४४ लाख ६० सहस्र विद्यार्थ्यांना शालेय गणवेश विनामूल्य मिळणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री
मुंबई – महाराष्ट्र राज्यातील ४४ लाख ६० सहस्र विद्यार्थ्यांना विनामूल्य शालेय गणवेश योजनेचा लाभ होणार आहे. येत्या ३० जुलैपर्यंत सर्व शाळांमध्ये गणवेश पोचतील. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्टला राज्यातील सर्व विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील. गणवेशाची गुणवत्ता आणि दर्जा उत्कृष्ट असेल, याची काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी याविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर मंत्री केसरकर यांनी पुढे सांगितले, ‘केंद्रशासनाच्या ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या अंतर्गत, तसेच राज्यशासनाच्या गणवेश योजनेच्या अंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ८ वीमध्ये शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ गणवेश विनामूल्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी कापड पुरवठादाराद्वारे पुरवठा करण्यात येणार्या कापडापासून ते गणवेश शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने स्थानिक महिला बचतगटांना दिल्याने महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.’