या राष्ट्रीय समस्या आहे, असे ना केंद्र सरकारला वाटते, ना राज्य सरकरांना ! त्यामुळे यावर कुणीही ठोस उपाययोजना काढत नाही आणि जनतेला कुत्र्यांच्या आक्रमणांना नेहमीच सामोरे जावे लागते, हे लज्जास्पद आहे !