विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपसभापतींना दिले दिलगिरीचे पत्र !
निलंबनाचा फेरविचार करण्याची विनंती !
मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – विधान परिषदेत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी २ जुलै या दिवशी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर ५ दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ३ जुलै या दिवशी दानवे यांनी उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांची भेट घेऊन त्यांना पत्र देत दिलगिरी व्यक्त केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपसभापतींना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनींचे प्रश्न मांडण्यासाठी निलंबनाचा फेरविचार करण्यात यावा. याविषयी निर्णय घेण्यासाठी गटनेत्यांची बैठक पार पडली.
१. विधान परिषद सभागृहाच्या कामकाजावर शिवसेना ठाकरे गटाने अघोषित बहिष्कार टाकला आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या निलंबनाचा फेरविचार करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
२. बहुमताच्या जोरावर विरोधी पक्षनेते नसतांना विधान परिषदेचे कामकाज चालू शकत नाही. त्यामुळे फेरविचार होईपर्यंत विरोधी पक्ष उपसभापतींच्या समोरील मोकळ्या जागेत बसून कामकाज पहाण्याचा निर्णय ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतला.
आमदार अनिल परब यांनी उपसभापती डॉ. गोर्हे यांना पत्र देऊन दानवे यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती केली आहे. उपसभापतींना पत्र दिल्यानंतर अंबादास दानवे प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की, या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आधीच भूमिका मांडली आहे. माझ्या तोंडून काही शब्द निघाले असतील, तर स्वतः माझ्या पक्षाच्या सर्वाेच्च नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.