‘पी.एम्. किसान सन्मान’ योजनेत राज्यात २० लाख ५० सहस्र लाभार्थींची वाढ ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री
मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – ‘केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘पी.एम्. किसान सन्मान’ योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांना प्रतिवर्षी ६ सहस्र रुपये, तर यावर्षीपासून राज्यशासनाने चालू केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेतून ६ सहस्र रुपये, असे एकूण १२ सहस्र रुपये शेतकर्यांना दिले जातात. या योजनेत चौदाव्या हप्त्यापर्यंत ७० लाख लाभार्थी राज्यातून लाभ घेत होते. कृषी विभागाने विविध मोहिमा राबवत गेल्या १ वर्षामध्ये या योजनेमध्ये २० लाख ५० सहस्र लाभार्थ्यांची वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी २ जुलै या दिवशी लक्षवेधीला उत्तर देतांना दिली.
पी.एम्. किसान सन्मान योजनेत राज्यातील ६५ सहस्र शेतकरी काही कागदपत्रांच्या किंवा ‘ई केवायसी’च्या कारणावरून वंचित राहिल्याच्या संदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांसह विविध सदस्यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.