जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचनमधील ग्रामस्थांनी अडवला !
पालखी सोहळा गावामध्ये नेण्यास ग्रामस्थ आक्रमक !
लोणी काळभोर (जिल्हा पुणे) – जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती ग्रामस्थांचा निरोप घेऊन ३ जुलै या दिवशी सकाळी यवतकडे निघाला. पालखी सोहळा दुपारी १ वाजता उरुळी कांचन येथे पोचला. ग्रामस्थांनी महामार्गावरच थांबून पालखी सोहळ्याचा नगारा रथ अडवला. दुपारचा विसावा हा परंपरेनुसार ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरामध्ये करावा, अशी विनंती पालखी सोहळ्याच्या प्रमुखांना केली. या वेळी ग्रामस्थ आणि पालखी सोहळा विश्वस्त यांच्यामध्ये वादावादी झाली. उरुळी कांचनचे ग्रामस्थ हे पालखी गावामध्ये नेण्यास आक्रमक होते. तेव्हा पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर पालखी सोहळा ठरलेल्या वेळापत्रकानुसार उरुळी कांचन येथे विसाव्याला न थांबता थेट यवतच्या दिशेने मार्गस्थ झाला. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी अडवण्याची ही पहिलीच वेळ असावी.
पालखी सोहळ्याच्या वेळापत्रकांमध्ये पालट !
वारकरी संप्रदायाची वारी गेल्या ३३९ वर्षांपासून देहू ते पंढरपूर अशी चालत जाते. ती मार्गस्थ होत असतांना वेगवेगळ्या गावातून, वाड्या-वस्त्यांवरून जात असते. त्यानुसार पालखी सोहळ्याच्या प्रवासाचा तपशीलवार कार्यक्रम ‘श्री संत तुकाराम महाराज संस्थान’चे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी घोषित केलेला असतो. त्यामध्ये उरुळी कांचन येथील विसाव्याच्या संदर्भामध्ये पालट केले होते. त्यामध्ये दुपारचा विसावा ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराऐवजी पालखी मार्गावरच म्हणजे पुणे-सोलापूर महामार्गावरच विसावा घेण्यात आला.
उरुळी कांचन ग्रामस्थांचा आरोप
पालखी सोहळा उरुळी कांचन गावात आश्रम रस्त्याने मारुति मंदिरात जाऊन अभिषेक पूजा आणि आरती स्वीकारून पुढील यवत मुक्कामासाठी महात्मा गांधी विद्यालय रस्त्याने सोलापूर रस्त्याला लागून पुढे जात असतो. अशी परंपरा आहे; मात्र २०२३ पासून पालखी विश्वस्तांनी वेगळी भूमिका घेत उरुळी कांचन येथील विसावा रहित केला आहे. ‘उरुळी कांचन ग्रामस्थांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे’, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी विश्वस्तांच्या निर्णयावर गावात निषेधसभा घेऊन पालखी विश्वस्तांचा निषेध नोंदवला आहे.